पंतप्रधान कार्यालय

दिल्लीतल्या प्रगती  मैदान येथे भारत ड्रोन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 27 MAY 2022 3:27PM by PIB Mumbai

 

व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातली माझे सहकारी, भारत ड्रोन महोत्सवामध्‍ये देशभरातून  सहभागी होत असलेले  पाहुणे, इथे उपस्थित अन्य मान्यवर, महिलावर्ग आणि सज्जन हो !!

आपल्या सर्वांचे भारत ड्रोन महोत्सवाच्या या आयोजनाबद्दल खूप- खूप अभिनंदन करतो. माझ्या समोर सर्व वरिष्‍ठ लोक बसलेले मला दिसत आहे. मला येण्‍यासाठी विलंब झाला. विलंब मी उशिरा आलो म्हणून झाला नाही. इथे तर मी अगदी वेळेवर आलो होतो. परंतु हे ड्रोनचे जे प्रदर्शन लागले आहे, ते पाहण्‍यामध्‍ये मी मनाने इतका गुंगून गेलो की, किती वेळ झाला हे लक्षातच आले नाही. इथे यायला इतका वेळ लागला, तरीही मी त्या वेळेमध्‍ये प्रदर्शनातल्या फार फार तर दहा टक्केच गोष्‍टी पाहू शकलो. या प्रदर्शनामुळे मी खूप प्रभावित झालो. माझ्याकडे जर आणखी वेळ असता, तर खूप बरे झाले असते. प्रदर्शनातल्या प्रत्येक स्टॉलवर गेलो असतो. आणि नवयुवकांनी जे काम केले आहे, ते पाहू शकलो असतो. त्यांच्याकडून नवीन गोष्‍टी ऐकू शकलो असतो. असे सगळे तर काही करू शकलो नाही. मात्र जे काही करू शकलो, त्याविषयी मी तुम्हा सगळ्यांना आग्रह करतो; सरकारमधल्या सर्व विभागांनाही माझा आग्रह असणार आहे की, आपल्या वेगवेगळ्या स्तरावर जितके अधिकारी आहेत, धोरण निर्माते म्हणून जे भूमिका बजावत आहेत, त्यांनी दोन तीन तास जरूर येथे वेळ घालवावा. एक-एक गोष्‍ट समजून घेण्‍याचा प्रयत्न करावा. इथे त्यांना तंत्रज्ञान पहायला मिळेल. आणि त्यांना आपल्या कार्यालयातच माहिती मिळेल की, हे तंत्रज्ञान आपल्याला कसे उपयोगी पडू शकेल. याचा अर्थ, प्रशासनामध्‍येही असे अनेक उपक्रम आहेत, ज्यासाठी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण काम करू शकतो. एक मात्र मी ठामपणे सांगू शकतो की, आजचा अनुभव माझ्यासाठी अतिशय सुखद होता; आणि भारताच्या नवतरूणांनो मला या गोष्‍टींचा आनंद होतो आहे की, ज्या  ज्या स्टॉलवर गेलो, तिथले सर्वजण मोठ्या अभिमानाने सांगत होते, ‘’साहेब, हे मेक इन इंडिया आहे, हे आम्ही सर्वांनी बनवले आहे.’’

 

मित्रांनो,

या महोत्सवामध्ये देशातल्या वेगवेगळ्या भागांतून आलेले आपले शेतकरी बांधव-भगिनीही आहेत; ड्रोन अभियंतेही आहेत, स्टार्टअप्स ही आहेत, वेगवेगळ्या कंपन्याचे प्रमुखही उपस्थित आहेत; आणि दोन दिवसांमध्‍ये इथे हजारों लोक या महोत्सवाचा भाग बनणार आहेत, असा मला पूर्ण विश्‍वास आहेत. आणि अजून एक म्हणजे, मी प्रदर्शनही पाहिले आहे, त्याचबरोबर जे प्रत्यक्ष ड्रोनबरोबर आपले काम करतात, तसेच  त्यामध्‍ये जे कोणी आपल्या शेतामध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात, प्रोत्साहन देतातअशा काही युवा  शेतकरी बांधवांना भेटण्‍याची संधी मिळाली.  आज 150 ड्रोन पायलट प्रमाणपत्रेही येथे देण्‍यात आली. या सर्व ड्रोन पायलटना आणि या कामाशी  जोडले गेलेल्या सर्वांना अनेक-अनेक शुभेच्‍छा देतो.

 

मित्रांनो,

ड्रोन तंत्रज्ञानाविषयी भारतामध्‍ये जो उत्साह पहायला मिळतोय, तो खरोखरीच अद्भूत आहे. हे जे चैतन्य, ऊर्जा दिसून येत आहे, हे भारतामध्‍ये ड्रोन सेवा आणि ड्रोन आधारित उद्योगांनी घेतलेल्या गरूड झेपेचे प्रतिबिंब आहे. यावरून भारतामध्‍ये रोजगार निर्मातीसाठी एका उदयोन्मुख असे  मोठे क्षेत्र संभवनीय दिसून येत आहे. आज भारत, स्टार्ट अप शक्तीच्या बळावर जगामध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

 

मित्रांनो,

हा उत्सव, फक्त एक तंत्रज्ञानाचा नाही, तर नवीन भारताच्या नवीन प्रशासनचा, नवीन प्रयोगांमध्‍ये अभूतपूर्व सकारात्मकतेचाही उत्सव आहे. योगायोगाने 8 वर्ष आधी हाच तो काळ  होता, ज्यावेळी भारतामध्ये आम्ही सुशासनाचे नवीन मंत्र लागू करण्‍याचा प्रारंभ केला होता. कमीत कमी शासन, जास्तीत जास्त प्रशासनया मार्गाने वाटचाल करताना, इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ डुइंग बिझनेस यांना आम्ही प्राधान्य दिले. आम्ही सबका साथ, सबका विकासहा मंत्र जपत देशाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक क्षेत्राला सरकारबरोबर जोडण्‍याचा मार्ग निवडला. देशामध्ये सुविधा सर्वांपर्यंत पोहोचणे, योजनांची पूर्तता यांच्याविषयी अभाव असल्याचा आधीचा जो अनुभव होता, त्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानावर भरवसा केला. त्याला  महत्वूपूर्ण सेतूच्‍या रूपामध्‍ये व्यवस्थेचा एक भाग बनवला. जे तंत्रज्ञान देशातल्या  अतिशय कमी वर्गापर्यंत पोहोचले होते; तंत्रज्ञान म्हणजे मोठ्या, श्रीमंत लोकांच्या कामकाजासाठी असते, असे आपल्याकडे मानले जात होते. सामान्या माणसांच्या जीवनामध्‍ये तंत्रज्ञानाला कोणतेही स्थन नव्हते. ही संपूर्ण मानसिकता बदलून आम्ही तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करण्‍याच्या दिशेने पावले उचलली आहेत, आणि यापुढेही उचलणार आहोत.

 

मित्रांनो,

आता तंत्रज्ञानाविषयी बोलणे होत आहे म्हणून एक गोष्‍ट नोंदवतो, आम्ही पाहिले आहे, आपल्याकडे काही लोकांकडून तंत्रज्ञानाची भीती दाखवून त्याला नाकारण्‍याचा प्रयत्नही केला जातो. हे तंत्रज्ञान आले तर, असे होईल, तसे होईल. आता ही गोष्‍ट बरोबरच आहे की, एकेकाळी संपूर्ण शहरामध्‍ये एकच मनोरा असायचा. त्याचे घड्याळ वाजत होते आणि गावात किती वाजले हे समजयाचे. त्यावेळी कोणी विचार केला होता  का, की प्रत्येक गल्लीमध्‍ये, प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ येईल? त्यामुळे हे सगळे परिवर्तन घडून आले, त्यावेळी सर्वांना ते एक नवलच वाटले असणार आणि आजही काही लोक असे असतील, त्यांच्या मनात असेल की, आपणही गावामध्‍ये मनोरा बनवावा आणि तिथे घड्याळ लावावे. कोणे एके काळी जे काही परिवर्तन झाले, त्या परिवर्तनामध्‍ये आपण आपल्या व्यवस्थाही बदलल्या तरच प्रगती होणे शक्‍य असते. आम्ही अलिकडेच कोरोना लसीकरणाच्या काळात नवे खूप अनुभव घेतले. आधीच्या सरकारांच्या काळामध्‍ये तंत्रज्ञान म्हणजे समस्येचा भाग आहे, असे समजले जात होते. तंत्रज्ञान म्हणजे गरीबांचा विरोधक आहे, हे सिद्ध करण्‍याचा प्रयत्न केला जात होता. याच कारणाने 2014 च्या आधी प्रशासनामध्‍ये तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याविषयी बरीच उदासिनतेचे वातावरण होते. कोणी एखाद- दुस-या व्यक्तीने आपल्या आवडीनुसार केला तर केला, मात्र  अन्य कोणतीही व्यवस्था बनली नव्हती. यामुळे सर्वात जास्त नुकसान देशातल्या गरीबाचे झाले. देशातल्या वंचितांचे झाले, देशातल्या मध्‍यम वर्गाचे झाले. आणि जे आकांक्षित होते, त्यांना नाइलाजाने  निराशेच्या गर्तेमध्‍ये आयुष्‍य कंठावे लागले.

 

मित्रांनो,

नव्या तंत्रज्ञानामुळे व्यत्यय निर्माण होतो, ही गोष्‍ट आम्ही नाकारत नाही. तंत्रज्ञान नवीन माध्‍यम शोधत असते, नवा अध्‍याय लिहीत असते. असे नवीन मार्ग, नवीन व्यवस्थाही तयार करीत असतात. जीवनाशी जोडले गेलेले अनेक विषय अवघड करून टाकले होते, असा कालखंडही आपण सर्वांनी पाहिला आहे. आपल्यापैकी किती लोकांनी लहानपणी रेशनच्या दुकानावर धान्यासाठी, रॉकेलसाठी, साखरेसाठी रांग लावली आहे, हे मला माहिती नाही. परंतु एक काळ असा होता की, या कामासाठी रांगेत अनेक तास वेळ लोकांना घालवावा लागत होता. आणि मला तर माझे बालपण चांगले आठवते. इतके तास रांगेत उभे राहिल्यानंतर आपली पाळी येताच रेशन दुकानातले धान्य संपून जाईल, दुकान बंद होण्‍याची वेळ येईल, अशी भिती माझ्या मनामध्ये कायम असायची. अशीच भीती  7-8 वर्षांपूर्वी प्रत्येक गरीबाच्या जीवनामध्‍ये भरून राहिलेली होती.  आता मात्र मला आनंद आहे की, आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ही भीती समाप्त झाली आहे. आता लोकांमध्‍ये विश्‍वास निर्माण झाला आहे की, लोकांना त्यांच्या हक्काचे जे काही आहे ते, त्यांना मिळणारच  आहे. तंत्रज्ञानामुळे समाजातल्या अखेरच्या व्यक्तीपर्यंत लाभ सुनिश्चित करण्‍याच्या कामामध्‍ये खूप मदत मिळाली आहे. आणि मी, जाणून आहे की, आपण याच वेगाने पुढे जावून अंत्योदयाचे लक्ष्‍य प्राप्त करू शकतो. गेल्या 7-8 वर्षांच्या अनुभवाने माझा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. माझा भरवसा अधिक वाढतोय. जन-धन, आधार आणि मोबाइल या त्रिशक्तीने जेएम- जॅममुळे आज आपण देशभरामध्‍ये संपूर्ण  पारदर्शकेतबरोबरच गरीबाला रेशन धान्यासारख्‍या त्याच्या हक्काच्या गोष्‍टी आम्ही पोहोचवू शकत आहोत. या महामारीच्या काळामध्‍येही आम्ही 80 कोटी गरीबांना मोफत रेशन सुनिश्चित केले आहे.

 

मित्रांनो

आपल्या तंत्रज्ञानाच्या  पर्यायामध्‍ये  कामाचे अगदी योग्य प्रकारे डिझाइन करण्‍याची, सक्षमतेने कार्यपध्‍द्ती वि‍कसित करण्‍याची आणि योजनेची तडफेने अंमलबजावणी करण्‍याची शक्‍ती आहे. आज भारत दुनियेतली  सर्वात मोठा लसीकरण मोहीम चालवत आहे. आज देशाने जी मजबूत यूपीआय चौकट विकसित केली आहे, त्याच्या मदतीने लाखो, कोट्यवधी रूपये गरीबांच्या बॅंक खात्यामध्‍ये थेट हस्तांतरीत होत आहेत. महिला, शेतकरी, विद्यार्थी यांना आता थेट सरकारकडून मदत मिळत आहे. 21 व्या शतकातल्या नवीन भारतामध्‍ये, युवा भारतामध्‍ये आपण देशाला नवीन शक्ती देण्‍यासाठी, अधिक वेग आणि नवे परिमाण देण्‍यासाठी तंत्रज्ञानाला महत्वपूर्ण साधन बनवले आहे. आज आपण तंत्रज्ञानसंलग्न पर्याय वि‍कसित करीत आहोत आणि त्याला नवे उच्‍च परिमाण लाभावे, यासाठी कौशल्येही आम्ही विकसित केली आहेत. देशामध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन गुड गव्हर्नन्सच्या माध्‍यमातून इज ऑफ लिव्हिंगच्या वचनबद्धतेला पुढे घेवून जाण्‍याचे आणखी एक माध्‍यम आहे. ड्रोनच्या रूपाने आपल्याकडे आणखी एक असे स्मार्ट साधन आले आहे. जे खूप लवकरच सामान्यातल्या सामान्य भारतीयांच्या जीवनाचा भाग बनत चालला आहे. आपले शहर असो अथवा देशातला अतिदुर्गम खेड्याचा भाग असो, शेताचा माळरान भाग असो अ‍थवा खेळाचे मैदान, संरक्षणाशी संबंधित काम असो अथवा आपत्ती व्यवस्थाापन प्रत्येक ठिकाणी ड्रोनचा वापर केला जात आहे. ड्रोनचा यापेक्षाही जास्त उपयोग आपण आगामी दिवसांमध्‍ये होणार आहे. याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र असो, प्रसार माध्‍यम असो, चित्रपट उद्योग असो, ड्रोन या क्षेत्रांमध्‍ये गुणवत्ता आणि सामुग्री अशा दोन्हीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी मदत करेल. आत्ता जितका ड्रोनचा वापर होत आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त वापर केला जाईल हे आपण आगामी दिवसांमध्‍ये पाहणार आहोत. मी सरकारमध्‍ये प्रत्येक महिन्याला एक प्रगती कार्यक्रम चालवत असतो. सर्व राज्यांचे मुख्‍य सचिव टीव्हीच्या  स्क्रीनवर असतात आणि अनेक विषयांवर चर्चा केली जाते. माझा आग्रह असा आहे की, आता ड्रोनच्‍या माध्‍यमातनू जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांचे संपूर्ण लाइव्ह-अगदी थेट प्रक्षेपण केले जावे. ज्यावेळी केदारनाथच्या पुननिर्माणाचे काम सुरू झालेप्रत्येक वेळी मला केदारनाथला जाणे अवघड होते, तरी मी अगदी नियमित केदारनाथमध्‍ये काम कसे सुरू आहे, किती वेगाने काम केले जात आहे, ते ड्रोनच्या माध्‍यमातून माझ्या कार्यालयामध्‍ये बसून आढावा बैठकीमध्‍ये पाहत होतो. मी ड्रोनच्या मदतीने केदारनाथ विकासाच्या  कामांची अगदी नियमित  देखरेख करीत होतो. याचा अर्थ आज सरकारी कामांची गुणवत्ताही पहायची असेल तर मला त्याआधी निरीक्षणाला जायचे आहे, हे सांगण्‍याचीही गरज नाही. कारण आधी सांगून तिथे गेलो तर सर्वकाही ठिकठाक केले जाईल. मात्र मी ड्रोन पाठवला तर तोच सर्व माहिती घेवून येईल. कुणाला काही कळणारही नाही. तिथे काय काम चालले आहे, त्याची सगळी माहिती मला इथे बसून घेता येईल. 

 

मित्रांनो,

गावांमध्‍येही शेतकरी बांधवांचे जीवन आधुनिक आणि सुविधाजनक, अधिक संपन्‍न बविण्‍यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावणार आहे. आज गावांमध्‍ये चांगले रस्‍ते आहेत, वीज-पाणी पोहोचले आहे. ऑप्टिकल फायबर केबल पोहोचल्या आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाने अभूतपूर्व विस्तार झाला आहे. मात्र तरीही गावांमध्‍ये जमिनीशी संलग्न, शेतीशी संलग्‍न जास्तीत जास्त कामे जुन्या पद्धतीनेच पार पाडली जातात. त्या जुन्या पद्धतीमध्‍ये सर्व स्तरामध्‍ये वेस्टेज वाया जाण्‍याचे प्रमाण खूप आहे. तसेच त्रासदायकही खूप ठरते. आणि उत्‍पादकता यांच्याविषयी फारशी माहिती नाही. तसेच काय होईल किंवा काय होणार  नाही, याविषयी काहीही समजत नाही तसेच काही करू शकत नाही. यामुळे  सर्वाधिक नुकसान आपल्या गावातील लोकांचे  होते, आपल्या शेतकऱ्यांचे होते आणि त्याहून अधिक आपल्या  लहान शेतकर्‍यांचे होते.  वादविवादांना  आव्हान देऊ शकतील आणि न्यायालयात  फेऱ्या मारू शकतील इतकी जमीन आणि संसाधने छोट्या शेतकऱ्यांकडे नसतात. आता बघा  भूमी अभिलेखापासून ते दुष्काळ-पुरातील पिकांच्या नुकसानीसाठी मदतीपर्यंत सर्व ठिकाणी  यंत्रणा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे.मानवी हस्तक्षेप  जितका अधिक  तितका विश्वासाचा अधिक  अभाव निर्माण होते  आणि त्यातूनच संघर्ष निर्माण होतो. वाद झाले तर वेळ आणि पैसाही वाया जातो.माणसाच्या आकलनाने    अदाज बांधला गेला, तर तितकासा  अचूक अंदाज लावता येत नाही. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एक सामार्थ्यशाली  प्रभावी माध्यमाच्या रूपात  ड्रोन हे एक नवीन साधन आपल्यासमोर आले आहे.

 

मित्रांनो,

ड्रोन तंत्रज्ञान मोठ्या क्रांतीचा आधार कसा बनत आहे,याचे एक उदाहरण पीएम स्वामित्व योजनाही  आहे. या योजनेंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील प्रत्येक मालमत्तेचे प्रथमच डिजिटल मॅपिंग करून लोकांना डिजिटल मालमत्ता पत्र  दिले जात आहेत.यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, भेदभावाला वावही संपला आहे.यामध्ये ड्रोनचा मोठा वाटा आहे. थोड्या वेळापूर्वी मला   ड्रोन उडवण्याचे तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळाली.यामुळेच मला काही वेळ उशीर झाला. मला आनंद आहे की, ड्रोनच्या मदतीने देशात आतापर्यंत सुमारे 65 लाख मालमत्ता पत्र  तयार करण्यात आली आहेत. आणि ज्याला हे मालमत्ता पत्र प्राप्त झाले आहे, त्याला हे समाधान आहे कीहोय, माझ्याकडे असलेल्या जमिनीचा योग्य तपशील मला मिळाला आहे. त्यांनी ही गोष्ट पूर्ण समाधानाने सांगितली आहे. अन्यथा,आपल्या येथे   अगदी लहान जागेचे मोजमाप जरी झाले तरी त्यावर  एकमत होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.

 

मित्रांनो,

आज आपण पाहतोय की आपले शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत, त्यांच्यात एक उत्साह आहे, ते स्वीकारायला ते तयार आहेत.हे असेच  झालेले  नाही. कारण गेल्या 7-8 वर्षात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.  तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांसाठी समस्या राहिलेली नाही आणि आणि शेतकरी जेव्हा ते  पाहतो तेव्हा तो  आपल्या हिशेबाने त्याचा लेखाजोखा मांडतो आणि त्याचा विश्वास बसला तर स्वीकारण्यासाठी विलंब करत नाही . आत्ताच मी बाहेर शेतकर्‍यांशी बोलत होतो, तेव्हा मध्य प्रदेशातील एक अभियंते  मला सांगत होते की, लोक आता मला ड्रोनवाला म्हणत बोलावतात. ते म्हणाले, मी अभियंता झालो, पण आता माझी ओळख ड्रोनवाला  अशी झाली आहे.ते मला म्हणाले कीबघा साहेब , मी त्याला म्हणालो की, तुम्ही  भविष्य कसे पाहता ? तेव्हा त्यांनी मला सांगितले कीसाहेब, पहा कडधान्य आहेत ना त्याची लागवड इथे वाढेल. आणि त्याचे कारण ड्रोन असेल, मी म्हटले कसे काय ? ते म्हणाले की ,साहेब कडधान्याची शेती होते तेव्हा  पिकाची उंची जास्त असते , त्यामुळे शेतकऱ्याला औषध फवारणीसाठी  शेतात  जावे लागत नाही,मी कुठे जाणार, तो फवारणी करतो, अर्धे औषध त्याच्या  अंगावर उडते आणि म्हणून तो म्हणाला की तो त्या पिकाकडे जात नाही. ते हणाले की, आता ड्रोनमुळे अशाप्रकारची जी काही पिके आहेत , जी कधीकधी माणसाच्या उंचीपेक्षा जास्त असतात.ड्रोनमुळे  त्यांची देखभाल करता येऊ लागली , औषध फवारता येऊ  लागली की, हे इतके सोपे होणार आहे की आपल्या देशातील शेतकरी कडधान्य लागवडीकडे सहज वळेल.आता एक व्यक्ती गावामध्ये शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याचे काम करते.मग गोष्टी कशा बदलतात? त्याचे अनुभव ऐकायला मिळतात.

 

मित्रांनो,

आज आम्ही कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे.मृदा आरोग्य पत्रिका ही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी ताकद  म्हणून उदयाला  आली आहे.आणि मला हे आवडेल की, ड्रोनच्या या सेवांप्रमाणेच गावे माती  परीक्षणाची प्रयोगशाळा बनू शकतात, रोजगाराची नवीन क्षेत्रे खुली होऊ  शकतात.आणि शेतकरी प्रत्येक वेळी माती परीक्षण करून  ठरवू शकतो कि, माझ्या या मातीसाठी या गोष्टीची आवश्यकता आहे, ही गरज आहे.  सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन  या सर्व गोष्टी आधुनिक सिंचन व्यवस्थेचा  भाग बनत आहेत.आता पीक विमा योजना पहापीक विमा योजनेंतर्गत सर्वात मोठे काम म्हणजे आपल्या जीपीएस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर असो , ई- नाम  सारख्या डिजिटल बाजारपेठेची  व्यवस्था असो , नीम कोटेड युरिया किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा विषय असो. गेल्या 8 वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानावरील  विश्वास खूप जास्त वाढला आहे.आज देशातील शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने  अधिक त्रासमुक्त आहेत. त्याचा सहजतेने  स्वीकार करत आहेत. आता ड्रोन तंत्रज्ञान आपल्या कृषी क्षेत्राला आणखी  उंचीवर नेणार आहे.कोणत्या जमिनीला  किती आणि कोणते खत द्यावे,जमिनीत कोणत्या गोष्टीची  उणीव आहे, किती सिंचन करावे लागेल, हेदेखील  आपल्या येथे अंदाजाने केले जात होते.  हे कमी उत्पादन आणि पिकांचे नुकसान होण्याचे  प्रमुख कारण आहे.पण येथेही स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनचा चांगला उपयोग होऊ शकतो.इतकेच  नाही तर कोणत्या झाडाला, कोणत्या भागाला रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यातही ड्रोन यशस्वी ठरतात.आणि म्हणूनच ड्रोन बिनदिक्कतपणे फवारणी करत नाही, ते  हुशारीने फवारणी करतात . त्यामुळे महागड्या औषधांचा खर्चही वाचतो.म्हणजेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने छोट्या शेतकऱ्यालाही बळ मिळेल, गती मिळेल आणि छोट्या शेतकऱ्याची प्रगतीही सुनिश्चित होईल.आणि आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना, माझेही हेच  स्वप्न आहे की, भारतात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, प्रत्येक शेतात ड्रोन आणि प्रत्येक घरात समृद्धी असावी.

 

मित्रांनो,

आम्ही देशातील प्रत्येक गावागावात  आरोग्य आणि निरामयता  केंद्रांचे जाळे बळकट  करत आहोत.टेलिमेडिसिनला प्रोत्साहन देत आहोत. पण गावांमध्ये औषधे आणि इतर वस्तू पोहोचवणे हे मोठे आव्हान राहिले आहे.  यामध्येही ड्रोनद्वारे अत्यंत  कमी वेळात म्हणजे फार कमी वेळात आणि वेगाने वितरण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. ड्रोनद्वारे कोविड प्रतिबंधक लस वितरणासह याचा  फायदाही आम्ही अनुभवला आहे.दुर्गम आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे  खूप उपयुक्त ठरू शकते.

 

मित्रांनो,

तंत्रज्ञानाचा आणखी एक पैलू आहे ज्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो.पूर्वीच्या काळात, तंत्रज्ञान आणि त्याद्वारे लावलेले   शोध हे उच्चभ्रू वर्गासाठी मानले जात होते. आज आम्ही प्रथम सामान्य जनतेला  तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. ड्रोन तंत्रज्ञान हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. गेल्या काही महिन्यांपर्यंत  ड्रोनवर बरेच निर्बंध होते.आम्ही अत्यंत कमी वेळात बहुतांश निर्बंध हटवले आहेत. उत्पादन संलग्न प्रोत्साहनासारख्या योजनांद्वारे आम्ही भारतात एक बळकट  ड्रोन उत्पादन कार्यक्षेत्र तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.जेव्हा तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचते  , तेव्हा त्याच्या वापराच्या शक्यताही अधिकाधिक वाढतात. ड्रोनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो याच्या नवीन शक्यता ,आज आपले  शेतकरी, आपले  विद्यार्थी, आपले  स्टार्ट अप शोधत आहेत. ड्रोन आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे, गावागावात पोहोचत आहे, त्यामुळे भविष्यात विविध कामांमध्ये त्याचा अधिक वापर होण्याची शक्यताही बळावली आहे.तुम्हाला दिसेल की, केवळ  शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही विविध प्रकारचे ड्रोन वापरले जातील. आपले देशबांधव यामध्ये अधिक नवोन्मेष आणतील. मला विश्वास आहे की, आगामी काळात ड्रोन तंत्रज्ञानाचे आणखी प्रयोग होतील, त्याचे नवनवे  उपयोग होतील.

 

मित्रांनो,

भारताच्या अशाच शक्यतांचा  ,अशाच श्रेणींचा फायदा करून घेण्यासाठी आज मी देश आणि जगातील सर्व गुंतवणूकदारांना पुन्हा आमंत्रित करतो.येथून सर्वोत्तम ड्रोन तंत्रज्ञान तयार करण्याची भारतासाठी आणि जगासाठी हीच योग्य वेळ आहे.मी तज्ञांना, तंत्रज्ञानाच्या जगतातील  लोकांना आवाहन करेन की, ड्रोन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त विस्तार करा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.मी देशातील सर्व तरुणांना ड्रोन क्षेत्रात नवीन स्टार्ट अपसाठी पुढे येण्याचे आवाहन करेन.ड्रोन तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने सामान्य माणसाला सक्षम बनवण्यासाठी  आपण एकत्र येऊन आपली  भूमिका बजावू. आणि मला विश्वास आहे की, आता  पोलिसांच्या कामातही सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन मोठी सेवा देऊ  शकणार आहे. कुंभमेळ्यासारखे मोठे कार्यक्रम असतात तेव्हा ड्रोनची खूप मदत होऊ शकते.जिथे वाहतूक कोंडीच्या  समस्या असतील तिथे ड्रोनच्या माध्यमातून उपाय शोधता येतील  म्हणजेच या गोष्टी इतक्या सहज वापरल्या जाणार आहेत.आपल्याला आपल्या व्यवस्थेला  या तंत्रज्ञानाशी संलग्न करावे लागेल.आणि जितके अधिक आपण या व्यवस्थांना संलग्न करू , मला बरोबर आठवणीत आहे, मी आज इथे पाहत होतो की, ते ड्रोनच्या सहाय्याने  जंगलात झाडे उगवण्यासाठी ज्या बिया आहेत , त्याचा गोळा तयार करून वरून टाकला जातो. जेव्हा ड्रोन नव्हते तेव्हा मी एक प्रयोग केला होता, माझ्याकडे सर्व देशी  प्रयोग आहेत. त्यावेळी तंत्रज्ञान नव्हते.मला वाटायचे, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा हे आमचे काही डोंगर आहेत, तिथे लोक जातील, झाडे लावतील, आशा करणे थोडे कठीण काम आहे.तर  मी काय केले, गॅसचे फुगे असतात जे हवेत उडतात.मी या गॅसच्या फुग्यांची मदत घेतली आणि मी म्हणालो त्या फुग्यात बिया टाका आणि जे हे डोंगर आहेत  तिथे जा आणि फुगे सोडा. फुगे खाली पडल्यावर बिया पसरतील आणि आभाळातून पाऊस पडल्यावर  नशीब असेल तर त्यातून झाड उगवेल. आज ते काम ड्रोनच्या सहाय्याने अगदी सहजतेने केले जात आहे. जिओ ट्रॅकिंग  सुरु  आहे.ते बीज कुठे गेले, त्याचे जिओ-ट्रॅकिंग होत आहे आणि त्या बियांचे झाडात रूपांतर होते आहे की नाही. त्याचा लेखाजोखा मांडता येणार आहे. म्हणजेच  एक प्रकारे,जंगलात लागलेल्या वणव्यावर  ड्रोनच्या साहाय्याने आपण सहज नजर ठेवू शकतो.एखादी छोटीशी घटना देखील  दिसली तर आपल्याला लगेच कार्यवाही करता येईल. म्हणजेच, आपण त्याच्याद्वारे कल्पना केलेल्या गोष्टी देखील प्रत्यक्षात आणू  शकतो,आपण आपल्या व्यवस्थांचा  विस्तार करू शकतो.मला विश्वास आहे की, आजचा  हा ड्रोन महोत्सव कुतूहलाच्या दृष्टिकोनातून तर  अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.जे कोणी हे बघेल , नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा विचार करेल, त्यात बदल घडवून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, व्यवस्थेशी  जोडण्याचा प्रयत्न करतील आणि अखेर आपण तंत्रज्ञानावर आधारित वितरण अधिक जलद करण्यासाठी  सक्षम होऊ.या विश्वासासह  मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद.

***

G.Chippalkatti/S.Bedekar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829008) Visitor Counter : 219