संरक्षण मंत्रालय
वायडी 12653 (तारागिरी) या लढाऊ जहाजाचे जलावतरण
Posted On:
12 SEP 2022 9:12AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 12 सप्टेंबर 2022
एनडब्ल्यूडब्ल्यूए (पश्चिम विभाग)च्या अध्यक्ष चारू सिंग यांच्या हस्ते आज माझगाव डॉकयार्ड लिमिटेड या कंपनीतर्फे निर्मित पी17ए या मालिकेतील पाचव्या लढाऊ जहाजाचे जलावतरण करण्यात आले. चारू सिंग यांनी या जहाजाचे नामकरण ‘तारागिरी’ असे केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने सरकारी दुखवटा जाहीर केला होता. जलावतरणाचा कार्यक्रम भरतीवर अवलंबून निश्चित केलेला असल्यामुळे,त्यात काही बदल करणे शक्य नसल्याकारणाने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात न करता त्याचे स्वरूप केवळ तांत्रिकदृष्ट्या जलावतरण असे मर्यादित ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला, पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. युध्दनौका निर्मिती आणि अधिग्रहण विभागाचे नियंत्रक व्हॉईस अॅडमिरल किरण देशमुख यांच्यासह भारतीय नौदल आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जलावतरण कार्यक्रमात भाग घेतला.
यापूर्वी अनेक यशस्वी पारंपारिक जलावतरणांना पाठबळ पुरविणाऱ्या युद्धनौका संरचना ब्युरो (WDB) आणि माझगाव डॉकयार्डच्या (MDL) पथकांनी त्यांच्या नैपुण्यात अधिक भर घातली असून या जलावतरणाच्या रूपाने भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोचला आहे. आजच्या कार्यक्रमानंतर, ‘तारागिरी’ नौका मुंबई डॉकयार्डतर्फे निर्मित अशाच पद्धतीच्या दोन युद्धनौकांसोबत भारतीय नौदलाच्या माध्यमातून अपूर्व पराक्रम करून दाखविण्यासाठी देशाच्या सेवेत रुजू झाली आहे.
पी17ए या मालिकेतील सात युद्धनौका सध्या MDL आणि GRSE यांच्या तर्फे निर्मितीच्या विविध अवस्थांमध्ये आहेत. गुंतागुंतीच्या प्रणाली असलेल्या अशा लढाऊ नौकांच्या देशांतर्गत निर्मितीमुळे जहाजबांधणीच्या क्षेत्रात देशाने नवी उंची गाठली आहे. या निर्मितीमुळे, भारतीय जहाजबांधणी क्षेत्रातील कंपन्या, त्यांचे उप-कंत्राटदार तसेच संबंधित उद्योगांसाठी आर्थिक विकास, रोजगार निर्मिती असे विविध प्रकारचे अतिरिक्त फायदे झाले आहेत. तसेच प्रकल्प 17ए साठी आवश्यक असणाऱ्या साहित्यापैकी 75% साहित्य भारतीय एमएसएमई उद्योगांकडून खरेदी करण्यात आल्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या पूर्ततेसाठी देखील देशाला पाठबळ मिळत आहे.
यावेळी बोलताना पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी लढाऊ जहाजबांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या बाबतीत असलेले देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी माझगाव डॉकयार्ड जहाजबांधणी कंपनी, युद्धनौका संरचना ब्युरो यांचे कर्मचारी तसेच इतर नौदल पथकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, ‘तारागिरी’ ही युद्धनौका जेव्हा समुद्रात कामगिरीवर जाईल तेव्हा ती भरतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये नक्कीच अधिक भर घालेल.
***
Gopal C/Sanjana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858636)
Visitor Counter : 225