भूविज्ञान मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात 75 दिवस 75 समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई केली जाणार
Posted On:
16 JUN 2022 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2022
केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अवकाश डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘आंतरराष्ट्रीय समुद्र किनारे स्वच्छता दिन 2022’ तयारीची आढावा बैठक संपन्न झाली. हा दिवस 17 सप्टेंबर 2022 रोजी पृथ्वी भवन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मुख्यालयात साजरा करण्यात येईल.
हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दर वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो, असे डॉ सिंग यांनी सांगितले. यावर्षी हा कार्यक्रम 17 सप्टेंबरला साजरा होणार आहे. योगायोगाने त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस देखील असतो. पंतप्रधान मोदी हे स्वच्छतेबद्दल आग्रही असतात आणि त्यांनी देशात स्वच्छतेची, समुद्र किनारे, पर्यावरण आणि हवामान यांचे सर्व प्रकारे संरक्षण याची सुरवात केली आहे.
सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करतो आहोत असे डॉ सिंग म्हणाले, 3 जुलै ते 17 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत देशातील 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. या वर्षीचा कार्यक्रम विशेष असणार आहे, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधीचा असेल आणि यात लोकांचा आजवरचा सर्वाधिक सहभाग असेल. देशाच्या किनारी भागांच्याच नाही तर इतर भागांच्या समृद्धीसाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ हा संदेश पोहोचविण्यासाठी यात सामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा आहे, असे डॉ सिंह यांनी सांगितले.
समुद्र किनाऱ्यांवरून 1,500 टन कचरा काढणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे, ज्यामुळे सागरी जीवांना मोकळा श्वास घेता येईल आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ होईल.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834621)
Visitor Counter : 266