उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान संग्रहालय देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान जागृत करत आहे- उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू

Posted On: 13 JUN 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2022

पंतप्रधान संग्रहालय ( प्रधानमंत्री संग्रहालय) देशाच्या लोकशाहीच्या यशस्वी प्रवासाचा आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा अविस्मरणीय अनुभव देत असून   प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्राबद्दल अभिमान जागृत करत आहे, असे  उपराष्ट्रपती  आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी  म्हटले आहे.

वेंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उषा नायडू यांनी आज नेहरू स्मारक संग्रहालय आणि  वाचनालय परिसरात उभारलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली आणि सुमारे 90 मिनिटे भारताच्या वर्तमानापर्यंतच्या प्रवासातील दृकश्राव्य सादरीकरण पाहिले.

हे संग्रहालय आपल्या राष्ट्रीय नेतृत्वातील  वैविध्य दर्शवते आणि त्यांचा सन्मान करते आणि त्याद्वारे आपल्यासारख्या चैतन्यशील लोकशाहीसाठी आवश्यक अशा सर्वसमावेशकतेचा संदेश देते. गरिबी आणि निरक्षरतेशी लढा देण्यापासून अंतराळ संशोधनात नवीन उंची गाठण्यापर्यंत आपल्या राष्ट्राचे परिवर्तन या  संग्रहालयातून पाहायला मिळते, या  अविस्मरणीय अनुभवामुळे प्रत्येक नागरिकाला निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया नायडू यांनी अभ्यागतांच्या पुस्तकात नोंदवली

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा या  संग्रहालयाला  भेट देणाऱ्याला एक उन्नत अनुभव मिळतो त्यायोगे त्याचा किंवा तिचा राष्ट्राभिमान निश्चितच वाढेल आणि जगातील अव्वल राष्ट्रांच्या पंक्तींत सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी,येत्या काळात भारताच्या उत्तुंग भरारीसाठी  त्यांना सज्ज करेल असे नायडू यांनी म्हटले आहे.

नायडू यांनी  संग्रहालयातील त्यांचा अनुभव  फेसबुक पोस्टमध्ये कथन केला आणि प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेण्यासाठी  आणि स्वतःमध्ये  अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी इथे  भेट देण्याचे आवाहन केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=340884731548091&id=100068797016931

देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय महामार्ग, मोठमोठे पूल , बोगदे, स्मार्ट शहरं  आणि प्रगतीपथावर असलेले  नवीन प्रकल्प  यासारख्या विविध मेगा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या  प्रगतीची झलक दाखवणाऱ्या  आभासी हेलिकॉप्टर सफारीमुळे उपराष्ट्रपती विशेष प्रभावित झाले.

पंतप्रधान संग्रहालयात स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रमुख घटना, 18 व्या शतकाच्या मध्यातील  देशाची भरभराट आणि त्यानंतरचा ब्रिटीश राजवटीचा कालखंड, राज्यघटनेची निर्मिती, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या 14 पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशासमोर असलेली  आव्हाने आणि कामगिरी यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

हे संग्रहालय यावर्षी 14 एप्रिल रोजी  नागरिकांसाठी  खुले करण्यात आले.

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1833566) Visitor Counter : 167