संरक्षण मंत्रालय

भारताची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात दाखल


“आयएनएस विक्रांत ही केवळ युद्धनौकाच नाही. हे 21व्या शतकातील भारताचे परिश्रम, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे”-पंतप्रधान

“आयएनएस विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे प्रतीक आहे.”-पंतप्रधान

भूतकाळातील वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकत, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अशा मुद्रा चिन्हांकित नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण

आयएनएस विक्रांत हे आकांक्षी आणि आत्मनिर्भर अशा 'नव्या भारताचे' शानदार प्रतीक- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

"येत्या 25 वर्षांत, भारताची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्याच्या आमच्या संकल्पाचे आयएनएस विक्रांत हे मूर्तिमंत उदाहरण"-संरक्षणमंत्री

आयएनएस विक्रांत देशाच्या संरक्षणविषयक आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करेल- राजनाथ सिंह

Posted On: 02 SEP 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2022

 

भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी,  संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, म्हणजे 2 सप्टेंबर 2022 रोजी कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील राष्ट्रार्पण  केले. हा ध्वज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला.

“आज इथे केरळच्या किनाऱ्यावर प्रत्येक भारतीय, भविष्याच्या नव्या सूर्योदयाचा साक्षीदार आहे. हा समारंभ आयएनएस विक्रांतवर होत आहे, ही जागतिक नकाशावर सातत्याने उंचावत असलेले भारताचे मनोबल दर्शवणारी घटना आहे. आज स्वातंत्र्य सैनिकांचे सक्षम आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न साकार होताना आपण बघत आहोत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. “विक्रांत भव्य आहे, दिव्य आहे आणि विशाल आहे. विक्रांत ही युद्धनौका विशेष आहे, विक्रांत खास देखील आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौकाच नाही. हे 21व्या शतकातील भारताची मेहनत, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जेव्हा दूरचे लक्ष्य असते, प्रवास मोठा असतो, समुद्र आणि आव्हाने अनंत असतात, तेव्हा त्याला भारताचे उत्तर आहे विक्रांत. कशाशीही तुलना न होऊ शकणारे, अतुल्य असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अमृत म्हणजे विक्रांत. विक्रांत ही  स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे अद्वितीय प्रतीक आहे.”

आजच्या भारतासाठी कुठलेही आव्हान कठीण नाही, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले. “आज भारत, स्वदेशी तंत्रज्ञानाने इतक्या महाकाय विमानवाहू नौका बनविणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आज आएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, देशात नवीन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पावर काम करणारे नौदल अधिकारी, कोचीन जहाज बांधणी केंद्राचे अभियंते, वैज्ञानिक आणि विशेषतः कामगारांचे अभिनंदन केले, त्यांची प्रशंसा केली. ओणमच्या शुभ आणि आनंदी मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाची स्वतःची गुणवत्ता आहे, शक्ती आहे, स्वतःची एक विकास यात्रा आहे. विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे प्रतीक आहे. याच्या एअरबेसमध्ये लावलेले पोलाद देखील स्वदेशी बनावटीचे आहे आणि ते डीआरडीने विकसित केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या विमानवाहू युद्धनौकेच्या भव्य क्षमता समजावून सांगताना नरेंद्र मोदी म्हणले, हे एक तरंगते शहरच आहे. यावर इतकी वीज निर्माण होते, की ज्यामुळे 5,000 घरांना वीज पुरवठा होऊ शकतो आणि यात वापरण्यात आलेल्या वायरिंगची लांबी इतकी आहे, ते कोची पासून काशीपर्यंत पोहोचू शकेल. पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून जे पंच प्रण सांगितले होते, त्याचेच मूर्तिमंत उदाहरण, आयएनएस विक्रांत  आहे.

यावेळी, भारतातील दर्यावर्दी परंपरा आणि नौदलाच्या सामर्थ्याविषयी देखील पंतप्रधानांनी भाष्य केले. छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी ह्याच सागरी सामर्थ्याचा वापर करुन, असे सशक्त आरमार उभे केले होते, ज्याने स्वराज्याच्या शत्रूवर  सतत त्यांची जरब असे, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा ब्रिटिश भारतात आले,त्यावेळी त्यांनाही भारतीय नौकांच्या ताकदीचा आणि त्यांच्याद्वारे होणाऱ्या व्यापाराचे दडपण असे. आणि म्हणूनच, भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी, भारताचे हे सामर्थ्य मोडून काढणे आवश्यक आहे, हे ओळखून त्यांनी भारताचा सागरी शक्तीचा पाठीचा कणा मोडायचे ठरवले. ब्रिटिश संसदेचा त्यावेळेचा कायदा वापरुन, मग भारतीय जहाजांवर आणि सागरी व्यापाऱ्यांवर त्यानंतर कसे जाचक निर्बंध  घालण्यात आले, याचा इतिहास साक्षी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज, 2 सप्टेंबर 2022 हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक ठरला असून, भारताने, गुलामीच्या खुणा, गुलामीचे ओझे काढून फेकून दिले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.आतापर्यंत, भारतीय नौदलाच्या ध्वजावर, गुलामीची खूण कायम होती. मात्र, आजपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, तयार करण्यात आलेला हा नौदलाचा नवा ध्वज, भारताच्या समुद्रात आणि आकाशात दिमाखाने फडकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जेव्हा, विक्रांत आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होईल, तेव्हा, भारतीय नौदलातील अनेक महिला सैनिकही त्यावर तैनात केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सागराच्या या अपार सामर्थ्याला, अमर्याद स्त्रीशक्तीची जोड मिळेल, आणि हे जहाज भारताची एक भव्य ओळख सांगणारे ठरेल.आता नौदलाच्या सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याची दारे खुली करण्यात आली आहेत, असेही मोदी यांनी सांगितले. आता त्यांच्यावर कुठलीही बंधने नाहीत. सक्षम, शक्तिमान लाटांना जसे रोखता येत नाही, तसेच, आता भारताच्या कन्या देखील निर्बंधमुक्त, बंधनविरहित काम करु शकतील, असे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या एकेका थेंबापासून हा विशाल महासागर बनतो, असे पंतप्रधान म्हणाले. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात, देण्यात आलेली भारतीय बनावटीच्या तोफांची सलामी, आनंददायी क्षण होता, असेही  त्यांनी नमूद केले. तसेच जर देशातील प्रत्येक व्यक्तीने, ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र जपायला आणि त्यानुसार आचरण करायला सुरुवात केली, तर देश आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आजच्या बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करतांना ते म्हणाले की, याआधी, हिंद-प्रशांत महासागर आणि  हिंद महासागराच्या सुरक्षेच्या मुद्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात असे. मात्र, आज भरतासारख्या देशात, संरक्षण  क्षेत्राच्या धोरणात, ह्या प्रदेशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी, आम्ही प्रत्येक दिशेने, जे शक्य असतील ते प्रयत्न करतो आहोत. मग नौदलासाठीचा निधी वाढवणे, नौदलाच्या क्षमता वाढवण्यापर्यंत काम सुरु आहे. मजबूत भारतच, शांततामय आणि सुरक्षित जगाचा मार्ग खुला करु शकतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, देशाच्या या ‘अमृतकाळात’आयएनएस, विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे, हे येत्या 25 वर्षांत, भारताची सुरक्षा आणि संरक्षणव्यवस्था मजबूत करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. “आयएनएस विक्रांत, हे आकांक्षी आणि आत्मनिर्भर अशा ‘नव्या भारताचे’ शानदार प्रतीक आहे.”असे राजनाथ सिंह म्हणाले. विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे, हे स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या आपल्या मार्गातील अभूतपूर्व अशी कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणे, ही भारतीय नौदलाची प्रमुख जबाबदारी आहे,  सततच्या बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सागरी व्यापार निर्वेधपणे व्हावा, यासाठी सागरी सुरक्षा अबाधित ठेवणे, ही नौदलाची जबाबदारी आहे. ‘मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक as हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र राखण्यावर आमचा विश्वास आहे. यासाठी, “सागर” म्हणजेच, “ ह्या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ह्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनावर आधारित आमचे कार्य सुरु आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्यात,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी अत्यंत महत्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच दृष्टीने, सरकारने, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, कृषी, व्यापार, वाहतूक आणि संपर्कयंत्रणा यात अनेक दूरगामी बदल केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

“आज भारत जेव्हा 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे,  अशा वेळी येत्या काळात, जागतिक व्यापारात भारताचा वाटा निश्चितच वाढणार आहे. आणि जर हा वाटा वाढला, तर, अर्थातच, यातील बहुतांश  व्यापार सागरी मार्गाने होईल. अशा परिस्थितीत, आयएनएस विक्रांत, देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल” असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी, India@100 म्हणजे, 2047 पर्यंत नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर होईल, असं विश्वास व्यक्त केला. ‘मेड इन इंडिया’ जहाजे, पाणबुड्या,  लढावू विमाने, मानवरहित जहाजे आणि यंत्रणा याने सुसज्ज असे भारतीय नौदल, “युद्धासाठी सज्ज, विश्वासार्ह, एकात्मिक आणि भविष्यासाठी सज्ज” असे दल ठरेल, अशी ग्वाही दिली.

नौदलप्रमुखांनी, यावेळी, भारताची पहिली युद्धनौका, आयएनएस विक्रांत, जिने 1971 च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावत, देशाची 36 वर्षे सेवा केली, त्याचे स्मरण करत, हा वारसा पुढे नेण्याचे आवाहन कमांडिंग अधिकारी आणि आयएनएस वरील सैनिक आणि कर्मचाऱ्यांना केले.

 

आयएनएस विक्रांत विषयी

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे

262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद असलेल्या  विक्रांतचे वजन सुमारे 43,000 टन इतके आहे. याचा कमाल वेग 28 नॉट इतका असून, इंजिनाची  कमाल क्षमता 7,500 नॉटिकल मैल इतकी आहे. ह्या जहाजावर 2200 कंपार्टमेंट्स असून 1600 कर्मचाऱ्यांची- ज्यात महिला अधिकारी आणि खलाशी   यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही विमानवाहू नौका, अत्यंत उच्च दर्जाच्या मशीनरी चालवणाऱ्या, दिशादर्शक आणि स्वयंसंरक्षित अशा स्वयंचलित यंत्रणेने युक्त आहे. त्यावर अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा लावल्या आहेत.

मिग- 29, के लढाऊ जेट, कमोव्ह-31, MH-60R- ही लढावू विमाने ,बहुपयोगी हेलिकॉप्टर्स – अशी 30 विमानं तैनात आणि कार्यरत असण्याची या नौकेवर  क्षमता आहे. त्याशिवाय, देशी बनावटीचे, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, आणि हलक्या वजनाची लढावू विमाने देखील इथून हालचाली करु शकतात. शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) ही नवी लढावू विमान संचलन व्यवस्था वापरण्यास सक्षम, असे विक्रांत, स्की-जंप सुविधेने युक्त आहे. तसेच, “अरेस्टर वायर्सचा संच यात आहे.

 

नौदलाचे नवे निशाण (ध्वज)

भारताच्या वसाहतवादी गुलामीच्या खुणा पूसून टाकण्याच्या संकल्पाला अनुसरून, भारतीय नौदलाच्या ध्वजाचे नव्याने आरेखन करुन, त्यात भारताच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा चिन्हांकित करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार, पांढरे निशाण, असलेल्या नौदलाच्या झेंड्यावर आता, दोन महत्वाचे घटक असतील- एक डावीकडे वर आपला तिरंगा ध्वज आणि नेव्ही ब्लू-म्हणजे गडद निळ्या रंगाचा – भोवती सुवर्ण अष्टकोन असलेली मुद्रा ध्वजदंडाच्या दुसऱ्या बाजूला मध्यभागी असेल. ह्या सुवर्ण अष्टकोनाच्या आत, अशोक स्तंभ हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे, तिथेच देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. त्याखाली, जहाजाचा नांगर आहे. त्याच्या खाली - ‘शं नो वरुण:’(वरुण देवाची आमच्यावर कृपा असावी) हे नौदलाचे बोधवाक्य सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे.

केरळचे राज्यपाल, आरीफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, व्ही. मुरलीधरन, अजय भट्ट, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नौदलप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1856303) Visitor Counter : 971