माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चुकीची धारणा निर्माण होत असेल तर माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केले आकाशवाणी भवनात राष्ट्रीय प्रसारण दिन कार्यक्रमाचे उद्घाटन
जिथे स्वातंत्र्यापासून शिक्षणपद्धती कमी पडली तिथे आकाशवाणी आणि दूरदर्शनने स्वातंत्र्यसंग्रामातील 500 हून अधिक अज्ञात नायकांच्या गाथा सांगितल्या- अनुराग ठाकूर
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2022 8:29PM by PIB Mumbai
‘ये आकाशवाणी है’, या चिरकालीन शब्दांना प्रत्येक भारतीय ओळखतो, त्या शब्दांचा प्रतिध्वनी आज आकाशवाणी भवन येथील रंग भवन सभागृहात उमटला. अनुराग ठाकूर यांनी ते शब्द उच्चारले फक्त त्याला- और आज आप सूचना प्रसारण मंत्री को सुन रहे है- हे शब्द जोडून. हे त्यांचे प्रारंभीचे शब्द राष्ट्रीय प्रसारण दिन समारंभाचे उद्घाटन करणारे होते. आजच्याच दिवशी 1927 मध्ये आकाशवाणीने आपला मोठा आणि गौरवशाली प्रवास सुरू केला होता.
दूरचित्रवाणी आणि त्यानंतर इंटरनेटच्या आगमनाने रेडिओवर अस्तित्वाचे संकट कोसळणार आहे असे काही लोकांचे मत असताना रेडिओने स्वत:चे श्रोते ओळखले आणि केवळ स्वत:ची प्रासंगिकता, समर्पकताच नाही तर त्याची विश्वासार्हताही राखली, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
जेव्हा लोकांना निःपक्षपाती बातम्या ऐकायच्या असतात तेव्हा ते’ साहजिकच ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या बातम्या ऐकतात, असे त्यांनी पुढे नमूद केले. देशाचा 92 टक्के भूगोल आणि 99 टक्क्यांहून अधिक लोकांपर्यत आकाशवाणी पोहोचते ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गार ठाकूर यांनी काढले.
एक व्यासपीठ म्हणून रेडिओचे महत्त्व सांगताना ठाकूर म्हणाले की, अनेक पंतप्रधान आले, पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणले तसे रेडिओचे महत्त्व ओळखू शकले नाहीत. मोदी यांनी आपल्या मासिक मन की बात कार्यक्रमाचे व्यासपीठ बनवून रेडिओला देशातील जनतेशी थेट संपर्क साधण्याचे माध्यम बनविले, असे ठाकूर म्हणाले.

खाजगी माध्यमांबद्दल कुठेतरी चुकीची धारणा निर्माण होत असेल, अनेक विषयांवर ‘मीडिया ट्रायल’, घेऊन आपली मते लादली जात असतील तर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका अनुराग ठाकूर यांनी मांडली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सार देणाऱ्या आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन संस्थांना त्यांच्या भूमिकेचे श्रेय त्यांनी दिले. स्वातंत्र्यानंतरच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अनेक प्रादेशिक स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकांचा उल्लेख नाही मात्र रेडिओ आणि दूरदर्शनने देशाच्या कानाकोपऱ्यातून पाचशेहून अधिक अज्ञात वीरांची माहिती तयार केली आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील दिलेल्या योगदानाचा गौरव करून तो इतिहास राष्ट्रासमोर सादर केला.
आकाशवाणी आणि दूरदर्शन या संस्थांकडे असलेल्या कंटेंट/मजकुराचे महत्त्व ठाकूर यांनी अधोरेखित केले. कंटेंटच लोकांना वाहिन्यांकडे आकर्षित करतो आणि टॉवरद्वारे तुम्ही कितीही लोकांपर्यंत पोहोचलात तरी तुमचा मजकूर सकस नसेल, तर त्याला महत्त्व मिळत नही, असे मत त्यांनी मांडले. डिजिटल युगात रेडिओ लोकांमध्ये आपली उपस्थिती अधिक बळकट करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मंत्री महोदयांनी दूरदर्शनवरील नवीन मालिका- कॉर्पोरेट सरपंच: बेटी देश की, जय भारती, सुरों का एकलव्य आणि ये दिल मांगे मोर तसेच स्टार्टअप चॅम्पियन्स 2.0 चे प्रोमो जारी केले.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य लढ्यात रेडिओने बजावलेली महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध संवाद साधण्याचे साधन म्हणून रेडिओचा उपयोग केला. देशाच्या दुर्गम कानाकोपऱ्यांना जोडण्यासाठी रेडिओने बजावलेली भूमिकेची दखल मुरूगन यांनी घेतली आणि प्रसार भारती ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रक्षेपक संस्था असल्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांनी टेलिव्हिजन आणि रेडिओ या दोन माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनमधील बातम्यांच्या मजकुराची विश्वासार्हता खाजगी माध्यमांपेक्षा चांगली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून समोर आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी आकाशवाणीचे महासंचालक एन वेणुधर रेड्डी, प्रसार भारती, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
R.Aghor/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844269)
आगंतुक पटल : 231