आयुष मंत्रालय

पारंपरिक प्रणालींचा वापर करून कोविड-19 च्या उपचारांसाठी औषधांचा विकास

Posted On: 19 JUL 2022 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 19 जुलै 2022

आयुष मंत्रालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) आणि आयुष संस्था यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले एक आंतर-विद्या शाखीय आयुष संशोधन आणि विकास कृती दल स्थापन केले आहे. प्रतिबंधक उपायांबाबतच्या क्लिनिकल संशोधनासंबंधित मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार करण्यासाठी तसेच कोविड-19 बाधित रुग्णांच्या उपचारात अश्वगंधा, ज्येष्ठीमध, गुडुची + पिप्पली आणि पॉलिहर्बल फॉर्म्युलेशन (आयुष-64) या चार औषधाच्या वापराबाबत संशोधन करण्यासाठी आंतर विद्या शाखीय आयुष संशोधन आणि विकास कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत संशोधन परिषद आणि राष्ट्रीय संस्थांद्वारे एकूण 150 क्लिनिकल, प्री-क्लिनिकल आणि एपिडेमियोलॉजिकल अभ्यास हाती घेण्यात आले आहेत.

कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपायांपैकी काही उपक्रम/उपाय खालीलप्रमाणे आहेत.

  • आयुष मंत्रालयाने, कोविडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि निरोगी कसे राहावे याबद्दल एक मार्गदर्शिका जारी केली होती. या मार्गदर्शिकेमध्ये स्वच्छता राखण्याबरोबरच हात धुणे, मास्क वापरणे इत्यादी, यासारखे साधे घरगुती उपाय देखील लोकांना सुचवले होते.
  • मंत्रालयाकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व मुख्य सचिवांना लोकांची सामान्य प्रतिकारशक्ती वाढविण्याबाबत अधिक विशिष्ट सूचना तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागांच्या समन्वयाने आवश्यक तेथे संभाव्य आयुष पद्धतीच्या वापराबाबत एक पत्र पाठविण्यात आले.
  • आयुष मंत्रालयाकडून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला (MoH&FW) एक पत्र पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयुष पायाभूत सुविधा एकत्रित करून वापरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
  • आयुष मंत्रालय, प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांसाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्व-काळजी मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करते.
  • भारत सरकारने, कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृती दलाने तयार केलेल्या आयुर्वेद आणि योगावर आधारित "राष्ट्रीय क्लिनिकल व्यवस्थापन मार्गदर्शिका" देखील जारी केली आहे.
  • आयुष मंत्रालयाने कोविड-19 दरम्यान स्वत:ची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध उपचार प्रणालीचे प्रतिबंधात्मक उपाय आणि गृह विलगीकरणात असलेल्या कोविड-19 रुग्णांवर उपचार करत असताना आयुष व्यवसायिकांना उपयोगी पडतील अशी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.
  • आयुष मंत्रालयाने कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान आयुष व्यवसायिकांसाठी नैतिक वर्तन पद्धतींबद्दल मार्गदर्शिका देखील जारी केली आहे.
  • असे कोणतेही औषध विकसित केलेले नाही ज्याचा वापर अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक औषधे किंवा सध्या कोविड-19 विरुद्ध दिल्या जाणाऱ्या लसींना पर्याय म्हणून करता येईल.

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842860) Visitor Counter : 140