वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिराला दिली भेट
श्री स्वामीनारायण मंदिर हे जगभरातील समाजाची सेवा करत आहे : पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2022 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2022
बीएपीएस स्वामीनारायण मंदिर जगभरातील समाजाची महान सेवा करत आहे,असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील भारतीय समुदायाला ते आज संबोधित करत होते.

लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिर संकुलाच्या परिसराची प्रशंसा करून आणि त्याच्या स्थापनेला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना गोयल म्हणाले की, मंदिराची वास्तू ही या परिसरातील भारतीय आणि लॉस एंजेलिसच्या क्षेत्राच्या विकास आणि प्रगतीसाठीच्या भारतीयांचे योगदान यांचे द्योतक आहे.
प्रमुख स्वामी महाराजांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना ते म्हणाले,की ज्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत आणि त्यांच्याकडून शिकवण घेतली आहे,त्या जगभरातील आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय विशेष प्रसंग आहे.वर्षानुवर्षे प्रमुख स्वामी महाराजांच्या विविध कार्यक्रमांसोबत सहभागी होण्याचा बहुमान मिळाल्याचे स्मरण करून गोयल म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या प्रमुख स्वामी महाराजांच्या पंचाहत्तराव्या जयंती सोहळ्यातही त्यांना सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

गोयल म्हणाले की, जगभरातील श्रीस्वामीनारायण मंदिरांना भेट देण्याचे भाग्य त्यांना नेहमीच लाभले आहे आणि लॉस एंजेलिसमधील हे मंदिर अतिशय अनोखे आणि सुरेख आखणीचे असून त्याची उत्तमरीत्या अंमलबजावणी करण्यात आली आहे.या मंदिराला भेट देताना अध्यात्माची जी अनुभूती येते ती अतिशय अनोखी असते, असेही ते पुढे म्हणाले.
हिंदूंची एकजूट आणि हिंदू धर्माची भावना जगभर तेजस्वीपणे प्रवाहित करण्यात बीएपीएसचे योगदान अमूल्य असल्याचे गोयल यांनी यावेळी नमूद केले. जेव्हा लोक भारताबाहेर पडतात आणि जीवनातील भौतिक सुखांचा अनुभव घेऊ लागतात, तेव्हा पुढच्या पिढीचा मातृभूमीशी संपर्क तुटून गेल्याचे दृष्टीस पडते.पण जिथे जिथे स्वामीनारायण मंदिर स्थापन झाले आहे तिथे अध्यात्म फुललेले दिसते आणि पुढची पिढी मातृभूमीशी जोडलेली दिसते.त्यामुळे चांगल्या सवयी आणि पध्दती आत्मसात केल्या जातात. म्हणूनच ही संस्था जगभरात मोठ्या प्रमाणावर समाजाची सेवा करत आहे,असे गोयल म्हणाले.

स्वामीनारायण भगवान यांचा नेहमीच मानवता आणि अध्यात्म आणि समाजसेवेवर विश्वास असल्याचे अधोरेखित करून गोयल पुढे म्हणाले की, त्यांच्या शिकवणुकींनी मानवतेसाठी काम करण्याच्या भूमिकेवर आमचे लक्ष केंद्रित केले.ज्ञान, भक्ती आणि श्रद्धेची जी अद्भुत शिकवण स्वामीनारायणांनी आपल्याला दिली आहे आणि प्रमुख स्वामी महाराजांनी ज्याचा वारसा पुढे नेला आहे ती आपल्या सर्वांसोबत सदैव राहील. त्यांची शिकवण मला आयुष्यभर प्रेरणा आणि मार्गदर्शन करत राहील, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858549)
आगंतुक पटल : 185