उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी लाल किल्ला येथून खासदारांच्या ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला


खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रध्वजाशी असलेले भावनिक नाते घेऊन जावे असे उपराष्ट्रपतींचे आवाहन

‘आपण जेव्हा अभिमानाने आपला राष्ट्रध्वज फडकावतो तेव्हा त्यातून एकता आणि सार्वत्रिक बंधुत्वाची आपली राष्ट्रीय मूल्ये प्रतिबिंबित व्हायला हवी’

Posted On: 03 AUG 2022 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज खासदार तसेच निवडून आलेल्या इतर प्रतिनिधींना  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि लोकांचे राष्ट्रध्वजाशी असलेले भावनिक नाते यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली येथील लाल किल्ला ते विजय चौक या मार्गावर आज निघालेल्या ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीला उपराष्ट्रपतींनी झेंडा दाखवला. भारतीय नागरिक आणि आपला राष्ट्रध्वज यांच्यात व्यक्तिगत नाते रुजविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या रॅलीचे आयोजन केले होते. अनेक केंद्रीय मंत्री देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या या उपक्रमाची प्रशंसा करत, नायडू म्हणाले की, स्वातंत्र्यदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या उत्सवांनी आपल्याला “वसाहतवादी साम्राज्याविरुद्धच्या संघर्षात आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या अगणित बलिदानांची आठवण करून द्यायला हवी.” स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याच्या आणि सामाजिक एकतेच्या कथांचे आपण पुनरावलोकन केले पाहिजे असे ते म्हणाले. “आपण जेव्हा अभिमानाने आपला राष्ट्रध्वज फडकावतो तेव्हा त्यातून एकता, एकोपा आणि सार्वत्रिक बंधुत्वाची आपली राष्ट्रीय मूल्ये प्रतिबिंबित आणि अधोरेखित व्हायला हवी’अशी सूचना देखील उपराष्ट्रपतींनी केली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री किशन रेड्डी, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय संसदीय व्यवहार आणि संस्कृती विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि व्हि.मुरलीधरन यांच्यासह अनेक खासदारांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847825) Visitor Counter : 136