अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणतात, पृथ्वीच्या निम्न कक्षेत मानवी अंतराळ उड्डाण क्षमता प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्रो स्वदेशी अंतराळ पर्यटन विकसित करण्याच्या प्रक्रियेत


अंतराळ विभाग सर्वसमावेशक, एकात्मिक अंतराळ धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेतः डॉ. जितेंद्र सिंग

Posted On: 21 JUL 2022 12:17PM by PIB Mumbai

पृथ्वीच्या निम्न कक्षेतील मानवी उड्डाण क्षमता प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्रो  स्वदेशी अंतराळ पर्यटन विकसित करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार) मंत्री, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री, अणु उर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे.

राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिलेल्या माहितीत डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधीकरण केंद्र (इन-स्पेस) सुरूवातीपासून शेवटपर्यंत अंतराळ उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न करत असून यात अंतराळ पर्यटनाचाही समावेश आहे.

अंतराळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्यावर मंत्री म्हणाले की,  भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) अंतराळ उपक्रमांच्या विविध प्रकारच्या क्षेत्रांसंदर्भात 61 देशांकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंधांचा पाठपुरावा करते.

भारतीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र, अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक खिडकी संस्था म्हणून तयार करण्यात आले असून अंतराळ विज्ञानात स्वारस्य असलेले तरूण व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा समावेश करून त्याद्वारे अंतराळ कार्यक्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन, आधार देणे आणि प्राधिकृत करण्याचा त्याचा उद्देश आहे.

इन स्पेस देशभरातील इस्रो केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या तांत्रिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन खाजगी संस्थांना सामायिक करण्यासाठी सक्षम यंत्रणा घेऊन येईल.

एका संबंधित प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंग यांनी माहिती दिली की, अंतराळ विभाग (डीओएस) अंतराळ धोरणाचा सर्वसमावेशक, एकात्मिक मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतला आहे, जे धोरण खाजगी भारतीय अंतराळ उद्योगाच्या उपक्रमांना दिशा प्रदान करेल.

***

S.Thakur/U.Kulkarni/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843381) Visitor Counter : 267