मंत्रिमंडळ
केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 वर्षाखालील महिलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (फिफा) महिला विश्वचषक 2022 चे भारतात आयोजन करण्यासंदर्भात हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास दिली मंजुरी
Posted On:
27 JUL 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 वर्षाखालील महिलांच्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धा 2022 चे भारतात आयोजन करण्यासंदर्भातील हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे.
भारतात 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. ही सातवी द्विवार्षिक युवा स्पर्धां असून फिफा महिला फुटबॉल स्पर्धा भारताच्या यजमानपदात प्रथमच होईल. 17 वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक 2017 या स्पर्धांचा सकारात्मक वारसा पुढे नेत देश या विशिष्ट क्षणासाठी सज्ज होत आहे ज्यामध्ये जगभरातील युवा महिला फुटबॉलपटू मानाचा चषक जिंकण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करतील.
वित्तीय खर्च:
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या मदत योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या स्पर्धांच्या कालावधीत, मैदानाची देखभाल, स्टेडीयममधील वीजपुरवठा, उर्जा आणि केबल , स्टेडीयम आणि प्रशिक्षण स्थळाचे ब्रांडिंग इत्यादीसाठी एआयएफएफ अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला 10 कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात येणार आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये:
- 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये भारतातील महिला फुटबॉल खेळाला अधिक बळकटी देण्याची क्षमता आहे.
- 17 वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक 2017 या स्पर्धांचा सकारात्मक वारसा पुढे नेत देश महिला फुटबॉलच्या या विशिष्ट स्वरूपाच्या क्षणासाठी सज्ज होत असून या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम युवा महिला फुटबॉलपटू मानाचा चषक जिंकण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करतील.
- सकारात्मक वारशासाठी खालील उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत:
- फुटबॉल नेतृत्व तसेच निर्णय-घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ करणे
- भारतातील अधिकाधिक मुलींना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहन देणे
- लहान वयापासूनच समान खेळाच्या संकल्पनांचा स्वीकार करून महिला-पुरुष सहभागाचे समर्थन करणे
- भारतात महिलांसाठी फुटबॉलखेळाचे मानक सुधारण्याची संधी
- महिलांच्या क्रीडास्पर्धांचे व्यावसायिक मूल्य सुधारणे
औचित्य :
17 वर्षांखालील महिलांची फिफा विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत मानाची स्पर्धा असून भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनातून अधिकाधिक युवा महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे भारतात फुटबॉलचा खेळ अधिकाधिक विकसित होण्यास मदत होईल. या स्पर्धेमुळे भारतीय मुलींना पसंतीचा खेळ म्हणून फुटबॉलची निवड करण्यास मदत होईलच पण त्याचबरोबर देशातील मुलींना आणि महिलांना फुटबॉल आणि एकूणच खेळांचा स्वीकार करणे अधिक सोपे होईल.
पार्श्वभूमी:
17 वर्षांखालील महिलांची फिफा विश्वचषक स्पर्धा ही फिफा संघटनेतर्फे आयोजित केली जाणारी 17 वर्षे अथवा त्याखालील वयाच्या महिला खेळाडूंची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा 2018 साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर पारंपरिकरित्या सम क्रमांकाच्या वर्षी आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा 6 वा भाग 13 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत उरुग्वे येथे भरविण्यात आला. स्पेन देश सध्या 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा विजेता आहे. भारतामध्ये या स्पर्धेचा 7 वा भाग आयोजित करण्यात आला असून त्यात भारतासह एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. भारतात भुवनेश्वर, नवी मुंबई आणि गोवा या तीन ठिकाणी या स्पर्धेच्या फेऱ्या होतील असे एआयएफएफने जाहीर केले आहे. भारताने 6ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2017 या कालावधीत नवी दिल्ली, गुवाहाटी,मुंबई,गोवा,कोची तसेच कोलकाता या सहा विविध ठिकाणी 17 वर्षांखालील पुरुषांच्या फिफा विश्वचषक भारत-2017 या स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद यशस्वीपणे सांभाळले होते.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845598)
Visitor Counter : 218