रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी भारतात रस्ते आणि महामार्ग प्रकल्पात गुंतवणूक करावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Posted On: 12 SEP 2022 4:46PM by PIB Mumbai

 

भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्प, गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खाणीसारखे आहेत, असं सांगत अधिकाधिक उद्योजकांनी त्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आहे. 19 व्या  भारत- अमेरिका आर्थिक परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. भारत-अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सने ही परिषद आयोजित केली आहे.  भारत आणि अमेरिका ही जगातील दोन मोठी लोकशाही राष्ट्रे असून दोघांमधील द्वीपक्षीय संबंध अतिशय मजबूत आहेत. दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र असून, आपण परस्परांच्या विकासासाठी बरेच योगदान देऊ शकतो. दोन्ही देशांनी वेळोवेळी अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक आघाडीवर, परस्पर विश्वास, आदर आणि सहकार्याचे प्रदर्शन केले आहे. यंदा ह्या परिषदेची संकल्पना, -पुढच्या 25 वर्षांसाठीचा नवा अजेंडा अशी असून, त्यातूनआपले संबंध अधिक दृढ करण्यासाठीचा एक आराखडा तयार केला जाणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ZVP7.jpg

आपल्याला नव्या मार्गांची आखणी करतांना, काही चौकटी बाहेरचा विचार आणि नव्या सृजनशील उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे,असे ते म्हणाले. केंद्र सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्पाच्या माध्यमातून पायाभूत विकासात, 1.4 ट्रिलियन गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही देशभरात, 10,000 किमीचे 27 ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत, आणि त्यासाठी 5 लाख कोटी म्हणजे 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00234YH.jpg

ह्या प्रकल्प गुंतवणुकीत, किरकोळ गुंतवणूकदारांनाही सहभागी होता यावं यासाठी आम्ही, इन्व्ही आयटी (InvIT) सारखे काही गुंतवणूक स्नेही, अभिनव  उपक्रम देखील राबवत आहोत. आम्ही आमच्या उत्पादनांची संरचना अशाप्रकारे करतो आहोत, जेणेकरुन, किरकोळ गुंतवणूकदारांना त्यातून चांगले परतावे मिळू शकतील, जे मुदतठेवीवरील व्याजदरांपेक्षा अधिक असतील, असेही गडकरी म्हणाले.

आज भारत, इलेक्ट्रिक वाहने, मग, त्या दुचाकी असोत, तीचाकी अथवा चारचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी, सौर आणि पवन उर्जेवर आधारित चार्जिंग यंत्रणा उभरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या संकल्पनेवर देखील आम्ही काम करत असून सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या वीजेवर आधारित या महामार्गांवर ट्रक आणि बसेस सारख्या मोठ्या वाहनांचे  बॅटरी चार्जिंग देखील शक्य होईल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858726) Visitor Counter : 167