शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यूएस नॅशनल सायन्स फाउंडेशनचे संचालक सेथुरामन पंचनाथन यांनी घेतली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट, भारताशी सहयोग वाढविण्यासाठी उत्सुकता केली व्यक्त

Posted On: 09 AUG 2022 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

 

यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशन (एन एस एफ)ने शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात भारतासोबतचे सहकार्य अधिक सखोल करण्याची आणि ते रुंदावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एन एस एफ चे संचालक सेथुरामन पंचनाथन यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. परस्पर हितसंबंध आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग ॲण्ड मॅथेमॅटिक्स (स्टेम) अभ्यासासाठी भारताच्या योजनांवर बैठकीत चर्चा झाली.

भारताची ताकद त्याचा युवावर्ग  आणि ज्ञानाच्या मजबूत पाया यामध्ये सामावली आहे  या मुद्द्यावर प्रधान यांनी भर दिला. देशातील विविध भागातल्या विविध संस्थांमध्ये  प्रतिभा आहे मात्र ही संपदा  जोपासनेच्या  प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एनएसएफने देशातील प्रमुख संस्थांव्यतिरिक्त एनआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि राज्य विद्यापीठे यांसारख्या कमी ज्ञात आणि आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या संस्थांशी आपला सहभाग वाढवण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रधान यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने निर्माण होत असलेल्या शैक्षणिक-कौशल्य निरंतरतेचा संदर्भ प्रधान यांनी दिला. पॉलिटेक्निक, आयटीआय आणि कम्युनिटी कॉलेज सारख्या संस्थांपर्यंत पोहोचून कौशल्य क्षेत्राला अशा सहकार्याच्या कक्षेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातील तसेच औपचारिक किंवा अनौपचारिक कौशल्य क्षेत्रातील सर्व युवक, एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहतील याची खातरजमा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि  सरकारची ती जबाबदारीही आहे असे त्यांनी सांगितले.

एनएसएफ ही एक स्वतंत्र फेडरल एजन्सी आहे. वैज्ञानिक शोध, तांत्रिक नवकल्पना आणि स्टेम शिक्षणाचा प्रचार करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.

8.8 अब्ज  अमेरिकन डॉलरच्या बजेटसह, एनएसएफ ही संस्था गणित, संगणक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या क्षेत्रांना निधी  पुरविणारी प्रमुख स्त्रोत संस्था आहे. एनएसएफ आणि भारताच्या एकत्रित सहभागामध्ये सहा टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हबचा समावेश आहे. या अंतर्गत बंगलोरच्या  भारतीय विज्ञान संस्था( IISc),  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि इतर अशा 8 संस्थासह  इतर, 30 प्रकल्पांमध्ये आणि सायबर सुरक्षेवरील काही प्रकल्पांमध्ये सहयोग करत आहेत. हे सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी एनएसएफचे संचालक भारतात आले आहेत.

भारताप्रमाणेच सर्वसमावेशकता आणि दर्जेदार शिक्षणाची सुलभता ही अमेरिकेतील सरकारचीही प्राथमिकता आहे असे पंचनाथन यांनी भारताच्या प्राधान्यक्रमांविषयी बोलताना सांगितले. कौशल्य विकासाशी संबंधित मात्र प्रतिनिधित्व नसलेल्या संस्थांपर्यंत एनएसएफ पोहोचेल जेणेकरून या ठिकाणीही प्रतिभेची जोपासना होऊ शकेल , असे ते म्हणाले.

भारतीय तंत्र शिक्षण परिषदे (एआयसीटीई)च्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्रालयाने इतर संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून एनएसएफशी पुढील सहभागासाठी एक रचनात्मक चौकट तयार करावी असे प्रधान यांनी सांगितले आहे.

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850302) Visitor Counter : 200