पंतप्रधान कार्यालय

मंगळूरु इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच राष्ट्रार्पण


मंगळूरु इथे पंतप्रधानांनी 3800 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

“विकसित भारताची उभारणी करण्यासाठी, “मेक इन इंडिया” चा आणि देशातील उत्पादन क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक”- पंतप्रधान

“सागरमाला प्रकल्पाचा कर्नाटक मोठा लाभार्थी” –पंतप्रधान

“कर्नाटकच्या ग्रामीण भागात, पहिल्यांदाच 30 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत नळाने पाणीपुरवठा”

“कर्नाटकच्या 30 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना मिळाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ”

“जेव्हा पर्यटनात वाढ होते, तेव्हा आपले कुटीरोद्योग, आपले कारागीर, ग्रामोद्योग, फेरीवाले, ऑटो रिक्शा चालक, टॅक्सी चालक अशा व्यावसायिकांनाही फायदा होतो”

“आज देशात डिजिटल व्यवहार ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत, भीम-युपीआय सारखे आपले अभिनव उपक्रम जगाचे लक्ष वेधून घेत आहेत.”

“सहा लाख किमी च्या ऑप्टिकल फायबर च्या माध्यमातून ग्राम पंचायती जोडल्या जात आहेत.”

“व्यापारी निर्यातीत, भारताने 418 अब्ज डॉलर्सचा म्हणजे 31 लाख कोटी रुपयांच्या व्यापाराचा नवा विक्रम प्रस्थापित केला”

“पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याअंतर्गत, रेल्वे आणि रस्तेबांधणीचे अडीचशे पेक्षा अधिक प्रकल्प निवडले असून, त्यामुळे बंदरांसाठीची दळणवळण यंत्रणा अधिक निर्वेध होणार आहे.”- पंतप्रधान

Posted On: 02 SEP 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळूरु इथे 3800 कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली.  हे प्रकल्प यांत्रिकीकरण  आणि औद्योगिकीकरणाशी संबंधित आहेत.

यावेळी उपस्थितांसमोर बोलतांना, पंतप्रधान म्हणाले, की आजचा दिवस भारताच्या इतिहासातील संस्मरणीय दिवस आहे. भारताच्या प्रादेशिक सुरक्षेचा विषय असो किंवा मग आर्थिक सुरक्षेचा, भारतात आज अनेक, मोठमोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आयएनएस विक्रांत आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्याचा उल्लेख करुन, पंतप्रधान म्हणाले, की तो अनुभव समस्त भारतीयांच्या मनात प्रचंड अभिमानाची भावना निर्माण करणारा होता.

ज्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आणि ज्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्या प्रकल्पांविषयी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, या प्रकल्पांमुळे जगण्यातील सुलभता वाढेल तसेच कर्नाटकात रोजगाराच्या संधी वाढतील, विशेषतः ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेमुळे या भागातील कोळी, कारागीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल.

पंच प्रण बद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लाल किल्ल्यावरून या पंच प्रणाबद्दल बोललो त्यातला पहिला प्रण आहे विकसित भारत तयार करणे. “विकसित भारत तयार करण्यसाठी देशाचे उत्पादन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे, ‘मेक इन इंडिया’,” मोदी म्हणाले. बंदर विकासात देशाने केलेले काम अधोरेखित करताना त्यांनी हा विकासाचा मंत्र आहे यावर भर दिला. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळेच गेल्या 8 वर्षांत भारताच्या बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट झाली आहे.

गेल्या आठ वर्षांत, भारतात पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीला देण्यात आलेल्या महत्वाविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की या सर्व योजनांचा कर्नाटकाला मोठा लाभ मिळाला आहे. “केंद्राच्या सागरमाला प्रकल्पाचा कर्नाटक मोठा लाभार्थी आहे.” असे ते पुढे म्हणाले. गेल्या आठ वर्षांत, राज्यात, 70 हजार कोटींच्या नव्या महामार्ग प्रकल्पांची भर पडली आहे. तसेच आणि एक लाख कोटी रुपये मूल्यांचे प्रकल्प लवकरच येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या आठ वर्षांत, कर्नाटकसाठीच्या रेल्वे तरतुदीत, चौपट वाढ झाली, असं त्यांनी सांगितलं .

गेल्या आठ वर्षातील विकासावर दृष्टीक्षेप टाकतांना पंतप्रधान म्हणाले, की देशात गरिबांसाठी 3 कोटींपेक्षा अधिक घरे बांधण्यात आली आहेत आणि कर्नाटकात, आठ लाखांपेक्षा जास्त पक्क्या घरांच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे. “ हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांना, त्यांची घरे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत.” असे त्यांनी सांगितले. जल जीवन अभियानाअंतर्गत, केवळ तीन वर्षात देशातील सहा कोटी घरांपर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. “कर्नाटकात, 30 लाख कुटुंबांपर्यंत, पहिल्यांदाच नळाने पाणी मिळण्याची सुविधा पोहोचली आहे.”, असे त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, सुमारे चार कोटी गरीब लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. “त्यामुळे, गरिबांचे आजारपणावरील उपचारांवर खर्च होणारे सुमारे 50 कोटी रुपये वाचले आहेत” कर्नाटकमधील, 30 लाख रुग्णांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळाला आहे, असेही ते पुढे म्हणाले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘ लहान शेतकरी, छोटे व्यापारी, मच्छीमार, रस्त्यावरील विक्रेते,  आणि अशा कोट्यवधी लोकांना पहिल्यांदाच देशातल्या विकास कामांचा लाभ मिळायला लागला आहे. ही सर्व लहान लहान व्यावसायिक मंडळीही विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत.’’

भारताला साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, देशामध्ये असलेल्या क्षमतांचा आपल्याला पूरेपूर लाभ घ्यायचा आहे. पंतप्रधान म्हणाले, ज्यावेळी पर्यटन क्षेत्र वाढीस लागते, त्याचा फायदा आपल्याकडच्या कुटीर उद्योगांना, कारागिरांना, गावातल्या स्थानिक उद्योगांना, रस्त्यावरच्या विक्रेत्याला, रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांनाही होत असतो. न्यू मंगळुरू बंदरामध्ये क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी सातत्याने नवीन सुविधा निर्माण करीत आहे, हे पाहून मला आनंद वाटला.

आज डिजिटल पेमेंट पद्धतीने विक्रमी व्यवहार करून ऐतिहासिक पातळी गाठली आहे. भीम-यूपीआय यासारख्या आमच्या नवसंकल्पना जगाचे लक्ष वेधून घेत आहेत, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले, आज देशातल्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटीसह वेगवान आणि स्वस्त, परवडणारे इंटरनेट हवे आहे. आज सुमारे 6 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकून देशातल्या सर्व ग्रामपंचायतींना जोडण्यात येत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आता लवकरच येऊ घातलेल्या 5-जी ची सुविधा या क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडवून आणणार आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकातले डबल-इंजिन सरकारही लोकांच्या गरजा आणि आकांक्षा वेगाने पूर्ण करण्यासाठी काम करीत असल्याबद्दल मला आनंद होत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना काळात भारताने स्वीकारलेली धोरणे आणि घेतलेले निर्णय यांनी भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. ‘‘ गेल्या वर्षी जागतिक पातळीवर अनेक आव्हाने आली होती, तरीही भारताची एकूण निर्यात 670 अब्ज डॉलर म्हणजेच 50 लाख कोटी रूपयांची होती. प्रत्येक आव्हानावर मात करून भारताने 418 अब्ज डॉलर म्हणजेच 31 लाख कोटी रूपयांच्या व्यापारी मालाची निर्यात करून नवा विक्रम प्रस्थापित केला.’’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, देशाच्या वाढीच्या इंजिनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्र आज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. सेवा क्षेत्राचीही अतिशय वेगाने प्रगती सुरू आहे. हा पीएलआय म्हणजेच उत्पादनावर आधारित सवलतीच्या योजनांचा प्रभाव असून तो उत्पादन क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येत आहे. मोबाईल फोनसह संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र अनेकपटींनी वाढले आहे. भारतामध्ये खेळण्याची बाजारपेठ म्हणजे उदयोन्मुख क्षेत्र असून त्यामध्ये झालेल्या भरघोस वाढीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, गेल्या 3 वर्षांमध्ये खेळण्यांची आयात कमी झाली आहे आणि निर्यात जवळपास तितकीच वाढली आहे. या सर्व गोष्टींचा थेट लाभ देशाच्या किनारपट्टीच्या भागाला होत आहे. कारण भारतीय वस्तूंच्या निर्यातीसाठी या किनारपट्टीवरील भागांतून संसाधने पुरविली जातात. त्यामध्येच मंगळुरूसारखी मोठी बंदरे आहेत.’’ असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. 

यावेळी  पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारकडून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांमुळे देशाच्या किनारपट्टीवरील वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘‘देशाच्या विविध बंदरांवर वाढलेल्या सुविधा आणि संसाधनांमुळे, किनारपट्टींवर व्यवहार करणे आता अधिक सुलभ झाले आहे.’’ ते पुढे म्हणाले , ‘‘ बंदरांना जोडणाऱ्या मार्गांची चांगली सुविधा असावी, ती गतिमान व्हावी, असा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्या अंतर्गत, रेल्वे आणि रस्त्यांचे  अडीचशेहून अधिक प्रकल्प चिन्हीत करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे बंदराच्या जोडणीचे काम विनाखंड होण्यास मदत मिळणार आहे. असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

याप्रसंगी पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला आणि अब्बक्का चेन्नाभैरा देवी यांनी भारत भूमीला गुलामगिरीच्या तावडीतून वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण केले. ‘‘ अशा या शूरवीर महिला देशातल्या महिलांना निर्यातीच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत,’’ असेही ते म्हणाले.

कर्नाटकातील करावली प्रदेशाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. ते म्हणाले, “मला देशभक्तीच्या, राष्ट्रीय संकल्पाच्या या ऊर्जेने नेहमीच प्रेरणा मिळते. मंगळुरूमध्ये दिसलेली ही ऊर्जा अशीच विकास कामांचा मार्ग उजळत ठेवेल, याच अपेक्षेसह, या विकास प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.”

याप्रसंगी, कर्नाटकचे राज्यपाल, थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री, बसवराज बोम्मई, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री,  प्रल्हाद जोशी, केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री  बी.एस येडियुरप्पा, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, शंतनू ठाकूर आणि शोभा करंदलाजे, संसद सदस्य नलिन कुमार कटील, राज्यमंत्री अंगारा एस, सुनील कुमार व्ही आणि  कोटा श्रीनिवास पुजारी हे उपस्थित होते. 

 

या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती

पंतप्रधानांनी मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

नवीन मंगळूरु बंदर प्राधिकरणाने हाती घेतलेल्या कंटेनर आणि इतर मालाची हाताळणी करण्यासाठी धक्का क्रमांक 14 चे यांत्रिकीकरण करण्यासाठी 280 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.  या यांत्रिकी टर्मिनलमुळे बंदराची कार्यक्षमता वाढेल आणि त्याचबरोबर कार्यवाहीसाठी लागणारा वेळ, प्री-बर्थिंग विलंब आणि बंदरात राहण्याची वेळ सुमारे 35% नी कमी होईल, त्यामुळे व्यवसायाच्या वातावरणाला चालना मिळेल. प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, ज्यामुळे हाताळणी क्षमतेत वर्षाकाठी 4.2 दशलक्ष टन MTPA( मिलियन टन्स पर ऐनम) पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी 2025 पर्यंत 6 दशलक्ष टन MTPA(मिलियन टन्स पर  ऐनम) पेक्षा जास्त होईल.

बंदराद्वारे हाती घेतलेल्या सुमारे 1000 कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. एकात्मिक एलपीजी आणि बल्क लिक्विड पीओएल सुविधा, जी अत्याधुनिक क्रायोजेनिक एलपीजी स्टोरेज टँक टर्मिनलसह सुसज्ज असेल आणि अत्यंत कार्यक्षमतेने एकूण 45,000 टन वजन VLGC (खूप मोठे गॅस वाहक) उतरवण्यास सक्षम असेल. देशातील सर्वोच्च एलपीजी आयात करणार्‍या बंदरांपैकी एक म्हणून बंदराचा दर्जा अधिक मजबूत करताना ही सुविधा या प्रदेशातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला चालना देईल. स्टोरेज टँक आणि खाद्यतेल शुद्धीकरण, बिटुमन स्टोरेज आणि संबंधित सुविधांचे बांधकाम आणि बिटुमन आणि खाद्यतेल साठवण आणि संबंधित सुविधांचे बांधकाम या प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पांमुळे बिटुमन आणि खाद्यतेल जहाजांच्या  येण्याजाण्याच्या वेळेत सुधारणा होईल आणि व्यापारासाठी होणाऱ्या एकूण मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. कुलाई येथे फिशिंग हार्बरच्या विकासकामाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली, ज्यामुळे मासे पकडण्याची सुरक्षित हाताळणी सुलभ होईल आणि जागतिक बाजारपेठेत चांगली किंमत मिळेल. हे काम सागरमाला कार्यक्रमाच्या छत्राखाली हाती घेतले जाईल आणि त्यामुळे मच्छीमार समुदायाला महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक लाभ मिळतील.

पंतप्रधानांनी मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड द्वारे हाती घेतलेल्या बीएस VI अपग्रेडेशन प्रोजेक्ट आणि सी वॉटर डिसेलिनेशन( विक्षारण) प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. BS VI अपग्रेडेशन प्रकल्प, सुमारे 1830 कोटी रुपयांचा असून तो अति-शुद्ध पर्यावरणास आवश्यक BS-VI ग्रेड इंधन (10 PPM पेक्षा कमी गंधक कण) उत्पादनास सुलभ करेल. सी वॉटर डिसेलिनेशन प्रकल्प(समुद्री पाण्याचे विक्षारण करणारा), सुमारे  680 कोटी रुपयांचा असून, तो  गोड्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करेल आणि वर्षभर हायड्रोकार्बन्स आणि पेट्रोकेमिकल्सचा नियमित पुरवठा सुनिश्चित करेल. 30 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमता असलेला, प्रकल्प रिफायनरी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/Radhika/Suvarna/Vikas/D.Rane



(Release ID: 1856414) Visitor Counter : 194