महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे माणिपूरच्या महिला व्यापाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
05 JUL 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2022
राष्ट्रीय महिला आयोगाने, राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने माणिपूरच्या महिला व्यापाऱ्यांसाठी एक दिवसीय ‘क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित केला होता. महिला व्यापाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच, त्यांना उद्यमशीलतेच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठी, या उपक्रम राबवण्यात आला. माणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग,सामाजिक कल्याण विभागाचे मंत्री हैखाम डिंगो सिंग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यावेळी उपस्थित होत्या.
मणिपूरची इमा कीथेल ही महिलांसाठीची आणि महिलांनी चालवलेली आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते आणि या बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येने महिला स्टॉल्स चालवतात. आयोगाच्या ईशान्येकडील राज्यांमधील कार्यक्रमांच्या अनुषंगाने, राष्ट्रीय महिला आयोगाने इमा कीथेलच्या महिला व्यापार्यांसाठी त्यांचे जीवनमान, सामाजिक सुरक्षा आणि एकूणच जीवनमान सुधारण्यासाठी हा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी महिला उद्योजिकांचा उत्साह वाढवला. महिला सक्षमीकरणासाठी आयोजित या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. माणिपूरमध्ये अशा सात इमा बाजारपेठा बांधण्यात आल्या असून लवकरच आणखी एक बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की मणिपूरच्या सर्व क्षेत्रात महिलांचे उत्तम प्रतिनिधित्व आहे. त्या सर्व कामे आणि कोणतेही क्षेत्र हाताळू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. “मणिपूरच्या महिलांनी त्यांची उत्पादने ई-मार्केटमध्येही विकावीत अशी आमची इच्छा आहे. इथल्या महिलांनी स्वतःला मणिपूर पुरते मर्यादित ठेवू नये. जग बदलत आहे आणि महिलांना तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची उत्पादने जगात कुठेही पोहोचू शकतील. आम्ही त्यांना भरारी घेण्यासाठी पंख देऊ आणि त्यासाठी त्यांना ई-कॉमर्स तसंच इतर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊ, त्यामुळे जगाला इथल्या उत्पादनांची माहिती मिळेल,” असे रेखा शर्मा पुढे म्हणाल्या.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839382)
Visitor Counter : 166