युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 च्या 10 व्या दिवशी भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 15 पदके जिंकली, भारताच्या पदकांची एकूण संख्या 55 वर पोहोचली
शरथ कमल/श्रीजा अकुला, निखत झरीन, एल्डोस पॉल, अमित पंघाल, नितू घंघास यांची सुवर्णपदकाची कमाई
Posted On:
08 AUG 2022 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
ठळक वैशिष्ट्ये:
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्वितीय कामगिरीबद्दल पदक विजेत्यांचे केले अभिनंदन
- क्रीडा क्षेत्रात भारताच्या मुलींचे वाढलेले सामर्थ्य पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले असे सांगत अनुराग ठाकूर यांच्याकडून पदक विजेत्यांचे अभिनंदन
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या 10 व्या दिवशी भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 15 पदके जिंकली. शरथ कमल/श्रीजा अकुला (मिश्र दुहेरी टेबल टेनिस), निखत झरीन (मुष्टियुद्ध), एल्डोस पॉल (पुरुष गट ट्रिपल जम्प), अमित पंघाल (मुष्टियुद्ध), नितू घंघास (मुष्टियुद्ध) यांनी सुवर्णपदके जिंकली.अब्दुल्ला अबूबकर (पुरुष गट ट्रिपल जम्प), सागर अहलावत (मुष्टियुद्ध ), अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन (टेबल टेनिस) आणि महिला क्रिकेट संघाने रौप्य पदकाची कमाई केली. महिला हॉकी संघ, संदीप कुमार (पुरुष गट 10,000 मीटर चालण्याची शर्यत ), अन्नू राणी (महिला गट भालाफेक), सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल (स्क्वॉश, मिश्र दुहेरी), किदांबी श्रीकांत (बॅडमिंटन, पुरुष एकेरी) आणि ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन, महिला दुहेरी) यांनी कांस्यपदक पटकावले. 18 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य पदकांसह भारताच्या पदकांची संख्या 55 वर पोहोचली आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
राष्ट्रपतींनी पदक विजेत्यांचे अभिनंदन करून ट्विट केले आहे;
''राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल तरुण मुष्टियोद्धा सागरचे अभिनंदन. जिंकण्यासाठीची तुमची जिद्द, दृढनिश्चय आणि धैर्य हे प्रशंसनीय आहे. मला खात्री आहे की तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.”
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आपल्या प्रतिभावान किशोरवयीन मुली ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे हार्दिक अभिनंदन.असामान्य परिपक्वतेसह खेळत त्यांनी विजयाची नोंद केली. या दोघी आपल्या तरुणांसाठी, खासकरून मुलींसाठी आदर्श आहेत. ”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्ण जिंकल्याबद्दल शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांचे हार्दिक अभिनंदन. अनुभव आणि तरुणाईचे मिश्रण त्यांच्या कामगिरीत दिसून आले आणि त्यांनी भारतासाठी टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला. बर्मिंघम येथे आपला तिरंगा पुन्हा एकदा उंच फडकेल हे त्यांनी सुनिश्चित केले. .”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन.तुम्ही शेवटपर्यंत विजेत्याप्रमाणे खेळलात आणि सामन्यादरम्यान तुमचा दृढ निर्धार नेत्रदीपक होता.बर्मिंघम येथे आपल्या मुलींनी आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.''
"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये कांस्य जिंकल्याबद्दल किदांबी श्रीकांतचे अभिनंदन.राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमधील तुमचे सलग विजय तुमच्या समर्पण आणि उत्कृष्टतेचे सामर्थ्य दर्शवतात. तुम्ही भारतीय बॅडमिंटनचे उत्तम प्रतिनिधित्व करत आहात''
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांचे अभिनंदन.तुमचा विजय हा भारतातील स्क्वॅश प्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.अशा विजयांमुळे आपल्या देशात खेळांच्या लोकप्रियतेला चालना मिळते.”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये टेबल टेनिस खेळात रौप्य जिंकल्याबद्दल शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांचे अभिनंदन.तुमच्या जबरदस्त भागीदारीमुळे तुमची कामगिरी ठळकपणे अधोरेखित झाली आहे. भारतीयांना तुमचा अभिमान आहे ”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल विश्व विजेती निखत झरीनचे हार्दिक अभिनंदन.तुम्ही लढतीत गाजवलेले वर्चस्व सर्व भारतीयांना आनंद देणारे आहे.तुमचे सुवर्णपदक म्हणजे बर्मिंघम येथे उंच फडकणारा तिरंगा. तुम्ही खास मुलींसाठी मूर्तिमंत आदर्श बनला आहात.''
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अन्नू राणीचे अभिनंदन.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत या खेळासाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला बनून तुम्ही नवीन क्षितिजे खुली केली आहेत. तुमचे पदक सर्व भारतीयांसाठी, विशेषत: महिलांसाठी प्रेरणादायी आहे.”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 10000 मीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल संदीप कुमारचे अभिनंदन.तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे. तुमचा विजय भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे.''
"इतिहास घडवला ! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रीपल जंप स्पर्धेत एल्डोस पॉलने सुवर्ण आणि अब्दुल्ला अबुबकरने रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत अंतिम फेरीतील दोन्ही स्पर्धक भारताचे होते, स्पर्धेतील आपल्या देशाचे वर्चस्व पाहून खूप छान वाटले. हा अपवादात्मक विक्रम दीर्घकाळ स्मरणात राहील .”
“राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचल्याबद्दल अमित पंघालचे हार्दिक अभिनंदन. तुमचा वेग आणि ठोसा मारण्याची निवड याची सर्व जाणकार दर्शकांनी प्रशंसा केली आहे. तुमची प्रतिभा ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.”
“राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रचंड प्रतिभावान नीतूचे हार्दिक अभिनंदन. ठोसे, हुक आणि बचावात्मक खेळाच्या बळावर तुम्ही सर्वोच्च खेळाचा इतिहास निर्माण केला. या लहान वयात दुर्दम्य उर्जा आणि विलक्षण कौशल्य कौतुकास्पद आहे.”
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन. तुमची जोमदार कामगिरी आणि सांघिक कार्याने प्रत्येक भारतीयाचे हृदय जिंकले आहे. तुम्ही भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. आगामी काळात तुम्ही भारतासाठी आणखी सन्मान प्राप्त कराल हीच सदिच्छा.”
बर्मिंघम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “एकमेकांसह स्पर्धेत एकत्र खेळणे आणि जिंकणे याची एक वेगळीच लज्जत आहे. @sharathkamal1 आणि श्रीजा अकुला या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवत टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारातील प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्यांनी दाखविलेली हिम्मत आणि चिकाटी यांचे मी कौतुक करतो. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमधील ज्या प्रकारांमध्ये शरथ याने भाग घेतला त्या प्रत्येक प्रकारात अंतिम फेरीपर्यंत पोहोचून त्याने बजावलेली कामगिरी अत्युत्कृष्ट आहे.''
बर्मिंघम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्यपदक मिळविल्याबद्दल श्रीकांत किदाम्बी याचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि ट्विट संदेशात ते म्हणाले; “भारतीय बॅडमिंटन मधील दिग्गज खेळाडू @srikidambi याने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील वैयक्तिक प्रकारातील सामन्यात कांस्यपदक मिळविले आहे. राष्ट्रकुल स्पर्धांतील हे त्याचे चौथे पदक त्याचे खेळातील कौशल्य आणि सातत्य दर्शविते. त्याचे अभिनंदन. या खेळात नव्याने भाग घेणाऱ्या खेळाडूंना तो प्रेरणा देत राहो आणि भारतासाठी आणखी अभिमानास्पद कामगिरी त्याच्या हातून होवो ही सदिच्छा #Cheer4India.”
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ट्विट करून ते म्हणाले; “क्रिकेट हा खेळ आणि भारत यांना एकमेकांपासून वेगळे करता येणे अशक्य आहे. आपल्या महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तम खेळ केला आणि देशासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे रौप्य पदक पटकाविले. राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटमध्ये आपण मिळविलेले हे पहिलेच पदक असल्यामुळे ते आपल्यासाठी नेहमीच खूप खास असेल. आपल्या महिला क्रिकेट संघातील सर्व सदस्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा.”
या स्पर्धांमध्ये कांस्यपदकावर नाव कोरणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आणि ट्विट संदेशात ते म्हणाले; “बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारात कांस्यपदक मिळविणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा अत्यंत अभिमान वाटतो आहे. राष्ट्रकुल स्पर्धांसाठी निघण्यापूर्वी ट्रीसाने मला गायत्रीशी असलेल्या तिच्या मैत्रीबद्दल सांगितले होते. पण या स्पर्धेत पदक जिंकले ती कशा प्रकारे आनंद साजरा करेल याबद्दल ती जरा साशंक होती. मला वाटते आतापर्यंत तिने त्यासंदर्भातील योजना निश्चित केली असेल.”
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “सागर अहलावत याची उत्कृष्ट लढत ! राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदन. या क्रीडा प्रकारातील भारताच्या शक्तिशाली क्रीडापटूंपैकी हा एक क्रीडापटू आहे आणि त्याचे हे यश मुष्टीयोद्ध्यांच्या युवा पिढीला प्रेरणा देईल. आगामी काळात भारताची मान अभिमानाने उंचावणारी त्याची खेळी तो यापुढेही कायम ठेवेल हीच सदिच्छा. #Cheer4India”
पंतप्रधानांनी सौरव घोशाल आणि दीपिका यांचे अभिनंदन करून ट्विट केले, “राष्ट्रकुल स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारांमध्ये आपल्या खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करताना पाहणे हा मोठा आनंद असतो. स्क्वाशमधील मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @SauravGhosal आणि @DipikaPallikal यांचे अभिनंदन. त्यांनी उत्कृष्ट कौशल्य आणि उत्तम सांघिक खेळाचे दर्शन घडविले. त्या दोघांनाही खूप शुभेच्छा. #Cheer4India.”
“सांघिक खेळाला मोठे बळ! @sharathkamal1 आणि @sathiyantt यांच्या चैतन्यपूर्ण संघाने पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळविल्याबद्दल अत्यंत आनंद झाला आहे. या उत्कृष्ट खेळाडूंना खूप शुभेच्छा. #Cheer4India.”
पंतप्रधानांनी निखत झरीन हिचे अभिनंदन करून पुढील ट्विट संदेश दिला आहे, “निखत झरीन हा भारताचा अभिमान आहे. तिच्या कौशल्यांसाठी नावाजली जाणारी ती एक जागतिक दर्जाची खेळाडू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने मोठे सातत्य राखले आहे. भविष्यातील प्रयासांसाठी मी तिला शुभेच्छा देतो. #Cheer4India.”
महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी अन्नू राणी हिचे अभिनंदन केले आहे. ट्विट करून ते म्हणाले; “अन्नू राणी ही उल्लेखनीय खेळाडू आहे. तिने या स्पर्धेत उत्कृष्ट लवचिकता आणि आघाडीच्या कौशल्यांचे दर्शन घडविले. तिने भालाफेक प्रकारात कांस्यपदक मिळविल्याचा मला मोठा आनंद झाला आहे. तिचे अभिनंदन. येत्या काळात ती तिची ही उत्कृष्ट कामगिरी अशीच सुरु ठेवेल असा मला विश्वास वाटतो. #Cheer4India”
पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले; “बर्मिंघमला सुरु असलेल्या क्रीडास्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या आपल्या पथकाने केलेली उत्कृष्ट कामगिरी बघून आनंद झाला.या क्रीडा प्रकारात 10,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळविल्याबद्दल संदीप कुमार याचे अभिनंदन. #Cheer4India”
ट्विट संदेशात पंतप्रधान पुढे म्हणाले, ““बर्मिंघमला सुरु असलेल्या स्पर्धांमध्ये तिहेरी उडी स्पर्धेत अब्दुल्ला अबूबाकर याने रौप्य पदक मिळविलेले पाहून फार आनंद झाला. हे पदक म्हणजे मोठी मेहनत आणि उल्लेखनीय कटिबद्धता यांचे फळ आहे. भविष्यातील स्पर्धांसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. #Cheer4India"
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या अॅथलेटिक्स प्रकारात तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल एल्डोस पॉल याचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे, त्यांनी ट्विट केले, "आजची तिहेरी उडीची फेरी ऐतिहासिक आहे. आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रतिभावान खेळाडू एल्डहोस पॉलचे अभिनंदन ज्याने सुवर्णपदक जिंकले आहे आणि यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत सातत्य राखले केले. त्याचे समर्पण कौतुकास्पद आहे. #Cheer4India"
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ प्रतिभावान अमित पंघालमुळे आपल्या पदकांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. आपल्या सर्वात प्रशंसनीय आणि कुशल मुष्टियोद्धयांपैकी तो एक आहे, ज्याने सर्वोच्च कौशल्य दाखवून दिले. सुवर्णपदक पटकवल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. #Cheer4India"
नितूचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले , “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात मोठ्या मेहनतीने सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितू घंघासचे अभिनंदन. ती मेहनतीने आणि अत्यंत उत्कटतेने खेळत आहे. तिचे हे यश मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराला अधिक लोकप्रियता मिळवून देणार आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. #Cheer4India"
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. पंतप्रधानांनी ट्विट केले, “भारताचे हॉकीशी विशेष नाते आहे. त्यामुळेच , हे निश्चित आहे की कांस्य पदक जिंकल्याबद्दल प्रत्येक भारतीयाला आपल्या महिला हॉकी संघाचा अभिमान वाटणे साहजिक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेक वर्षांनंतर प्रथमच महिला संघ पोडियमवर दिसत आहे. या संघाचा अभिमान वाटतो ! #Cheer4India"
अनुराग सिंह ठाकूर यांनी सर्व विजेत्यांचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले.
ठाकूर यांनी ट्विट केले, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये प्रथमच सहभागी झालेल्या सागरचे पदकाबद्दल अभिनंदन. यावेळी तू सुवर्णपदक जिंकू शकला नाहीस मात्र रिंगमध्ये तू दाखवलेली क्षमता हेच दाखवते की तू देशाला आणखी गौरव मिळवून देशील.”
"बॅडमिंटन दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी एकूण पदकतालिकेत केवळ भर टाकली नाही तर #CWG2022 मध्ये भारताकडून प्रथमच खेळत विजय संपादन केला. "
“#CWG2022 च्या टेबलटेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या शरथ कमल आणि श्रीजा यांनी सुवर्णपदक पटकावून कौशल्याचे शक्तिशाली प्रदर्शन घडवले . या संघाचे अभिनंदन , ज्याने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.”
“भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत रौप्यपदक पटकवल्यामुळे खेळामध्ये भारताच्या मुलींची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. प्रथमच सहभागी होणे हे नेहमीच संस्मरणीय असते आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवून संघाने आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली . शाब्बास ! #WomenInBlue”
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील चौथ्या पदकाबद्दल किदम्बी श्रीकांतचे अभिनंदन. या कांस्यपदकासाठी छान लढत दिली होती आणि तुझा तोच आत्मविश्वास दिसला जो थॉमस चषक जिंकल्यानंतर मी पाहिला होता !! कोर्टावरचे तुझे सातत्य वाखाणण्याजोगे आहे.”
“निखत झरीनने प्रतिस्पर्धी कार्ली एमसी नॉल (NIR) वर वर्चस्व गाजवले आणि #CWG2022 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकले”
“#CWG2022 मध्ये भारतासाठी टेबल टेनिसमध्ये दुसरे पदक मिळवून दिल्याबद्दल अचंता शरथ कमल आणि जी साथियान यांचे अभिनंदन. तुम्ही भारताच्या सर्वात अनुभवी बॅडमिंटन जोडी आहात आणि आजच्या रौप्यपदकासाठीच्या लढतीने ते पुन्हा सिद्ध केले!”
“एल्डोस पॉलने आज 17.03मी वैयक्तिक सर्वोत्तम प्रयत्नांसह राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ट्रिपल जम्पर बनून आपल्या सर्वांना अभिमानास्पद कामगिरी केली आहे!!! 17 मीटर उडी मारून सुवर्णपदक मिळवणे खरोखरच रोमहर्षक आहे. #Cheer4India"
“CWG22 मध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये 17.02 प्रयत्नांसह 1-2 पूर्ण करण्याचा अब्दुल्ला अबूबकरचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न. कधीही हार न मानण्याच्या भावनेने तो खेळला आणि रौप्य पदकापर्यंत मजल मारली हे दीर्घकाळ स्मरणात राहील. #Cheer4India"
"एक उत्कंठावर्धक थ्रो! राष्ट्रकुल स्पर्धा 22 मध्ये महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवण्याचा किती छान प्रयत्न आहे, अन्नू राणीने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीतून पुनरागमन केले आणि एक साहसी स्पर्धक म्हणून स्वत: सिद्ध केले आहे! #Cheer4India"
“राष्ट्रकुल स्पर्धा 22 मधील संदीप कुमारचे 10000 मीटर रेस वॉकमध्ये कांस्यपदक हे दृढनिर्धार आणि कठोर परिश्रमाचे शानदार उदाहरण आहे. 36 वर्षीय खेळाडूने हे दाखवून दिले आहे की वय केवळ एक आकडा आहे आणि क्षमतेनुसार कामगिरी ही महत्त्वाची आहे . #Cheer4India"
“सप्ताह अखेरीस पदकांची लयलूट ! अमित पंघालने “राष्ट्रकुल स्पर्धा 22 मध्ये पुरुषांच्या 51 किलो वजनी मुष्टियुद्ध प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारतातील प्रमुख मुष्टियोद्धयांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनंदन! आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो !”
"सुवर्ण !! शाब्बास, नितू घंघास!!! दोनदा जागतिक युवा अजिंक्यपद विजेत्या नितुने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 48 वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अभिमान वाटतो तुझा , चॅम्पियन!”
“कांस्यपदक जिंकल्याबद्दल सविता पुनिया आणि महिला हॉकी संघाचे अभिनंदन! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडला दिलेली लढत ही एक उत्कृष्ट कामगिरी . गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी अभूतपूर्व आहे.”
* * *
S.Kakade/S.Kane/S.Chitnis/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849972)
Visitor Counter : 1163