उपराष्ट्रपती कार्यालय

महिला समानाधिकारात आडकाठी ठरणारे अडथळे दूर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


तुमचा धर्म आचरणात आणा मात्र इतरांच्या श्रद्धांचा अवमान करू नका- उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 09 JUL 2022 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

देशातील महिला समानाधिकारात आडकाठी ठरणारे अडथळे दूर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

आपली संस्कृती विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या समान सहभागाला प्रोत्साहन देत असली तरी, अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव व्हायची आहे असे ते म्हणाले.

बंगळुरूमधील माउंट कार्मेल महाविद्यालयाच्या प्लॅटिनम महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन उपराष्ट्रपतींनी आज केले. त्यानंतर ते बोलत होते. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे महिला शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  संधी मिळाली तेव्हा महिलांनी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.

भारतीय सर्वच क्षेत्रात स्वत:ला नेतृत्व म्हणून सिद्ध करत असल्याचे निरीक्षण नोंदवत, जागतिक स्तरावर भारताच्या उदयाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यालाही त्यांनी स्पर्श केला. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. एखादा आपल्या धर्माचा अभिमान बाळगू शकतो, त्या धर्माचे पालन करु शकतो, मात्र कोणालाही इतरांच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. तसे करु नये असे आवाहन नायडू यांनी केले.  धर्मनिरपेक्षता आणि इतरांच्या विचारांप्रती सहिष्णुता हा भारतीय मूल्यांचा मुख्य गाभा आहे. काही तुरळक घटना, अनेकत्ववाद आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांप्रती भारताची बांधिलकी कमी करू शकत नाहीत यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्षेत्रे झपाट्याने बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवत, कृत्रिम प्रज्ञेपासून ते माहिती (डेटा) विश्लेषणापर्यंत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यादृष्टीने शिक्षणासाठी भविष्यवेधी दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. "प्रभावी संभाषण कौशल्ये असणे तितकेच महत्त्वाचे आहे," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

करिअरचे नवनवे पर्याय आणि अगदी प्रस्थापित पर्यायांसाठी कर्मचाऱ्यांना आता विविध क्षेत्रांमध्ये व्यापक ज्ञान असणे आवश्यक आहे. तरुणांना केवळ त्यांच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान असून भागणार नाही तर इतर विषयांच्या मूलभूत ज्ञानाबाबतही त्यांनी सुसज्ज असायला हवे असे ते म्हणाले. 

न्याय्य, समता असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. शैक्षणिक संस्थांनी, तरुणांना योग्य कौशल्यांनी सुसज्ज करून केवळ रोजगारक्षमच नव्हे तर  नव भारताच्या विकासाच्या यशोगाथेचे अग्रदूत म्हणून घडवावे  असे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840383) Visitor Counter : 161