वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

लॉस एंजेलिस येथे प्रशांत महासागर आर्थिक मंचाच्या पहिल्या वैयक्तिक मंत्रीस्तरीय बैठकीत पीयूष गोयल यांचा सहभाग


भारत आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन आयपीईएफच्या चौकटीच्या विविध पैलूंवर निर्णय घेणार; पियुष गोयल यांचे प्रतिपादन

मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक प्रशांत महासागर क्षेत्रासाठी प्रयत्नशील राहण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पियुष गोयल यांच्याकडून पुनरुच्चार

लॉस एंजेलिस येथे आयपीईएफ मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि व्हिएतनाममधील आपल्या समकक्षांची गोयल यांनी घेतली भेट

Posted On: 09 SEP 2022 11:04AM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल आज लॉस एंजेलिस येथे आयोजित प्रशांत महासागर आर्थिक मंचाच्या (आयपीईएफ) पहिल्या वैयक्तिक मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी झाले. आयपीईएफ मंत्रीस्तरीय बैठकीच्या स्थळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना मंत्री म्हणाले की, भारत आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन आयपीईएफच्या चौकटीच्या विविध पैलूंवर निर्णय घेईल.

आयपीईएफच्या 14 सदस्य देशांबरोबरचा संवाद फलदायी ठरला असून अशा फलदायी संवादासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार करायला आयपीईएफच्या सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले होते, असे गोयल यांनी सांगितले. येत्या एक दिवसात आयपीईएफ सदस्य देशांना परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांवर संवाद साधण्यासाठीची चौकट निश्चित करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत महासागर क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक चौकट निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी गोयल यांनी ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री एच.ई. डॉन फॅरेल यांची लॉस एंजेलिसमध्ये भेट घेतली.

   

गोयल यांनी लॉस एंजेलिस येथील आयपीईएफ मंत्रिस्तरीय बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्याबरोबर देखील बैठक घेतली.

लवचीक जागतिक पुरवठा साखळी तयार करून भारत-अमेरिका व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी दृढ करण्यावर आम्ही चर्चा केली, मंत्र्यांनी ट्वीट केले आहे.

   

लॉस एंजेलिस येथील आयपीईएफ मंत्रीस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरीन ताई यांची भेट घेतली.

गोयल यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे, प्रशांत महासागर क्षेत्राच्या समृद्धीसाठीची चौकट निश्चित करण्यासाठी आयोजित मंत्रीस्तरीय बैठक सुरु होत असताना भारताने मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक प्रशांत महासागर क्षेत्रासाठी प्रयत्नशील राहण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या अमेरिकन समकक्षांसोबत झालेल्या बैठकीबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, अमेरिकेतील त्यांच्या समकक्षांबरोबरची बैठक अतिशय सौहार्दपूर्ण होती तसेच भारत आणि अमेरिके दरम्यान सुरु असलेल्या चांगली कामाबद्दल ते उत्साहित होते. भारताबरोबर उच्च तंत्रज्ञान क्षेत्रासह व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी अमेरिका अत्यंत अनुकूल असून दोन्ही देशांमधील लवचीक पुरवठा साखळी पुढे नेण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.       

गोयल यांनी मंत्रीस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर जपानचे अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांचीही भेट घेतली

आपल्या ट्वीटर संदेशात गोयल म्हणाले,भारत-जपान आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी रोजगार, विकास आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.   

प्रशांत महासागर क्षेत्राच्या समृद्धीसाठीची चौकट निश्चित करण्यासाठी आयोजित मंत्रीस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी व्हिएतनामचे उद्योग आणि व्यापार मंत्री गुयेन हाँग दीन यांची भेट घेऊन परस्पर हिताच्या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याबाबत चर्चा केली.

  

अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेबाबत अधिक तपशील देताना गोयल म्हणाले की, दोन्ही देशांचा यावर विश्वास आहे की, प्रमुख तत्त्व म्हणून आपल्याला आत्मनिर्भर राहायला हवे, तसंच पारदर्शक अर्थव्यवस्था आणि नियामाधारित व्यापार प्रणालीवर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासू भागीदारांमध्ये लवचीक पुरवठा साखळी आवश्यक आहे. हे पुढे म्हणाले की, अमेरिका भारताबरोबर काम करायला उत्सुक आहे, जेणेकरून आपले अन्य देशांवरील, विशेषतः ज्या देशांबरोबर गेल्या दोन ते तीन वर्षांत आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करता येईल.

बाजार प्रवेश समस्यांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की लवकरच भारत-अमेरिका व्यापार धोरण मंच आयोजित केला जाईल, ज्यामध्ये अधिक वितरण योग्य आणि गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्र आपल्या समोर येतील.         

डिजिटल अर्थव्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या समकक्षांना कळवले आहे विदा गोपनीयतेची उच्च पातळी राखून, भारताला डिजिटल क्षेत्रासाठी, विशेषतः आपल्या नागरिकांच्या वैयक्तिक विदेकरता अतिशय समकालीन आणि आधुनिक कायदे हवे आहेत. याच भावनेने लवकरच संसदेमध्ये सादर केल्या जाणाऱ्या याबाबतच्या अधिक मजबूत चौकटीवर भारत काम करत आहे आणि त्याचे अमेरिका आणि भारतातील व्यावसायिकांनी त्याचे खूप स्वागत केले आहे. भारत हा तंत्रज्ञान सेवांचा मोठा पुरवठादार आहे आणि आम्हाला कायद्याची चांगली समज ठेवण्यात रस आहे कारण आम्हाला सेवा निर्यातीमध्ये देखील मोठा रस आहे, असे ते म्हणाले.

गोयल म्हणाले की, आजच्या या वर्क फ्रॉम होमच्या काळात आमच्या युवा पिढीपुढे, विशेषतः टियर 2 आणि 3 शहरांमधील आणि दुर्गम भागातील तरुणांसाठी अमेरिकन कंपन्यांना किफायतशीर तंत्रज्ञान सेवा पुरवण्याच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत, आणि अमेरिकन व्यापारांनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

अमेरिकन कंपन्यांबरोबर भारत, दावोस आणि आखाती देशांमध्ये झालेल्या डब्ल्यूटीओ आणि बैठकींचा उल्लेख करत गोयल म्हणाले की, या बैठकांमधून आपल्याला हा विश्वास मिळाला की अमेरिकेला भारतात नोकर भरती, संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान सहाय्य प्रणाली आणि कार्यालयांचा विस्तार करायचा आहे. नोकर भरतीच्या त्यांच्या योजनांचे आकडे खरोखरच आश्चर्यकारक आहेत, असे ते म्हणाले. 

सॅन फ्रान्सिस्को, SETU येथे त्यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास उपक्रमावरील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, या योजनेचा भारत देखील लाभधारक असेल, ज्यामध्ये आपले युवा, विशेषतः मुली, ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, त्यांना या उपक्रमाचा भाग असलेल्या नामांकित कंपन्यांद्वारे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतामध्ये किफायतशीर उपाय पुरवणाऱ्या काही उत्कृष्ट एड-टेक कंपन्या आणि कौशल्य उपक्रम आहेत, त्यामुळे या उपक्रमाला भारताचा देखील पाठिंबा आहे. त्याचे अमेरिकेने स्वागत केले आहे, मंत्री म्हणाले.

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858124) Visitor Counter : 194