पोलाद मंत्रालय
पोलादनिर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन असलेल्या स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या पहिल्या सहापदरी महामार्गाचे पोलाद मंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये सूरत येथे लोकार्पण
रस्ते बांधणीत स्टील स्लॅग मोठ्या प्रमाणात वापरण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जाणार
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2022
पोलाद निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन असलेल्या स्टील स्लॅगपासून तयार केलेल्या पहिल्या सहापदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये सूरत येथे झाले. गुजरातमधील सुरत येथील बंदराला शहराशी जोडणारा हा महामार्ग आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करून चक्रीय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमतेला चालना देण्याची गरज मंत्र्यांनी, या रस्त्याचे लोकार्पण करताना व्यक्त केली.

जगभरात सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असल्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 च्या भाषणात व्यक्त केली होती , याची आठवण करून देत सिंह यांनी यासंदर्भात विशेष उल्लेख यावेळी बोलताना केला. अशा परिस्थितीत, चक्रीय अर्थव्यवस्था ही काळाची मागणी आहे आणि या मागणीला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून अनिवार्य करणे आवश्यक आहे.प्रक्रिया केलेल्या पोलादाचा 100% वापर करून तयार केलेला हा रस्ता हे कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याचे आणि पोलाद संयंत्रांची शाश्वतता सुधारण्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

उत्पादन प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांमध्ये नैसर्गिक समुच्चय घटकापेक्षा चांगले गुणधर्म असतात.त्यामुळे रस्ते बांधणीत अशा सामग्रीचा वापर केल्याने टिकाऊपणा तर वाढेलच शिवाय बांधकामाचा खर्च कमी होण्यासही मदत होईल. या रस्त्यापासून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग बांधकामात या स्टील स्लॅगचा (पोलादाच्या भुकटीचा) मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या दृष्टीने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी केला जाईल,असे मंत्र्यांनी सांगितले.
रस्ते बांधणीसाठी, शेतीसाठी मातीची पोषक द्रव्ये आणि खतांना पर्याय म्हणून, रेल्वेसाठी खडी आणि हरित सिमेंट तयार करण्यासाठी अशा सामग्रीचा वापर करण्याच्या दृष्टीने पोलाद मंत्रालय इतर सर्व पर्यायांचा शोध घेत आहे, असे पोलाद मंत्र्यांनी सांगितले. पोलाद मंत्रालयाने पोलादाच्या उत्पादना दरम्यान निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या उप उत्पादनांच्या वापरासाठी अनेक संशोधन आणि विकास प्रकल्प आधीच मंजूर केले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांना उत्तरदायी म्हणून मानले जात आहे. स्टील स्लॅग वापरून तयार केलेला रस्ता देखील इतर प्रमुख पोलाद कंपन्यांसह मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या संशोधन आणि विकास प्रकल्पाचा भाग आहे.

देशात विविध प्रक्रिया मार्गांच्या माध्यमातून स्टील स्लॅगचे उत्पादन 2030 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा वापर हा देशातील नैसर्गिक समुच्चय घटकांची कमतरता भरून काढेल.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1834359)
आगंतुक पटल : 253