पर्यटन मंत्रालय

अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी हर घर तिरंगा अभियानात आपण देशाचे जनैक्य पाहिले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात'च्या कार्यक्रमात प्रतिपादन

Posted On: 06 SEP 2022 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट , 2022 च्या मन की बातच्या 92व्या आवृत्तीत आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानाने लोकांना एकत्र आणण्यात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. या मोहिमा एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला प्रतिबिंबित करतात.

मन की बात मध्ये पंतप्रधान म्हणाले की अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे. आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर, देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला.

अमृत महोत्सवाबद्दल अधिक सांगताना पंतप्रधान पुढे म्हणाले, मित्रांनो, अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75 गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली. दुसरीकडे नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना स्वराज ही मालिका बघण्याचे देखील आवाहन केले. "ही मालिका स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख, देशाच्या युवा पिढीला करून देण्याचा एक उत्तम उपक्रम आहे." असे ते म्हणाले. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लोकांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांचा देखील त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या विविध आवृत्त्यांमध्ये एक भारत श्रेष्ठ भारताला गौरवाचे स्थान दिले आहे.

 

* * *

G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857120) Visitor Counter : 473