रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

2020 मध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट, एकूण अपघात सरासरी 18.46 टक्क्यांनी घटले, तर मृतांची संख्येत 12.84 टक्क्यांनी घट

Posted On: 26 MAY 2022 2:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2022


2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. एकूण अपघात सरासरी 18.46 टक्‍क्‍यांनी कमी झाले असून मृत्‍यांची संख्येत 12.84 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे तर  जखमींची संख्‍या आधीच्या  वर्षीच्‍या सरासरीपेक्षा 22.84 टक्‍क्‍यांनी कमी झाली. वर्ष 2020 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 3,66,138 रस्ते अपघात नोंदवले गेले, ज्यात 1,31,714 लोकांचा मृत्यू झाला आणि 3,48,279 जखमी झाले.
 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखाने (टीआरडब्ल्यू ) तयार केलेल्या ‘भारतातील रस्ते अपघात - 2020’ या अहवालानुसार, 2018 मध्ये 0.46 टक्क्यांची किरकोळ वाढ वगळता 2016 पासून रस्ते अपघातांची संख्या कमी होत आहे. 2020 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचप्रमाणे, 2015 पासून जखमी झालेल्या व्यक्तींच्या संख्येतही घट होत आहे.

2020 मध्ये सलग तिसर्‍या वर्षी, प्राणघातक रस्ते अपघातात बळी पडलेल्यांमध्ये तरुण वयोगटातील लोकांचा समावेश आहे. 2020 मध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाण  69 टक्के होते. एकूण रस्ते अपघातात 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण 87.4 टक्के आहे.

'भारतातील रस्ते अपघात - 2020' चा सध्याचा अहवाल  2020 या  वर्षातील देशातील रस्ते अपघातांच्या विविध पैलूंची माहिती उपलब्ध करून देतो. यात दहा विभाग असून रस्त्यांची लांबी आणि वाहनसंख्या या संदर्भात रस्ते अपघातांशी संबंधित माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या अहवालात प्रदान केलेला डेटा/माहिती ही आशिया प्रशांत  रस्ते अपघात संकलित माहिती (एपीआरएडी) आधार प्रकल्प अंतर्गत, आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने (युएनईएससीएपी) प्रदान केलेल्या प्रमाणित स्वरूपानुसार कॅलेंडर वर्षाच्या आधारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिस विभागांकडून संकलित  केली जाते.

या अहवालानुसार, प्राणघातक अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे,म्हणजे, अशा अपघातांमध्ये   किमान एकाचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये एकूण 1,20,806 प्राणघातक अपघातांची नोंद झाली, ही संख्या 1,37,689 च्या 2019 च्या आकडेवारीपेक्षा 12.23 टक्के कमी आहे.विशेष म्हणजे, 2020 मध्ये, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर रस्त्यांवर आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी अपघातांची, मृत्यूंची आणि जखमींची नोंद झाली आहे.
 
केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या  प्रमुख राज्यांनी 2020 मध्ये रस्ते अपघातात लक्षणीय घट साध्य केली आहे आणि  तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या प्रमुख राज्यांनी 2020 मध्ये रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट साध्य केली आहे.

JPS/SBC/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828467) Visitor Counter : 486