पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

लोकसहभागातून साध्य करू ‘स्वच्छ हवा सर्वांसाठी’ अभियान – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 21 MAY 2022 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

‘स्वच्छ हवा सर्वांसाठी’ या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्याची वेळ आलेली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे देशभरातील शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. मात्र, आपले नियोजित ध्येय गाठण्यासाठी या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. ते आज चेन्नई इथे ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ आणि ‘एक्सव्ही एफ.सी. मिलिअन प्लस सिटीज् चॅलेंज’ अर्थात 15 व्या वित्त आयोगाच्या शहरांतील आव्हानांसंदर्भात असलेल्या विशेष निधी योजनेंतर्गत आढावा कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. दक्षिण भारतासाठीच्या  या विशेष निधी योजनेत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, केरळ, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे.

  

भारतीय वाहने आणि इंधनासाठी बी.एस.- VI  मानक लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय हा हवेच्या प्रदुषणावर मात करण्याच्या दृष्टीने उचललेले अजून एक क्रांतिकारक पाऊल आहे, असे यादव यांनी सांगितले.

समग्र दृष्टीकोन अंगीकारत देशातील जवळपास 100 शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारत जनतेसाठी स्वच्छ हवेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यादव यांनी यावेळी केला.

  

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावे, शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करावा, समाजात बदल घडवून आणण्यासाठी योग्य वागणूक व दृष्टीकोन बाळगत  समाजातल्या परिवर्तनाचे दूत व्हावे असे आवाहन पर्यावरण मंत्र्यांनी आपल्या भाषणात केले. समन्वय, सहकार्य, सहभाग आणि सर्व भागीदारांचे निरंतर प्रयत्न या घटकांच्या आधारे ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा’ची उद्दीष्टे गाठता येतील आणि देशातील हवेच्या प्रदुषणाच्या समस्येवर परिणामकारक उपाययोजना करणे शक्य होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827204) Visitor Counter : 171