माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय माहिती सेवेच्या अधिकाऱ्यांची तिसरी वार्षिक परिषद नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सुरु
“सरकारच्या वतीने संवाद मजबूत करण्यासाठी ‘पाच-सी’ मंत्राचा अंगीकार करावा,” असा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला
‘सबका साथ, सबका विकास’ हा राष्ट्रीय संकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी सरकारची संवादव्यवस्था मजबूत असणे अत्यंत महत्वाचे : अनुराग ठाकूर
Posted On:
16 JUL 2022 6:03PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे, भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन झाले. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि प्रधान महासंचालक जयदीप भटनागर यांच्यासह, सत्येंद्र प्रकाश, वेणुधर रेड्डी आणि मयंक कुमार अग्रवाल यावेळी उपस्थित होते.देशभरातील माहिती प्रसारण सेवेचे अधिकारी या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाले आहेत.
यावेळी केलेल्या बीजभाषणात, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सरकारी प्रसिद्धीमाध्यमे किंवा संपर्कव्यवस्थेची पांच महत्वाची वैशिष्ठ्ये विशद केली—ही वैशिष्ठ्ये म्हणजे, नागरिक केंद्री आणि नागरिकांप्रती करुणाभाव (Citizen-Centric and Compassionate), लक्ष्यित प्रेक्षक/श्रोतृवर्गाला, त्यांच्या कल्पनांनाही प्रक्रियेत सामावून घेणे (Co-creating with Target Audience) , एकत्रित काम करणे ( Collaboration ) , निरीक्षणातून अधिकाधिक सुधारणा (Contemplation) आणि सातत्याने क्षमता वृद्धी करत राहणे (Continuous Capacity Enhancement ) , अशी ही पाच ('सी' ) वैशिष्ट्ये आहेत.
ही पाचही वैशिष्ठ्ये त्यांनी सविस्तर समजावून संगितली—प्रसिद्धीमाध्यमांकडून होणारा संवाद विषयाशी संयुक्तिक आणि समजण्यास सोपा असायला हवा, तो साधतांना नागरिकांना समोर ठेवले पाहिजे. तसेच, यात इतर हितसंबंधीय, जसे विविध सरकारी मंडळे, संस्था आणि खाजगी क्षेत्राला एकत्रित घेऊन वाटचाल करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. संवाद/संपर्क हे झपाट्याने बदलत जाणारे क्षेत्र असून नवनवी आव्हाने, जसे की बनावट बातम्या, यांसारख्या आव्हानांचा सामना करतांना, ते खोडून काढण्याचे काम आपल्याकडून चपळाईने व्हायला हवे, लोकांमध्ये त्याबद्दल अनुकूलता निर्माण होईल, असे असायला हवे, जसे आपण कोविड महामारीच्या काळात करून दाखवले.
बनावट किंवा खोट्या बातम्यांची पडताळणी करुन, त्यातील सत्य लोकांसमोर आणण्यासाठी फॅक्ट चेक विभागचा विस्तार करणे, दिव्यांग लोकांनाही बातम्या उपलब्ध व्हाव्यात अशा उपक्रमांसाठी सनदी माहिती अधिकऱ्यांनी मेहनत घेऊन, संपूर्ण परिवर्तनासाठी जे कार्यक्रम राबवले, त्यांचे अनुराग ठाकूर यांनी कौतुक केले. सरकारी संपर्क-संवाद व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवून, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठीच्या काही कल्पना आणि उपक्रमही त्यांनी सांगितले. यात प्रसारमाध्यमांच्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, संस्थात्मक बांधणी आणि राज्य सरकारांमधील समन्वय यांचा समावेश आहे. सर्व अधिकाऱ्यांनी 130 कोटी जनतेशी संपर्क साधणारे संवादक ह्या आपल्या भूमिकेचे महत्त्व लक्षात घ्यावे, असे ते सर्व अधिकऱ्यांना म्हणाले. कमीतकमी शब्दांत मार्मिक संवाद आणि कथा सांगण्याची कला यांची सांगड घालणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.त्यासोबतच, संस्थात्मक बांधणी, आणि इतर अधिकाऱ्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीच्या काळात सरकारी माध्यमांनी साधलेल्या संवादामुळे लोक आश्वस्त झाले आणि त्यांच्या मनातील भीती काढून टाकण्यात यश आले, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले . तसेच लसीकरण आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यांसारख्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल आपल्या संपर्क आणि संवाद माध्यमामुळे लोकांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण झाली असेही त्यांनी सांगितले. इतर अनेक देशांच्या तुलनेत, भारतात लसीकरणाबद्दलची भीती किंवा अविश्वास बऱ्याच अंशी कमी होता, त्यामुळेच, आपण 200 कोटी लसीच्या मात्रा देण्याचा मोठा टप्पा गाठण्याच्या जवळ आलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रशासकीय सेवेचा मुख्य उद्देश, लोकांचे सक्षमीकरण आणि आणि सेवांची सुलभ उपलब्धता, कायम नागरिक केंद्री असण्याची कटिबद्धता, संवादातून मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न, बनावट आणि खोट्या बातम्या उघड करत सत्य लोकांपर्यंत आणणे हा आहे, असे प्रधान महासंचालक जयदीप भटनागर यावेळी म्हणाले. अलिकडच्या काळात होत असलेल्या माहितीच्या स्फोटात, ही भूमिका अधिकच व्यापक आणि विस्तारीत झाली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. त्यासाठी आपल्याला नवनव्या उपाययोजना आणि साधने शोधावी लागतील, असेही ते म्हणाले.
जनसंपर्काचे आणि संवादाचे हे क्षेत्र गतिमान असणे साहजिक आहे, आहे हे लक्षात घेऊन, या दोन दिवसीय परिषदेत उदयोन्मुख आव्हाने आणि भविष्यात अत्याधुनिक संपर्क/संवादाचा आराखडा यावर चर्चा केली जाईल. या दोन दिवसीय परिषदेत होणारी सत्रे, “भारतातील संज्ञापन@2047’ “जी-20 वर भर देत भारताची परदेशात प्रतिमा निर्माण करणे’, “भारतीय जनसंपर्क व्यवस्थेची भूमिका उत्क्रांत करणे” अशी असणार आहेत. मायगोव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिषेक सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव अरिंदम बागची, आणि जी-20 साठी भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांची व्याख्याने या परिषदेत होणार आहेत.
उद्या, या परिषदेत, रेल्वे आणि दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे बीजभाषण होणार आहे. तर, समारोप माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या भाषणाने होईल.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842027)
Visitor Counter : 202