सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अंमली पदार्थांचे घातक परिणाम युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालय 12 सप्टेंबर 2022 रोजी एनसीसी छात्रांशी साधणार संवाद
Posted On:
11 SEP 2022 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2022
अंमली पदार्थांचे घातक परिणाम तरुणांपर्यंत पोहोचवण्याची तातडीची निकड लक्षात घेऊन आणि तरुणांवर असलेला एनसीसीचा प्रभाव लक्षात घेता, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने 12 सप्टेंबर 2022 रोजी, भीम ऑडिटोरियम, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांशी संवाद आणि अमली पदार्थ विरोधी सामूहिक प्रतिज्ञा आयोजित करण्यात आली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार या कार्यक्रमाला संयुक्तकरित्या उपस्थित राहतील. देशातील एनसीसीची सर्व 17 राज्य संचालनालये दूरदृष्टी प्रणाली द्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील.
राज्यांच्या समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील एनसीसी छात्र आणि तरुणांना या संवाद आणि प्रतिज्ञा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना हा कार्यक्रम पाहण्याची सुविधा पुरवण्यास सांगण्यात आले आहे. देशभरातील हजारो एनसीसी छात्र आणि तरुण या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग हा भारत सरकारमधील नोडल विभाग आहे. तरुण, मुले आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, भारत सरकारने 15 ऑगस्ट 2020 रोजी देशातल्या निवडक 272 जिल्ह्यांमध्ये नशा मुक्त भारत अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत 3 कोटी युवक, 2 कोटी महिला आणि 1.59 लाख शैक्षणिक संस्थांसह 8 कोटींहून अधिक लोक या अभियानाचा भाग बनले आहेत.
एनसीसी कॅडेट्सच्या सक्रिय सहभागाने, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग या अभियानाला नवीन उंचीवर नेईल आणि नशा मुक्त भारताचे उद्दिष्ट गाठेल अशी अपेक्षा आहे.
* * *
N.Chitale/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858522)
Visitor Counter : 140