आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील कोविड-19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
देखरेख आणि जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि हॉस्पिटलायझेशनचे निरीक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
पात्र लोकसंख्येची चाचणी आणि कोविड-19 च्या लसीकरणाला गती देण्यासाठी आग्रह
Posted On:
23 JUN 2022 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
काही राज्यांमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज प्रमुख तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची नवी दिल्लीत बैठक घेतली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल या बैठकीला उपस्थित होते.
कोविड प्रकरणांमधील वाढीविषयी जागतिक परिस्थिती आणि देशातील कोविडची स्थिती यावर आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी तपशीलवार सादरीकरण केले. यामध्ये कोविड-19 प्रकरणांच्या ट्रेंडचे सादरीकरण आणि विश्लेषणाचा समावेश होता. दैनंदिन आणि सक्रिय प्रकरणे, मृत्यू, चाचणी स्थितीसह राज्यवार साप्ताहिक चाचण्या प्रति दशलक्ष, साप्ताहिक चाचण्यांमध्ये RT-PCR चा वाटा; जीनोम सिक्वेन्सिंग आणि लसीकरण स्थिती याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि वेळेवर संसर्गाचा प्रसार तपासण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा चाचण्या (आरटीपीसीआरच्या उच्च प्रमाणासह) आणि प्रभावी कोविड-19 देखरेख ठेवण्याची गरज यावर मांडविया यांनी भर दिला. कोणत्याही संभाव्य उत्परिवर्तनावर देखरेख ठेवण्याचे आणि संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) वर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. कोविड19 आणि SARI/ILI प्रकरणांमुळे हॉस्पिटलायझेशनचे निरीक्षण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
उच्च प्रकरणांची नोंद करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वर्धक मात्रेसह लसीकरणाचा वेग वाढवण्याचे त्यांनी आवाहन केले. लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध असल्याने, पात्र आणि असुरक्षित गटांमध्ये लसीकरणाला गती देण्यावर लक्ष केंद्रित करताना लसीचा अपव्यय होऊ नये याची काळजा घ्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
S.Kulkarni/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836587)