भूविज्ञान मंत्रालय
किनारा स्वच्छता मोहिमेला समाजातील सर्वच थरांतून उत्तम प्रतिसाद : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
'आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी' समुद्रकिनाऱ्यावरील 1,500 टन कचरा दूर करण्याचे मोठे लक्ष्य पार पाडण्यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य आवश्यक : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिपादन
मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचरा दूर करण्यासाठी स्वयंसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी देशातले समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यावर दिला भर
Posted On:
13 SEP 2022 9:49PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या 75 दिवसांच्या प्रदीर्घ किनारा स्वच्छता मोहिमेला समाजातील सर्व थरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'स्वच्छ सागर सुरक्षित सागर' ही केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इतर केंद्रीय मंत्रालय, विभाग तसेच किनारी प्रदेशांची राज्य शासने यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठी किनारी प्रदेश स्वच्छता मोहीम सुरू आहे. सर्वांबरोबर राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ,चित्रपट आणि क्रीडा जगतातील व्यक्ती , नागरी गट इत्यादी या मोहिमेत सहभागी होत आहेत. 17 सप्टेंबर रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या तीन दिवस आधी विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
17 सप्टेंबरला मुंबईतल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा खासदार पूनम महाजन आणि इतर मान्यवर तसेच स्वयंसेवी संस्था त्यामध्ये सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सिंह यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी भारतीय किनारे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला असून स्वयंसेवकांनी मुंबईतल्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचरा हटवण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे कौतुक केले.
"प्रशंसनीय... या कामी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मी कौतुक करतो", अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहा यांनी ट्विटरवर ठेवलेल्या किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.
भारताला लांबलचक आणि सुंदर किनारपट्टी लाभली आहे आणि आपले किनारे स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे सिंह यांनी सांगितले. मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर क्लिनेथॉन आयोजित केली होती. त्यामध्ये मुंबईकर विशेषतः तरुण वर्ग आणि नागरी गट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असे कौतुक सिंह यांनी केले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जगप्रसिद्ध पुरी किनाऱ्यावर होणार असलेल्या स्वच्छता मोहिमेला मार्गदर्शन करतील अशी माहिती जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिली.
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे 17 सप्टेंबर रोजी दक्षिण तसेच उत्तर गोवा किनारपट्टीवर होणाऱ्या किनारा स्वच्छता मोहिमेत भाग घेतील.
किनारपट्टीवरील राज्यांमधील खासदारांनी सुद्धा प्रथमच होणाऱ्या अशा प्रकारच्या आणि जगातील सर्वात मोठ्या किनारी स्वच्छता मोहिमेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असून त्यात स्थानिक स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेत विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केल्या आहेत.
***
S.Kakade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859058)
Visitor Counter : 254