माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘डीडी इंडिया’च्या वतीने 21 जून, 2022 रोजी ‘गार्जियन रिंग फॉर योग’ कार्यक्रमासाठी व्यापक व्यवस्था
Posted On:
18 JUN 2022 4:54PM by PIB Mumbai
यंदाच्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साठी 'द गार्जियन रिंग' हा एक अनोखा आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात घोषित केल्यानुसार, 'गार्जियन रिंग' हा अभिनव कार्यक्रम सूर्याच्या गतीचा उत्सव तसेच 'एक सूर्य, एक पृथ्वी' ही संकल्पना अधोरेखित करणारा आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, सर्व देशांतील लोक सूर्यनमस्कार घालून किंवा सूर्यनमस्काराची भारतीय परंपरा साजरी करून योगच्या माध्यमातून सूर्याचे स्वागत करतील. भारतामधील सार्वजनिक प्रसारण सेवा- प्रसारभारतीच्या आंतरराष्ट्रीय वाहिनी ‘डीडी इंडिया’ वरून या अनोख्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या वर्षी ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ म्हणजेच ‘मानवतेसाठी योग’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. या कार्यक्रमात लवकर सकाळी सूर्योदयाच्यावेळी योग करण्यासाठी विविध राष्ट्रांतील लोक एकत्र येणार आहेत. आंतरराष्ट्रीय योगदिनी- 21 जून रोजी, 80 हून अधिक भारतीय दूतावास त्या त्या देशातील प्रतिष्ठित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रम आयोजित करणार आहेत. अनेक राज्यांचे प्रमुख, मान्यवर आणि सेलिब्रिटीही यात सहभागी होणार आहेत.
परदेशातील दूतावासांच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच 'गार्जियन रिंग'च्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यानुसार - उगवत्या सूर्याच्या देशाच्या भूमीवरून सर्वप्रथम कार्यक्रमाला प्रारंभ होईल. पूर्वेकडून सुरू होणारे विविध देशांचे ‘स्ट्रीमिंग फीड’ भारतीय प्रमाण वेळे प्रमाणे पहाटे 3 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर सूर्य ज्याप्रमाणे पश्चिमेकडे सरकतो, त्याप्रमाणे त्या त्या देशांमध्ये कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
या सर्व कार्यक्रमासाठी डी डी इंडियाच्या विस्तृत तांत्रिक, उत्पादन आणि अभियांत्रिकी व्यवस्थेमुळे हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करणे शक्य होत आहे, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3 ते रात्री 10 या वेळेत प्रसारित होणाऱ्या ‘मॅरेथॉन’ कार्यक्रमामध्ये जगभरातील 80 योग कार्यक्रमांचे प्रसारण विनाअडथळा सुनिश्चित करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियापासून न्यूयॉर्कपर्यंत, आफ्रिकेपासून लॅटिन अमेरिकेपर्यंत, विविध खंड आणि वेळांमध्ये, डीडी इंडियाकडून जगभरातील प्रतिष्ठित ठिकाणांवरील खास दृश्यचित्रण सर्वत्र प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा भव्य, विशाल कार्यक्रम विविध दूतावासांबरोबरच्या समन्वयासह आयुष मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यामुळे शक्य होणार आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश पुढे नेईल आणि भारताच्या योग परंपरेची एकीकृत शक्ती प्रदर्शित करेल.
***
S.Kakade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835077)