शिक्षण मंत्रालय

शिक्षण आणि कौशल्यविषयक व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घ्या - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 02 JUN 2022 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राष्ट्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उद्‌घाटन सत्राला संबोधित केलं.

शालेय शिक्षण हे ज्ञानाधारित समाजाचा पाया आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) हे ज्ञानाचा दस्तावेज असून सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि प्रत्येकाला शिक्षण प्रदान करणे हा या धोरणाचा उद्देश आहे, असं प्रधान यांनी यावेळी सांगितलं.

आपण सध्या अमृतकाळाच्या युगात असून जागतिक हिताच्या दृष्टीने भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आणण्यासाठी पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत, असेही ते म्हणाले. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम या तत्वावर विश्वास ठेवते आणि आपली जबाबदारी केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपण बांधील आहोत  हे ध्यानात घेतले पाहिजेआपण 21व्या शतकातील संधी आणि आव्हानांसाठी सज्ज होत असताना आपली शिक्षण आणि कौशल्यविषयक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान लाभ घेतला पहिले, असं प्रधान यांनी सांगितलं. विविध शैक्षणिक आणि कौशल्यविकास संस्थांना भेट देताना काल आपल्याला 21व्या शतकातील भविष्यातल्या  शिक्षण प्रणालीच्या विविध आयामांची झलक पाहायला मिळाली, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचापूर्व प्राथमिक शाळा ते माध्यमिक शाळा असा  5+3+3+4  समग्र दृष्टिकोन, बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षण (ECCE-Early Childhood Care and Education), शिक्षक प्रशिक्षण, प्रौढ साक्षरता, शालेय शिक्षणात कौशल्यविकास शिक्षणाचा अंतर्भाव आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य या 21व्या शतकातील जागतिक नागरिक घडवण्याच्या पायऱ्या आहेत, असं मत प्रधान यांनी व्यक्त केलं.

केंद्र सरकारने  विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने घडवण्यासाठी सर्व बाबींचा सखोल विचार करून सुसज्ज अशा पीएम श्री शाळा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, या अत्याधुनिक शाळा राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 चे संकल्प सत्यात आणणाऱ्या प्रयोगशाळा  असतील, असं ते म्हणाले.  पीएम श्री शाळांच्या रूपात भविष्यकालीन मानदंड तयार करण्यासाठी त्यांनी  सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सर्व  शैक्षणिक परिसंस्थांकडून  सूचना आणि अभिप्राय मागितले.

 

 S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830536) Visitor Counter : 125