पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 16 जुलै रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आणि बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार


पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2020 मध्ये या द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला रचली होती

या 296 किलोमीटर लांबीच्या चौपदरी द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यासाठी सुमारे 14,850 कोटी रुपये खर्च आला

हा द्रुतगती महामार्ग या प्रदेशातील दळणवळण आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना देईल

Posted On: 13 JUL 2022 7:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी म्हणजे 16 जुलै 2022 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या हस्ते, जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.

देशभरात दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे आणि  रस्तेविषयक पायाभूत सुविधा सुधारण्याची कामे हाती घेणे हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 29 फेब्रुवारी 2020 रोजी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला रचणे हा या दिशेने केलेला महत्त्वाचा प्रयत्न होता.या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

यूपीईआयडीए अर्थात उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाच्या या चौपदरी 296 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात आली.  पुढील काळात या महामार्गाचा विस्तार करून हा मार्ग सहापदरी देखील करता येऊ शकेल. हा  द्रुतगती महामार्ग  चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूपजवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 35 पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रैल गावापर्यंत आहे आणि या गावाजवळ हा महामार्ग आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाला जाऊन मिळतो. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा,हमीरपुर, जालौन, ऑरैय्या आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो.

या परिसरातील दळणवळण सुविधा सुधारण्यासोबतच, बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग येथील आर्थिक विकासाला देखील मोठी चालना देणारा ठरेल आणि त्यातून स्थानिक लोकांसाठी हजारो रोजगार निर्माण होतील. बांदा आणि जालौन जिल्ह्यांमध्ये बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाशेजारील परिसरात औद्योगिक कॉरीडॉर निर्मितीचे काम यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

***

S.Kakade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841281) Visitor Counter : 221