युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 चे करणार उद्घाटन ; भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
या स्पर्धेत एकूण 25 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल, ज्यात भारतातील 5 देशी खेळ - कलरीपयट्टू, थांग-ता, गटका, मल्लखांब आणि योगासन यांचा समावेश आहे.
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2022 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2022
हरियाणातील पंचकुला येथे शनिवारी (4 जून) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 च्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची ही चौथी आवृत्ती आहे . केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरु केलेली भारतातील सर्वात मोठी देशव्यापी क्रीडा स्पर्धा आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. त्यांच्या व्यतिरिक्त, राज्याचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यासह हरियाणातील इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एकूण, 2,262 मुलींसह तब्बल 4,700 खेळाडू 25 क्रीडा प्रकारांमध्ये 269 सुवर्ण, 269 रौप्य आणि 358 कांस्य पदकांसाठी खेळणार आहेत,. ही स्पर्धा 4 जून ते 13 जून पर्यंत चालणार आहे.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये भारतातील 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असेल. ही स्पर्धा 5 शहरांमध्ये (पंचकुला, शाहबाद, अंबाला, चंदीगड आणि दिल्ली) आयोजित केली जाईल. या स्पर्धेत एकूण 25 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल, ज्यात भारतातील 5 देशी खेळ - कलरीपयट्टू, थांग-ता, गटका, मल्लखांब आणि योगासन यांचा समावेश आहे.
यापूर्वीच्या खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी केवळ 18 वर्षांखालील खेळाडूच स्पर्धेत खेळतील. यजमान हरियाणाचे 396 खेळाडूंचे पथक या स्पर्धेतील सर्वात मोठे पथक आहे आणि प्रत्येक क्रीडा प्रकारात भाग घेईल. खेलो इंडिया युवा स्पर्धा दोनदा जिंकणारा महाराष्ट्र 318 जणांचे पथक पाठवत आहे आणि 25 पैकी 23 क्रीडा प्रकारांत भाग घेणार आहे.
अनेक ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांचे पदक विजेते घडवणाऱ्या हरियाणाने 2018 मध्ये खेलो इंडिया शालेय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. पुढच्याच वर्षी, महाराष्ट्राने युवा स्पर्धा असे नव्याने नामकरण झालेल्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेत हरियाणाच्या 62 पदकांच्या तुलनेत तब्बल 85 सुवर्णपदके जिंकत महाराष्ट्र विजेता ठरला. गुवाहाटी येथेही महाराष्ट्राने एकूण 78 सुवर्णपदके मिळवून आपले वर्चस्व राखले.
स्पर्धेदरम्यान कोविड-19 नियमांचे काटेकोर पालन केले जाईल आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीद्वारे (NADA) खेळाडूंच्या डोप चाचणीसाठी संपूर्ण व्यवस्था केली जाईल.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1830934)
आगंतुक पटल : 180