आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात अगदी मुलभूत स्तरावरील लोक-केंद्री आरोग्यसेवांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यासाठी तसेच ब्लॉक पातळीपासून आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वेळी वापर करण्याचे, केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांचे राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांना आवाहन


“आरोग्यविषयक बहु-स्तरीय पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत सहकार्यात्मक आणि सहयोगात्मक संघराज्यवादाच्या प्रेरणेसह कार्य करत आहे”

Posted On: 16 AUG 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2022

देशभरात आरोग्यविषयक बहु-स्तरीय पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे, त्याचा विस्तार करणे आणि त्याला बळकटी देणे यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत सहकार्यात्मक आणि सहयोगात्मक संघराज्यवादाच्या प्रेरणेसह कार्य करत आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मान्सून मांडवीय यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि तत्सम इतर महत्त्वाच्या योजना तसेच आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज (ईसीआरपी)-II, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान (पीएम-एबीएचआयएम) आणि 15 व्या वित्त आयोगाच्या (XV एफसी) अंतर्गत सुरु करण्यात आलेले विविध प्रकल्प यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत वर्धक मात्रेवर विशेष भर देऊन सुरु असलेल्या राष्ट्रीय कोविड 19 लसीकरण मोहिमेचा आढावा देखील घेतला. ही बैठक म्हणजे देशभरातील सर्व राज्यांमध्ये महत्त्वाच्या आरोग्यसेवांसंदर्भात पायाभूत सुविधांचे अद्यायावतीकरण आणि सशक्तीकरण यासाठी विविध योजना तसेच पॅकेजअंतर्गत राज्यांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय निधीचा वापर अधिक वेगाने केला जावा याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत असलेल्या बैठकांच्या मालिकेचा भाग होता. 

कोणत्याही संकटाला संधी समजून त्यापासून शिकणे आणि त्यातून आपली शक्ती वाढविणे या पंतप्रधानांच्या तत्वज्ञानाचा पुनरुच्चार करत, डॉ.मनसुख मांडवीय म्हणाले की, या महामारीने आपल्याला देशातील प्रत्येक जिल्हा आणि ब्लॉकमधील महत्त्वाच्या आरोग्य सेवाविषयक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास शिकविले आहे. नागरिकांना सुलभरित्या प्राप्त होऊ शकणाऱ्या, किफायतशीर दरातील, दर्जेदार आणि न्याय्य प्रकारच्या सरकारी आरोग्यसेवा सुविधा पुरविण्याकामी, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. काही राज्यांमध्ये केंद्रीय निधीच्या कमी प्रमाणात होत असलेल्या वापराबद्दल चिंता व्यक्त करत केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय म्हणाले की, केंद्र सरकारने निधीच्या कमी प्रमाणातील वापराचा आढावा घेण्याऐवजी, राज्यांनीच त्यांची कामगिरी सुधारावी आणि त्यांच्या क्षेत्रात आरोग्य सेवा योजनांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून जलदगतीने निधीची मागणी करावी.विविध पॅकेज आणि सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेवर वापर होणे तसेच त्यातून आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे या उद्देशाने राज्यांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.ईसीआरपी-II पॅकेजचा कालावधी डिसेंबर 2022 मध्ये संपत असल्यामुळे, या पॅकेजमधून मिळणाऱ्या निधीचा लवकरात लवकर वापर केला जावा यावर त्यांनी भर दिला.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारणीचे लक्ष्य साध्य करण्यात येत असलेल्या अडचणी राज्यांनी केंद्राला कळवाव्यात तसेच यापुढे केंद्रीय निधीचा वापर अधिक सुलभतेने होण्यासाठी उपयुक्त सूचना देखील द्याव्यात असे डॉ. मांडवीय यांनी सुचविले.

कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानाचे यश अधोरेखित करत केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी 15 जुलै 2022 रोजी सुरु करण्यात आलेल्या आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृतमहोत्सवाअंतर्गत 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या अधिकाधिक नागरिकांना कोविड लसीची वर्धक मात्रा देण्यासाठी वेगवान प्रयत्न करावेत अशा सूचना राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना दिल्या.

  

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852299) Visitor Counter : 156