माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मंत्रालयाने ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ साठी आमंत्रित केल्या प्रवेशिका

Posted On: 05 SEP 2022 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2022

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आजपासून ( 5/9/2002) 'उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ साठी प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत. चित्रपट निर्मितीच्या विविध विभागांमधून तरुण सर्जनशील कलाकारांच्या कलागुणांना ओळखण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांची जोपासना करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले हे व्यासपीठ, दरवर्षी गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा महत्वपूर्ण भाग आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सचा भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधत 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्य या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमात निवडल्या जाणाऱ्या चित्रपट निर्मात्यांची संख्या (75) ही भारतीय स्वातंत्र्याच्या वर्षांचे प्रतीक आहे. 

या नव प्रयत्नांची भावना कायम राखण्यासाठी क्रिएटिव्ह माइंड्समध्ये सहभागी होणाऱ्या युवकांची संख्या येणाऱ्या प्रत्येक वर्षी एकाने वाढवण्याची संकल्पना आहे.

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली, प्रख्यात ज्यूरीद्वारे युवकांनी सादर केलेल्या प्रवेशिकांमधून सर्वोत्तम 75 सर्जनशील प्रवेशिकांची निवड केली जाईल. हा उपक्रम तरुण नवोदित चित्रपट निर्मात्यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( IFFI,) गोवा दरम्यान राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्पर्धेद्वारे निवडण्यात आलेल्या युवा सर्जनशील कलाकारांचे सर्वात मोठे संमेलन असलेले हे जगभरातील एकमेव व्यासपीठ आहे; 2021 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तसेच प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील तरुण प्रतिभावंतांना या क्षेत्रातील दिग्गजांशी जोडण्याची संकल्पना मांडली होती.

भारताला जगासाठी चित्रपट आशय केंद्र आणि पोस्ट प्रॉडक्शन केंद्र बनवण्याच्या दिशेने तसेच देशातील तरुण प्रतिभा ओळखून, त्यांची जोपासना करत कौशल्य वाढवून, त्यांना या क्षेत्राशी जोडण्यास सज्ज करण्याच्या दिशेने, हा उपक्रम आणखी एक नवे पाऊल आहे. हा उपक्रम तरुण चित्रपट निर्मात्यांची जोपासना करण्याबरोबरच त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सहकार्य आणि संपर्क उपलब्ध करून देणारी व्यवस्था देखील तयार करत आहे. उपक्रमात सहभागी झालेल्या युवकांना या संधीचा वापर करून प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात फायदेशीर रोजगार मिळवता यावा यासाठी मंत्रालय काही उपाययोजना करत आहे.

5 सप्टेंबर 2022 ते 23 सप्टेंबर 2022 पर्यंत या प्रवेशिका खुल्या आहेत

https://www.iffigoa.org/creativeminds

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856897) Visitor Counter : 137