पंतप्रधान कार्यालय

अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 06 JUL 2022 6:44PM by PIB Mumbai

आसामचे सामर्थ्यवान मुख्यमंत्री  हिमंता बिस्व शर्मा जी, मंत्री  अतुल बोरा जी, केशब महंता जी, पिजूष हजारिका जी, सुवर्ण महोत्सवी सोहळा  समितीचे अध्यक्ष डॉ. दयानंद पाठक जी,  अग्रदूतचे  मुख्य संपादक आणि इतका दीर्घ काळ लेखणीने, ज्यांनी तपश्चर्या केली, साधना केली,  असे कनकसेन डेका जी,  , इतर मान्यवर, महोदय आणि महोदया,

 

आसामी भाषेतील  ईशान्येचा शक्तिशाली आवाज असलेल्या दैनिक अग्रदूतशी संबंधित सर्व मित्र परिवार  , पत्रकार, कर्मचारी आणि वाचकांचे  मी 50 वर्षांच्या - पाच दशकांच्या या सुवर्ण प्रवासाबद्दल  खूप खूप  अभिनंदन करतो , खूप खूप शुभेच्छा देतो.येणाऱ्या काळात अग्रदूतने  नवीन उंची गाठावी, यासाठी मी  भाऊ प्रांजल आणि युवा चमूला  खूप खूप शुभेच्छा देतो.

 

या सोहळ्यासाठी श्रीमंत शंकरदेव यांच्या कलाक्षेत्राची निवड हा देखील एक विलक्षण योगायोग आहे.श्रीमंत शंकरदेवजींनी आसामी कविता आणि रचनांमधून एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली होती.याच  मूल्यांना दैनिक अग्रदूतनेही आपल्या पत्रकारितेने समृद्ध केले आहे. तुमच्या वृत्तपत्राने पत्रकारितेच्या माध्यमातून देशात एकात्मता आणि एकतेची  ज्योत प्रज्वलित  ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

 

डेका जी यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक अग्रदूतने  नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. आणीबाणीच्या काळात, लोकशाहीवर सर्वात मोठा आघात झाला तेव्हाही दैनिक अग्रदूत आणि डेकाजी यांनी पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोड केली नाही.त्यांनी आसाममध्ये  भारतीय पत्रकारितेला केवळ सक्षमच केले नाही, तर मूल्याधारित पत्रकारितेसाठी नवीन पिढीही घडवली.

 

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, दैनिक अग्रदूतचा  सुवर्णमहोत्सवी सोहळा केवळ एक टप्पा पार करणे नाही तर स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये पत्रकारितेसाठी,  राष्ट्रीय कर्तव्यांसाठी  प्रेरणाही आहे.

 

मित्रांनो,

 

गेल्या काही दिवसांपासून आसामलाही पुराच्या रूपात  मोठी आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.हिमंता जी आणि त्यांचा चमू  मदत आणि बचावासाठी रात्रंदिवस काम करत आहे.  वेळोवेळी तिथल्या बर्‍याच लोकांशी याबद्दल माझे बोलणे सुरु असते. मुख्यमंत्र्यांशीही संवाद सूरु  असतो. आज मी आसामच्या लोकांना, अग्रदूतच्या वाचकांना विश्वास देतो की, केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

 

मित्रांनो,

 

भारतीय भाषांमधील पत्रकारितेची भूमिका ,भारताची परंपरा, संस्कृती, स्वातंत्र्य लढा आणि विकासाच्या प्रवासात अग्रणी राहिली आहे.आसाम हे पत्रकारितेच्या दृष्टीने गतिमान घडामोडींचे  क्षेत्र आहे.आजपासून सुमारे 150 वर्षांपूर्वी आसामी भाषेत पत्रकारिता सुरू झाली आणि ती कालांतराने समृद्ध होत गेली.

आसामने देशाला असे अनेक पत्रकार दिले आहेत, असे अनेक संपादक दिले आहेत, ज्यांनी भाषिक पत्रकारितेला नवे आयाम दिले आहेत.आजही ही पत्रकारिता सामान्य माणसाला सरकारशी आणि हिताशी  जोडण्यात मोठी सेवा देत आहे.

 

मित्रांनो,

दैनिक अग्रदूतचा  गेल्या 50 वर्षांतील प्रवास आसाममध्ये झालेल्या बदलाची कथा मांडतो. हा बदल साकारण्यात लोकचळवळीची महत्त्वाची भूमिका आहे.

लोक चळवळींनी आसामचा सांस्कृतिक वारसा आणि आसामी अभिमानाचे रक्षण केले. आणि आता आसाम लोकसहभागाच्या मदतीने विकासाची नवी गाथा   लिहित आहे.

 

मित्रांनो,

 

भारताच्या या समाजात लोकशाही अंतर्भूत आहे कारण यामध्ये प्रत्येक मतभेद चर्चेने, विचाराने सोडवण्याचा मार्ग आहे.जेव्हा संवाद असतो तेव्हा तोडगा निघतो.  .संवादातूनच शक्यता वाढतात.त्यामुळे भारतीय लोकशाहीत ज्ञानाच्या प्रवाहाबरोबरच माहितीचा प्रवाहही अखंड व निरंतर वाहत आहे.ही परंपरा पुढे नेण्यासाठी अग्रदूत हे देखील  महत्त्वाचे माध्यम ठरले आहे.

 

मित्रांनो,

 

आजच्या जगात आपण कोठेही राहत असलो तरी , आपल्या मातृभाषेतून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आपल्याला घराशी जोडले असल्याची जाणीव करून देते.

आसामी भाषेत प्रकाशित होणारे दैनिक अग्रदूत आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत होते, हे  तुम्हाला माहिती आहे.तिथून सुरु झालेला याचा प्रवास , पहिले दैनिक वृत्तपत्र बनण्यापर्यंत पोहोचला. आणि आता ते ई-पेपरच्या स्वरूपात ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहूनही तुम्ही आसामच्या बातम्यांशी जोडलेले राहू शकता, आसामशी जोडलेले राहू शकता.या वृत्तपत्राच्या  विकासाचा प्रवास  आपल्या देशाचे परिवर्तन आणि डिजिटल विकास दर्शवतो.डिजिटल इंडिया हे आज स्थानिक संपर्काचे  एक बळकट  माध्यम बनले आहे.आज जो व्यक्ती ऑनलाइन वर्तमानपत्र वाचतो, त्याला ऑनलाइन पेमेंट कसे करावे हे देखील माहित आहे. आसाम आणि देशाच्या या परिवर्तनाचे दैनिक अग्रदूत  आणि आपली माध्यमे साक्षीदार आहेत.

 

मित्रांनो,

 

आपण स्वातंत्र्याची  75 वर्षे पूर्ण करत असताना  एक प्रश्न आपण नक्की विचारायला हवा. बौद्धिक परंपरेची मक्तेदारी  एखाद्या विशिष्ट  भाषा जाणणाऱ्या काही लोकांपर्यंतच मर्यादित का रहावी ? हा प्रश्न केवळ भावनेचा नाही तर त्यामागे वैज्ञानिक तर्कशास्त्र देखील आहे. तुम्ही जरा विचार करा, मागील  तीन औद्योगिक क्रांतीच्या वेळी, भारत संशोधन आणि विकासात मागे का राहिला?  भारतात ज्ञानाची, समजून घेण्याची , नवा विचार करण्याची , नवे करण्याची परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे.

 

याचे एक मोठे  कारण हे देखील आहे की आपली ही  संपदा भारतीय भाषांमध्ये होती. गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात  भारतीय भाषांचा विस्तार थांबवण्यात आला  होता आणि आधुनिक ज्ञान-विज्ञान, संशोधन केवळ एक-दोन  भाषांपुरते सीमित  ठेवण्यात आले.  भारतातील मोठ्या समुदायाला ह्या भाषा , हे ज्ञान नव्हते . म्हणजेच ज्ञानाच्या , अनुभवाच्या कक्षा  निरंतर आखडत गेल्या. ज्यामुळे संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही मोजकेच लोक राहिले.

 

21व्या शतकात जेव्हा जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तेव्हा  भारताकडे  जगाचे नेतृत्व करण्याची खूप  मोठी संधी आहे.  ही संधी आपल्या डेटा सामर्थ्यामुळे आहे , डिजिटल समावेशकतेमुळे आहे. कुणीही भारतीय केवळ भाषेमुळे उत्तम माहिती, उत्तम ज्ञान, उत्तम कौशल्य आणि उत्तम संधी यापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे.

 

म्हणूनच आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणात भारतीय भाषांमधून शिक्षणाला प्रोत्साहन दिले.  मातृभाषेत शिकणारे हे विद्यार्थी उद्या कोणत्याही व्यवसायात गेले तरी त्यांना आपल्या क्षेत्राच्या गरजा आणि आपल्या लोकांच्या  आकांक्षा समजतील. त्याचबरोबर आमचा  आता हा प्रयत्न आहे की  भारतीय भाषांमध्ये जगातील उत्तम साहित्य उपलब्ध व्हावे. यासाठी राष्ट्रीय  भाषा अनुवाद मोहिमेवर आम्ही काम करत आहोत.

 

प्रयत्न हाच आहे की  इंटरनेट, जे ज्ञानाचे, माहितीचे खूप मोठे भांडार आहे, त्याचा प्रत्येक  भारतीय आपल्या भाषेत वापर करू शकेल. दोन दिवसांपूर्वीच यासाठी  भाषिणी हा  प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. हा भारतीय भाषांचा युनिफाईड लॅंग्वेज इंटरफेस आहे,  प्रत्येक भारतीयाला इंटरनेटशी सहजपणे जोडण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून तो माहितीच्या, ज्ञानाच्या या आधुनिक स्रोताशी , सरकारशी , सरकारी सुविधांशी सहजपणे आपल्या भाषेत जोडला जाऊ शकेल, संवाद साधू शकेल.

 

कोट्यवधी भारतीयांना इंटरनेट त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देणे सामाजिक आणि  आर्थिकदृष्ट्या  महत्वपूर्ण आहे.  सर्वात मोठी गोष्ट म्हणजे  एक भारत, श्रेष्ठ भारत भावना मजबूत करण्यात, देशातील विविध राज्यांशी  जोडण्यात, हिंडणे-फिरणे आणि संस्कृती समजून घेण्यात ते खूप मोठी मदत करेल.

 

मित्रांनो ,

 

आसामसह संपूर्ण ईशान्यप्रदेश तर पर्यटक, संस्कृती आणि जैव-विविधतेच्या बाबतीत खूपच  समृद्ध आहे. मात्र तरीही अजूनही हे संपूर्ण  क्षेत्र जेवढे व्हायला हवे होते ; तेवढे विकसित झाले नाही. आसामकडे  भाषा, गीत-संगीतच्या रूपाने जो समृद्ध वारसा आहे, तो देशात आणि जगभरात पोहचायला हवा. मागील 8 वर्षांपासून आसाम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशला आधुनिक कनेक्टिविटीच्या दृष्टीने जोडण्याचा  अभूतपूर्व प्रयत्न केला जात आहे. यामुळे आसामची , ईशान्य प्रदेशाची  , भारताची विकासातील भागीदारी सातत्याने वाढत आहे.आता भाषांच्या दृष्टीने देखील  हे  क्षेत्र डिजिटली जोडले गेले तर आसामची  संस्कृति, आदिवासी  परंपरा आणि पर्यटनाला  मोठा लाभ होईल.

 

मित्रांनो ,

 

म्हणूनच मी  अग्रदूत  सारख्या देशातील प्रत्येक भाषेत  पत्रकारिता करणाऱ्या  संस्थांना विशेष निवेदन  करतो की डिजिटल इंडियाच्या प्रत्येक  प्रयत्नांबाबत आपल्या वाचकांना जागरूक करावे. भारताच्या भविष्यातील तंत्रज्ञानाला समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवे आहेत. स्वच्छ भारत मिशन सारख्या अभियानात आपल्या माध्यमांनी जी सकारात्मक भूमिका बजावली आहे, त्याची संपूर्ण देशात आणि जगात  आजही प्रशंसा होत आहे. त्याचप्रमाणे , अमृत महोत्सवात देशाच्या संकल्पांमध्येही तुम्ही भागीदार बनून त्यांना  एक दिशा द्या, नवी  ऊर्जा द्या.

 

आसाममध्ये  जल-संरक्षण आणि त्याच्या महत्वाबाबत तुम्ही चांगलेच  परिचित आहेत. याच दिशेने  देश सध्या  अमृत सरोवर अभियान पुढे नेत आहे.  प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांसाठी देश  काम करत आहे. यामध्ये पूर्ण  विश्वा्स आहे की अग्रदूतच्या माध्यमातून आसामचा कुणीही नागरिक असा नसेल  जो यात सहभागी होणार नाही , सर्वांचे प्रयत्न नवी गती देऊ शकतात.

 

त्याचप्रमाणे, स्वातंत्र्याच्या लढाईत आसामच्या स्थानिक लोकांचे , आपल्या आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान आहे.  एक मीडिया संस्था म्हणून हा गौरवशाली भूतकाळ लोकांपर्यंत पोहचवण्यात तुम्ही मोठी  भूमिका बजावू शकता. मला खात्री आहे , अग्रदूत समाजाच्या या सकारात्मक प्रयत्नांना  ऊर्जा देण्याचे आपले  कर्तव्यं जे गेली  50 वर्षांपासून पार पाडत आहे, येणारी पुढली अनेक दशके पार पाडेल असा मला पूर्ण  विश्वाकस आहे. आसामची जनता आणि आसामच्या संस्कृतीच्या विकासात ते नेतृत्व  करत राहील.

 

सुजाण, सुशिक्षित समाज हेच आपले सर्वांचे ध्येय असायला हवे, आपण सर्वांनी मिळून यासाठी काम करावे या सदिच्छेसह पुन्हा एकदा तुमचे  सुवर्ण वाटचालीबद्दल  अभिनंदन आणि उत्तम भविष्यासाठी  अनेक-अनेक शुभेच्छा .

 

 

***

 

Jaydevi PS/SBC/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839787) Visitor Counter : 261