ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कडून आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्काबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे त्वरित पालन सुनिश्चित करावे : सीसीपीएचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Posted On: 09 JUL 2022 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटकडून आकारल्या जाणाऱ्या सेवा  शुल्काबाबत ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी आल्यास, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करुन तपास करावा आणि त्याचा अहवाल 15 दिवसांत प्राधिकरणाकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या मार्गदर्शक सूचनांना व्यापक प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करण्याविषयी देखील, सीसीपीएने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी या मार्गदर्शक सूचनांची त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सेवा शुल्क आकारणे हे मार्गदर्शक सूचनांचे स्पष्ट उल्लंघन असून ग्राहकांच्या हितांना बाधा पोहचवणाऱ्या पद्धती सुरू ठेवणे अयोग्य असून अशा तक्रारींची प्राधान्याने दखल घेतली जावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

सीसीपीएने या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतरच्या काळात, म्हणजे 05 जुलै 2022 ते 08 जुलै 2022 या काळात, प्राधिकरणाला 85 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी, दिल्ली, बंगळूरु, मुंबई, पुणे आणि गाझियाबाद इथून आल्या असून, त्यांची संख्या अनुक्रमे 18, 15, 11,4 आणि 3 इतकी आहे.

जर एखाद्या ग्राहकाला हॉटेल किंवा रेस्टॉरेंटमध्ये सेवाशुल्क आकारले जात असेल, तर ते मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. ग्राहकांनी अशावेळी ग्राहकांनी हॉटेल किंवा रेस्टॉरेंट मालकांकडे बिलातून हे सेवा शुल्क वजा करण्याची विनंती करावी, किंवा ग्राहक, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक हितांचे संरक्षण खटलापूर्व स्थितीत करणारी ही एक पर्यायी ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था आहे.

तसेच, ग्राहक आयोगाकडेही या चुकीच्या व्यावसायिक पद्धतीची तक्रार नोंदवता येईल. त्वरित कारवाईसाठी ई-दाखिल पोर्टल www.edaakhil.nic.in वर ई पद्धतीने देखील तक्रार दाखल करता येईल. त्याशिवाय, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तपासासाठी ही  तक्रार नोंदवता येईल. त्याशिवाय, सीसीपीए कडे com-ccpa[at]nic[dot]in या ईमेल आयडीवर देखील तक्रार नोंदवता येईल.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840398) Visitor Counter : 199