माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ऑनलाइन सट्टेबाजीला थारा देणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत, मंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना मार्गदर्शक सूचना जारी


ऑनलाइन आणि समाजमाध्यमांवरील ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करता येणार नाही

'सट्टेबाजीमुळे ग्राहकांसाठी वित्तीय, सामाजिक-आर्थिक धोका निर्माण होतो'

Posted On: 13 JUN 2022 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13जून 2022

ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करणे टाळण्याच्या अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे आणि ऑनलाइन माध्यमांवर

ऑनलाइन सट्टेबाजीची संकेतस्थळे/मंच यासंदर्भात अनेक जाहिराती आढळून आल्याच्या उदाहरणांवरून या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

सट्टेबाजी आणि जुगार, देशाच्या बहुतेक भागांमध्ये अवैध आहे, यामुळे ग्राहकांसाठी, विशेषत: तरुण आणि मुलांसाठी वित्तीय आणि सामाजिक-आर्थिक धोका निर्माण होतो, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीवरच्या या जाहिरातींमुळेमोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कृतींना चालना मिळते असेही यात म्हटले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीवरच्या  जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, आणि त्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा 1995ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत  जाहिरात संहितेशी तंतोतंत सुसंगत असल्याचे दिसून येत नाही आणि प्रेस कौन्सिल कायदा, 1978 अंतर्गत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने घालून दिलेल्या पत्रकारितेबाबतच्या आचारसंहितेतील निकषांनुसार जाहिरातीचे नियम, याचे पालन केलेले दिसत नाही, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ऑनलाइन सट्टेबाजी मंचाच्या जाहिराती प्रकाशित करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने, व्यापक  सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मध्यस्थ आणि प्रकाशकांनी भारतात अशा जाहिराती प्रदर्शित करू नयेत किंवा अशा जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करू नये, अशा मार्गदर्शक सूचना ऑनलाइन जाहिरातीसह ऑनलाइन आणि समाजमाध्यमांनाही देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन गेमिंग जाहिरातींसंदर्भात भारतीय जाहिरात मानके परिषदेच्या (एएससीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 डिसेंबर 2020 रोजी, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, या मार्गदर्शक सूचनांमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या मुद्रित आणि ध्वनी- चित्र जाहिरातींसाठी,’ काय करावे’ आणि ‘काय करू नये’  याचा समावेश होता.

तपशीलवार मार्गदर्शक सूचना खालील दुव्यावर वाचता येतील :

https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20on%20online%20betting%20advertisements%2013.06.2022%282%29_0.pdf

 

 

 

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 



(Release ID: 1833545) Visitor Counter : 281