गृह मंत्रालय

पद्म पुरस्कार- 2023 साठी नामांकने पाठवण्याची मुदत 15 सप्टेंबर 2022 पर्यंत खुली

Posted On: 22 AUG 2022 12:29PM by PIB Mumbai

प्रजासत्ताक दिन, 2023 च्या निमित्ताने घोषित करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार 2023 साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी स्वीकारायला 1 मे 2022 रोजी प्रारंभ झाला असून या पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी पाठवण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2022 ही आहे. यासाठीची नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपातच पाठवता येणार असून, ती राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर पाठवता येतील.

 

पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. वर्ष 1954 मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली असून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार घोषित केले जातात. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी विविध क्षेत्र आणि विषयातील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन अशा व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेदभाव न करता सर्व स्तरातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र ठरू शकतात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

 

पद्म पुरस्कारांना 'लोकांचे पद्म' असे स्वरूप देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच सर्व नागरिकांना नामांकने/शिफारशी करण्याची विनंती केली जात आहे. यामध्ये स्वतःच्या नावाचे नामांकन/शिफारस देखील करता येऊ शकते. त्यामुळेच, सर्वसामान्य लोकांचे कर्तृत्व आणि गुणवत्ता तसेच, त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य लक्षात घेऊन जे खरोखरच अशा पुरस्कारांसाठी पात्र आहेत, असे मान्यवर, विशेषतः अशा महिला, अनुसूचित जाती/जमातीचे लोक, दिव्यांग व्यक्ति जे समाजासाठी निस्वार्थी सेवा करत आहेत, त्यांची नावे नामांकने आणि शिफारसी म्हणून पाठवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

 

या नामांकने/शिफारसीमध्ये, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात संपूर्ण सविस्तर माहिती भरुन पाठवायची आहे. त्याशिवाय, संबंधित व्यक्तिच्या कार्याविषयीची माहिती (जास्तीत जास्त 800 शब्दांत) भरुन पाठवायची आहे. या माहितीत, त्या व्यक्तीची, सबंधित क्षेत्र/शाखेतील कामगिरी उल्लेखनीय, सेवा आणि कार्य यांचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा.

 

या संदर्भातील सविस्तर माहिती, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके ('Awards and Medals') शीर्षकाखाली उपलब्ध आहे. या पुरस्कारांची सद्यस्थिती आणि नियमावली, देखील https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

S.Tupe/B.Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1853543) Visitor Counter : 263