पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान कार्यालय चेन्नईमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 28 JUL 2022 9:16PM by PIB Mumbai

शुभ संध्याकाळ चेन्नई! वणक्कम ! नमस्ते!

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.  स्टॅलिन जी, मंत्रीवर्ग आणि मान्यवर, फिडे (FIDE) चे अध्यक्ष अर्काडी डव्होरकोवी, या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व बुद्धिबळपटू आणि संघ, संपूर्ण जगातले बुद्धिबळप्रेमी, महिला आणि सज्जन हो, आपल्या सर्वांचे भारतामध्ये होत असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मी स्वागत करतो. बुद्धिबळाचे स्वगृह असलेल्या देशात म्हणजेच भारतात ही सर्वात प्रतिष्ठेची बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशा काळामध्ये ही स्पर्धा आपल्या देशात होत आहे. वसाहतवादी राजवटीपासून भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत. आपण यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आमच्या देशासाठी अतिशय महत्वाच्या वेळी तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात, हा एकप्रकारे तुमचाही सन्मान आहे.

मित्रांनो,

या स्पर्धेच्या आयोजकांचे मी कौतुक करू इच्छितो. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी स्पर्धेसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. भारतात आम्ही ‘अतिथि देवो भव’ या उक्तीवर विश्वास ठेवतो. याचाच अर्थ अतिथी हा देवासारखा असतो, असे आम्ही मानतो. हजारो वर्षांपूर्वी संत थिरूवल्लूरू यांनी म्हटले आहे की, ‘‘ इरून- दोम्बी इलवाड- वदेल्लाम विरून - दोम्बी वेडाणमई सेय्दर पोरूट्टु’’

याचा अर्थ असा आहे की, उदारनिर्वाहासाठी कमावणे आणि निवारा, घर असणे या सर्वांचा उद्देशच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तुम्हाला स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करणे शक्य व्हावे, यासाठी आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे मदत करू.

मित्रांनो,

44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड म्हणजे अनेक प्रकारेचे नवे उपक्रम आणि विक्रमांची स्पर्धा आहे. बुद्धिबळाची जननी असलेल्या भारतामध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. तसेच तीन दशकांनंतर ही स्पर्धा प्रथमच आशियामध्ये होत आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक देश सहभागी होत आहेत. तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्याही आत्तापर्यंतची सर्वाधिक आहे. महिला विभागामध्ये सर्वाधिक प्रवेशिका आल्या आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा प्रारंभ यंदा प्रथमच मशाल प्रज्वलित करून झाला. अशा विविध गोष्टींमुळे यंदाचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील.

 

मित्रांनो,

यंदा आमच्या देशाचा अमृत महोत्सव असल्यामुळे बुद्धिबळ ऑलिम्पिायाड मशाल प्रतिष्ठित 75 स्थानांचा प्रवास करून आली आहे. या मशालीने 27 हजार किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास करून जणू युवकांची मने प्रज्वलित केली आहेत. आणि युवामंडळींना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आम्हा प्रत्येक भारतीयांच्यावतीने एफआयडीईचे मी मनापासून आभार मानतो.

 

मित्रांनो,

या बुद्धिबळ स्पर्धांसाठी निवडण्यात आलेले हे स्थान या खेळासाठी अतिशय योग्य, समर्पक आहे. तामिळनाडू राज्यात अनेक मंदिरे आहेत, त्यामध्ये उत्तम शिल्पकृतींमध्ये वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांच्या आकृती कोरलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. आपल्या संस्कृतीमध्ये क्रीडा प्रकारांना नेहमीच दिव्य मानण्यात आले आहे. वास्तविक, तामिळनाडूमध्ये तुम्हाला चतुरंग वल्लभनाथरचे मंदिरही सापडते. हे मंदिर तिरूपुवनूर येथे असून त्या मंदिराविषयी बुद्धिबळाशी संबंधित अतिशय रंजक कथा सांगितली जाते. इतकेच नाही तर देवानेही राजकुमारींबरोबर बुद्धिबळ खेळल्याचे सांगितले जाते. साहजिकच आहे की, तामिळनाडू आणि बुद्धिबळाचा इतिहास यांच्यामध्ये  खूप दृढ संबंध आहे, असे म्हणता येईल. म्हणूनच भारताच्या दृष्टीने तर तामिळनाडू हे बुद्धिबळाचे शक्तीस्थान आहे. या राज्याने भारताला अनेक ‘ग्रॅंडमास्टर’ दिले आहेत. हे एक सर्वोत्तम मन-बुद्धीचे गृहस्थान आहे. इथली संस्कृती सळसळती आहे आणि तमिळ ही जगातली सर्वात जुनी भाषा आहे. तुम्हा सर्वांना चेन्नई, महाबलीपूरम शहरे आणि आसपासचा परिसर पहायला नक्कीच मिळेल, अशी मला आशा आहे.

मित्रांनो,  खेळ फार सुंदर असतात, याचे कारण म्हणजे खेळांमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची ताकद आहे. खेळांमुळे लोकांना आणि समाजाला जवळ आणण्याचे काम होते. खेळांमुळे संघभावना जोपासली जाते. दोन वर्षांपूवी या जगाने शतकातल्या सर्वात मोठा महासाथीच्या विरोधात लढा द्यायला प्रारंभ केला. मधल्या मोठ्या काळामध्ये जीवन जणू एका जागी थांबल्यासारखे झाले होते. या काळातही अनेक क्रीडा स्पर्धांनी  संपूर्ण जगाला जवळ आणले. प्रत्येक स्पर्धांनी जणू एक संदेश दिला की, आपण ज्यावेळी संघटित-एकत्रित असतो, त्यावेळी अधिक मजबूत, शक्तीशाली असतो. आपण एकत्रित असताना अधिक चांगले असतो. अगदी हाच उत्साह, चैतन्य मी आत्ता पहात आहे.  कोविडपश्चात काळाने आपल्याला शारीरिक तंदुरूस्ती आणि निरामय आरोग्य त्याचबरोबर सुदृढ मन यांचे महत्व किती आहे, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे खेळांचे महत्वही लक्षात आले असून यामध्ये असलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देवून त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे महत्वाचे आहे.

मित्रांनो,

क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने आत्ता देशाला खूप चांगले दिवस आले आहेत, असा चांगला काळ यापूर्वी देशातल्या क्रीडा क्षेत्राने याआधी अनुभवला नाही, हे सांगताना मला आनंद होतोय. भारताने आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि डेफलिम्पिक स्पर्धांमध्ये दाखवला आहे. यापूर्वी ज्या खेळांमध्ये भारताने कामगिरी दाखवली नाही, त्या खेळांमध्ये पदकांची कमाई करून भारताने आपली चमक दाखवली आहे.  आज, क्रीडा क्षेत्रसुद्धा  व्यवसाय करण्यासाठी उत्तम पर्याय बनू शकतो, हे लक्षात आले आहे. भारतामध्ये एक चांगली क्रीडा संस्कृती रूजत आहे. याला कारण म्हणजे युवकांची उूर्जा आणि पोषक वातावरण  हे क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असणारे  दोन घटक उत्तम प्रकारे एकत्रित आले आहेत. आपल्यामध्ये अनेक प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. विशेष म्हणजे हे खेळाडू देशातल्या लहान शहरांतून आणि गावांमधून आले आहेत. हेच खेळांना समृद्ध करीत आहेत. भारताच्या क्रीडा क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीचे नेतृत्व महिला खेळाडू करत आहेत, यामुळे अधिकच आनंद वाटतो. देशात आता क्रीडा क्षेत्राचे व्यवस्थापन, प्रोत्साहनात्मक संरचना आणि पायाभूत सुविधांमध्येही अगदी क्रांतिकारी परिवर्तन घडून आले आहे.

मित्रांनो,

आज आंतरराष्ट्रीय खेळासाठी खूप चांगला दिवस आहे. आज  भारतामध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेला प्रारंभ होत आहे. तसेच इंग्लंड (यू. के.) मध्ये 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे. जगाच्या कानाकोप-यातून येणारे हजारो खेळाडू आपल्या देशाचा मान उंचावण्यासाठी या स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवणार आहेत. या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो !!

मित्रांनो,

खेळामध्ये कोणीही पराभूत होत नसतो. तिथे जिंकणारा असतो आणि तिथे भविष्यातले विजेते असतात.  इथे 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेसाठी आलेल्या सर्व संघांना आणि खेळाडूंना मी शुभेच्छा देतो तुम्ही इथून जाताना भारताविषयी खूप चांगल्या आठवणींचा ठेवा आपल्या बरोबर घेवून जाल, या आठवणी तुमच्या कायम स्मरणात राहतील, अशी मी आशा करतो.  भारत  नेहमीच अगदी मुक्तपणे,  हात पसरून तुमचे स्वागत करेल. सर्वांना सदिच्छा! आता मी 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचे उद्घाटन झाल्याचे घोषणा करतो! चला खेळाला प्रारंभ करू या!!

***

S.Thakur/S.Bedekar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846115) Visitor Counter : 180