वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांच्या भौतिक, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रासह औषधनिर्माण क्षेत्रातील आकांक्षा पूर्तीसाठी आफ्रिकेसमवेत सौर उर्जा, संरक्षण व्यापार आणि लष्करी देवाणघेवाण या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्याची भारताची योजना आहे : पीयूष गोयल
पेयजल पुरवठा, आरोग्य शिक्षण, फिनटेक, सौरउर्जा या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये किफायतशीर उपाययोजना आणण्यासाठी भारत आणि आफ्रिका एकत्र काम करू शकतात : पीयूष गोयल
आफ्रिकेसोबतचे भारताचे संबंध विश्वास, मैत्री आणि एकमेकांच्या गरजा समजून घेण्याच्या सखोल जाणीवेवर आधारलेले आहेत. आपले सरकार आफ्रिकेबरोबरच्या या संबंधाना सर्वोच्च प्राधान्य देते : पीयूष गोयल
भारत आणि आफ्रिका एकत्रितपणे अनेक जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकतात
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारत आणि आफ्रिका विकसनशील जगाचा आवाज म्हणून एकत्र आले
भारत आणि आफ्रिकेने एकत्रितपणे त्यांचे हितसंबंध आणि बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या समर्पकतेची जपणूक केली
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी भारतीय उद्योग महासंघ CII- एक्झिम बँक परिषदेत भारत - आफ्रिका वृद्धीकारक भागीदारी या विषयावर केले संबोधन
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2022 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2022
दोन्ही देशांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताची आफ्रिकेसोबत चार क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याची योजना आहे. त्यापैकी सौर उर्जा हे पहिले क्षेत्र असून ते स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा यामध्ये साहाय्यभूत ठरेल आणि आफ्रिकेत रोजगार निर्मिती वाढीस लागेल . दुसरे क्षेत्र म्हणजे हिंद महासागरातील संरक्षण व्यापार , लष्करी देवाणघेवाण, सशस्त्र वाहने आणि UAV चे उत्पादन. तिसरे क्षेत्र आहे ते भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा , माहिती तंत्रज्ञान / सल्ला आणि प्रकल्प निर्यात आणि चौथे म्हणजे आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल , भारतीय उद्योग महासंघ CII-EXIM बँक परिषदेत भारत - आफ्रिका वृद्धीकारक भागीदारी या विषयावर संबोधन करत होते. भारत आणि आफ्रिका या दोन राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्री वर्षानुवर्षे अधिक दृढ होत असून सामायिक इतिहास, व्यापार उदीम आणि चित्रपटांबद्दलचे प्रेम हे दोन्ही देशांमधले समान दुवे आहेत, असे त्यांनी सांगितले.
आपले सरकार आफ्रिकेबरोबरच्या या संबंधाना सर्वोच्च प्राधान्य देते, आफ्रिकेसोबतचे भारताचे संबंध विश्वास, मैत्री आणि एकमेकांच्या गरजा समजून घेण्याच्या सखोल जाणीवेवर आधारलेले आहेत, असे पीयूष गोयल म्हणाले.
भारत – आफ्रिका या दोन्ही राष्ट्रांमध्ये जगातील एक तृतीयांश लोकसंख्या एकवटलेली आहे, दोन्ही राष्ट्रात कित्येक क्षेत्रांमध्ये समन्वय आहे, त्यामुळे भारत-आफ्रिका भागीदारी आमच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि आफ्रिकेतील नागरिकांच्या समृद्धीसह आपल्या सामायिक उज्ज्वल भविष्यासाठी, भारतीय उद्योग महासंघ ,एक्झिम बँक आणि आफ्रिकन राष्ट्र यांच्यातील समन्वय मोठे परिवर्तन घडवून आणू शकेल, असे त्यांनी सांगितले.
कोविड काळातील लस-मैत्रीच्या माध्यमातून आमची घनिष्ठ मैत्री उत्तम प्रकारे दिसून येते.
ही परिषद अशावेळी आयोजित केली आहे, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आम्ही भारताच्या विकासासाठी नवीन उद्दिष्टे आणि एक नवीन दृष्टी निश्चित करत आहोत. 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना पुढील अत्यंत महत्त्वाची अशी 25 वर्षे जगाचा आर्थिक विकास, वृद्धी आणि समृद्धीला नेतृत्व देणारे राष्ट्र म्हणून भारताची नवीन ओळख निर्माण होईल, असे ते म्हणाले.
भारताला आफ़्रिकेकडून नेहमीच मिळणाऱ्या पाठिंब्याचा त्यांनी उल्लेख केला जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारत आणि आफ्रिका विकसनशील जगाचा आवाज म्हणून एकत्र आले, हे त्याचेच प्रतीक आहे, भारत आणि आफ्रिकेने एकत्रितपणे त्यांचे हितसंबंध आणि बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या समर्पकतेची जपणूक केली, भारत आणि आफ्रिका एकत्रितपणे अनेक जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकतात, असे गोयल यांनी नमूद केले.
भारत आणि आफ्रिका यांच्यातील सहकार्याचे लोक, उद्योग, व्यापार आणि सरकार हे चार स्तंभ आहेत, सुमारे 46 आफ्रिकन राष्ट्रांमध्ये भारतीय समुदायाचे वास्तव्य आहे, गेल्या 25 वर्षांत 71 अब्ज अमेरिकन डॉलर्स च्या गुंतवणुकीसह भारत आफ्रिकेतील पहिल्या 5 गुंतवणूकदारांपैकी एक आहे, असे ते म्हणाले.
भारत आणि आफ्रिका यांना जागतिक विकासाचे नेतृत्व करण्याची हीच योग्य वेळ आहे, . भारत आफ्रिकेकडे प्रगतीशील भागीदार म्हणून पाहतो. असे ते म्हणाले.
सरकार ते सरकार पातळीवर आफ्रिकेतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या ई विद्याभारत आणि ई आरोग्य भारती योजना भारताने सुरु केल्या आहेत. कोविड नंतरच्या जगात, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील भारताचे प्रभुत्व आफ्रिकेशी असलेले संबंध वृद्धिंगत करायला मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
पेय जल पुरवठा, आरोग्य शिक्षण, फिनटेक, सौरउर्जा या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये किफायतशीर उपाययोजना आणण्यासाठी भारत आणि आफ्रिका एकत्र कार्य करू शकतात, असे गोयल म्हणाले.
“जर तुम्हाला लवकर जायचे असेल तर एकटे जा, जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर एकत्र जा “ “चला एकत्र येऊया, एकत्र काम करूया आणि एकत्र वृद्धी करूया !” या उक्तीने त्यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842839)
आगंतुक पटल : 272