नौवहन मंत्रालय

सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल डीडी न्यूजची विशेष परिषद


परिषदेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा सहभाग

"गेल्या आठ वर्षांत 'आयुष' चे स्वरूप सुधारले असून, भारतात व भारताबाहेरही 'आयुष'ने विश्वास जिंकला आहे"- सर्बानंद सोनोवाल

पीएम गतीशक्ती अंतर्गत विविध मंत्रालये समन्वयाने काम करत असल्याची सोनोवाल यांच्याकडून प्रशंसा

Posted On: 07 JUN 2022 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असताना, डी डी न्यूजने एक विशेष परिषद आयोजित केली आहे. ‘आठ साल मोदी सरकार: सपने कितने हुए साकार’ नावाची ही परिषद 3 जूनला सुरु झाली असून येत्या 11 जूनपर्यंत ती चालणार आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तथा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जूनला परिषदेत उपस्थिती लावली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे 'आयुष' बद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विश्वास निर्माण झाला असून, जगभरात 'आयुष'चा स्वीकार होण्याचे प्रमाणही वाढले आहे", असे प्रतिपादन सोनोवाल यांनी या मुलाखतीत केले. "भारतात जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषधांसाठीचे जागतिक केंद्र स्थापन झाल्यामुळे, देशोदेशी पारंपरिक औषधपद्धती विकसित करण्याच्या बाबतीत जगाचे नेतृत्व भारताकडे चालत आले आहे", असेही त्यांनी सांगितले. तसेच योगाच्या बाबतीत भारत नेहमीच जगद्गुरूच्या भूमिकेत असल्याचे सांगत, यावर्षीही 25 कोटींपेक्षा अधिक लोकांचा सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व नियोजन सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

बंदरांच्या आधुनिकीकरणाविषयी आणि जहाजबांधणी व जलमार्ग क्षेत्रात पीएम गतीशक्ती योजनेविषयीही सोनोवाल यांनी आपले विचार मांडले. कार्यप्रवणता आणि क्षमता या दोन्ही बाबतींत भारताच्या बंदरांची स्पर्धात्मकता वाढवणे गरजेचे तसेच देशासाठी महत्त्वाचे होते, असे त्यांनी अधोरेखित केले. भूतकाळातील सरकारांनी ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारला ही परिस्थिती पालटून टाकायची आहे, आणि त्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही सोनोवाल यांनी दिली. 'ईशान्य भारताकडे दुर्लक्ष करण्याच्या पूर्वीच्या सरकारांच्या भूमिकेमुळे, त्या भागात अशांतता माजवण्यामध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतले होते, अशा शक्तींना मोकळे रान मिळाले होते', अशी टीकाही सोनोवाल यांनी केली.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे: https://youtu.be/PFtxu_yZs7I


* * *

S.Kane/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831830) Visitor Counter : 122