संरक्षण मंत्रालय

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च  क्षेपणास्त्राची ओदीशाच्या किनारपट्टीवरून  डीआरडीओ  आणि भारतीय नौदलाने घेतलेली चाचणी यशस्वी

Posted On: 24 JUN 2022 4:06PM by PIB Mumbai

 

ओदिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून  (आयटीआर ) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) आणि भारतीय नौदलाने, 24 जून 2022 रोजी  भारतीय नौदलाच्या जहाजातून, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या  कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च  क्षेपणास्त्राची (व्हीएल -एसआरएसएएम) घेतलेली चाचणी यशस्वी झाली. व्हीएल-एसआरएसएएम, हे क्षेपणास्त्र  जहाजातून चालवली जाणारी एक  शस्त्र प्रणाली आहे ,जवळच्या पल्ल्यातील सागरी धोक्यासह  विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीत आहे.रडारवर दिसू नये अशी यंत्रणा असलेल्या हवाई  धोक्यांचाही यात समावेश आहे.

या क्षेपणास्त्र  प्रणालीच्या  प्रक्षेपणादरम्यान  ,हवाई धोका म्हणून सोडण्यात आलेल्या एका  अतिजलद विमान प्रतिकृतीचा  या क्षेपणास्त्र प्रणालीने यशस्वरीत्या वेध घेतला.

चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राद्वारे  तैनात केलेल्या अनेक मार्ग निरीक्षण  साधनांचा वापर करून निकोप स्थिती मापदंडांसह प्रक्षेपकाच्या उड्डाण मार्गाचे परीक्षण करण्यात आले.  डीआरडीओ आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचणी प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यात आले.

या यशस्वी प्रक्षेपण चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ , भारतीय नौदल आणि उद्योगांचे  अभिनंदन केले आहे. या प्रणालीने एक कवच प्रदान केले असून ते हवाई धोक्यांपासून भारतीय नौदलाच्या जहाजांची संरक्षण क्षमता आणखी वाढवेल, असे ते म्हणाले.

नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी ,व्हीएल-एसआरएसएएमच्या यशस्वी प्रक्षेपण  चाचणीबद्दल भारतीय नौदल आणि डीआरडीओची प्रशंसा केली  आहे आणि ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली  विकसित केल्यामुळे  भारतीय नौदलाची संरक्षणात्मक क्षमता आणखी बळकट होईल, असे त्यांनी  सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे  अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी प्रक्षेपण चाचणीत सहभागी चमूची प्रशंसा केली. या चाचणीने भारतीय नौदलाच्या जहाजांवर स्वदेशी शस्त्र प्रणालीचे एकीकरण   सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. हे भारतीय नौदलाचे बळ अधिकाधिक वाढवणारे ठरेल आणि पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतया संकल्पनेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836752) Visitor Counter : 226