गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पोलीस प्रशिक्षण संस्थाच्या (सीपीटीआयएस)कार्याचा आढावा घेणारी बैठक संपन्न
अपेक्षा पूर्ण करणाऱ्या, कर्तव्यभावना जागृत करणाऱ्या आणि ध्येय साध्य करणाऱ्या परिणामकारक प्रशिक्षण पद्धतीवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा भर
Posted On:
19 JUL 2022 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2022
केंद्रीय पोलीस प्रशिक्षण संस्थाच्या (सीपीटीआयएस)कार्याचा आढावा घेणारी बैठक, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे झाली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव, केंद्रीय पोलीस दलाचे महासंचालक तसेच पोलीस संशोधन आणि विकास मंडळाचे महासंचालक यांच्यासह केंद्रीय पोलीस प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
अपेक्षा पूर्ण करणाऱ्या, कर्तव्यभावना जागृत करणाऱ्या आणि ध्येय साध्य करणाऱ्या परिणामकारक प्रशिक्षण पद्धतीच्या आवश्यकतेवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी भर दिला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या कर्मयोगी अभियानाअंतर्गत शिपाई, उप-निरीक्षक आणि पोलीस उप-अधीक्षक पातळीपर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण समग्र दृष्टीकोनातून आयोजित व्हायला हवे. आपल्या प्रशिक्षण विषयक क्षमतांचा उत्तम वापर करून घ्यायचा असेल तर पोलिसांच्या एकूण प्रशिक्षण कार्यक्रमापैकी 60 टक्के प्रशिक्षण सर्व पोलिसांसाठी समान असले पाहिजे आणि केवळ 40 टक्के प्रशिक्षण विशिष्ट दलांवर आधारित असले पाहिजे असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, पोलिसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कालपरत्वे बदल केला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणात कडक शिस्त आणि संवेदनशीलता या दोन्ही बाबींच्या समावेशावर त्यांनी भर दिला. आधुनिक तंत्रांसोबतच या प्रशिक्षणादरम्यान पोलिसांमध्ये देशभक्तीची प्रेरणा, तंदुरुस्ती, शिस्त, संवेदनशीलता आणि स्व-समर्पणाची भावना रुजविण्याची गरज आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की पोलीस दलांच्या प्रशिक्षणात तंत्रज्ञान आणि आधुनिक साधने यांच्या वापराची माहिती देणे ही आजच्या काळाची गरज आहे, मात्र त्याचवेळी, आपण पोलिसांच्या मूलभूत कार्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. पोलिसांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा सर्व पातळ्यांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्याच्या गरजेवर त्यांनी अधिक भर दिला.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842881)
Visitor Counter : 234