आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. मनसुख मांडविया यांनी भूषवले इंडियन फार्माकोपिया आयोग परिषद 2022 चे अध्यक्षपद आणि इंडियन फार्माकोपियाच्या 9व्या आवृत्तीचे केले प्रकाशन

Posted On: 01 JUL 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज दिल्लीत विज्ञान भवनात आयपीसी परिषद 2022 चे अध्यक्षपद भूषवले आणि इंडियन फार्माकोपियाच्या 9व्या आवृत्तीचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार उपस्थित होत्या.

“भविष्यासाठी औषधांच्या दर्जाच्या समस्येचे निराकरण” हा या वर्षीच्या परिषदेचा विषय होता.

  

यावेळी बोलताना डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की भारतीय औषधांच्या मानकविषयक प्रकाशनांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली पाहिजे आणि त्यांची प्रशंसा झाली पाहिजे, अशी आपली इच्छा आहे. अतिशय किफायतशीर असलेल्या जेनेरिक औषधांचा फॉर्म्युला आणि उत्पादन यामध्ये प्रभुत्व मिळवून आणि जगभरात या स्वस्त औषधांचा पुरवठा करून आपण जगाचे औषधी भांडार बनलो आहोत, असे त्यांनी सांगितले. पण तरी देखील औषध निर्मिती क्षेत्रात आपल्याला संशोधनाला आणखी बळकट करावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आतापर्यंत अफगाणिस्तान, घाना, नेपाळ आणि मॉरिशस या चार देशांनी आयपीला मानकांचे पुस्तक म्हणून मान्यता दिली आहे. आणखी जास्त देश आपल्या औषध मानक प्रकाशनाला स्वीकारतील यासाठी आपण एक आराखडा तयार केला  पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारची भूमिका अधोरेखित करत डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दृष्टीकोनामुळे आणि त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामामुळे जग आता आपल्याला ओळखू लागले आहे आणि आपल्या कामाला महत्त्व देत आहे आणि त्याला मान्यता देत आहे. आपण आपल्या औषध मानक प्रकाशनाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि आपल्या देशी बनावटीच्या औषधांमध्ये असलेल्या आपल्या प्राविण्यावर आधारित उद्योगांचा लाभ कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838614) Visitor Counter : 148