भारतीय निवडणूक आयोग

मुख्य निवडणूक आयुक्त/ निवडणूक आयुक्तांचा स्वतःला उपलब्ध असणारे विशेष लाभ आणि विशेषाधिकार यांत स्वेच्छेने कपात करण्याचा निर्णय


व्यक्तिगत खर्चासाठी मिळणाऱ्या भत्त्याबाबत प्राप्तिकर सवलत न वापरण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त/ निवडणूक आयुक्त यांचा निर्णय

दरवर्षी दोन एलटीसीचा त्याग करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त/ निवडणूक आयुक्त यांचा निर्णय

Posted On: 20 MAY 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

15 मे 2022 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राजीव कुमार यांनी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्यासह आज निवडणूक आयोगाची पहिली बैठक घेतली.

या बैठकीत इतर मुद्द्यांबरोबरच मुख्य निवडणूक आयुक्त/  निवडणूक आयुक्त यांना उपलब्ध असणारे विशेष लाभ आणि विशेषाधिकार यांचा आढावा घेऊन त्यावर पुनर्विचार करण्यात आला. यांमध्ये व्यक्तिगत खर्चासाठीच्या भत्त्यासंबंधाने मिळणाऱ्या प्राप्तिकर सवलतींचाही समावेश होता.

निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती आणि प्रचलन व्यवहार) कायदा, 1991 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त/ निवडणूक आयुक्त यांना वेतनाबरोबरचे विशेष लाभ आणि विशेषाधिकार मिळतात. मुख्य निवडणूक आयुक्त/  निवडणूक आयुक्त यांना मिळू शकणारे असे लाभ पुढीलप्रमाणे-:

  1. अन्न इत्यादी व्यक्तिगत बाबींवरील खर्चासाठी दरमहा रू. 34000/- चा भत्ता. यावर मुख्य निवडणूक आयुक्त/  निवडणूक आयुक्त यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही.
  2. स्वतःसाठी, जोडीदारासाठी आणि अवलंबित कुटुंबियांसाठी दरवर्षी तीनदा एलटीसी म्हणजे सुट्टी प्रवास सवलत मिळते.

व्यक्तिगत हक्क आणि लाभांबाबत संयम बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आयोगाचे मत पडले. आयोगाने एकमताने निर्णय घेतला की-

  1. मुख्य निवडणूक आयुक्त/  निवडणूक आयुक्त यांना सध्या दिले जाणारे प्राप्तिकर विषयक लाभ ते घेणार नाहीत. यावर उचित कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
  2. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त/  निवडणूक आयुक्त वर्षात त्यांना दिल्या जाणाऱ्या तीनपैकी केवळ एका एलटीसीचा उपयोग करतील.

 

* * *

S.Patil/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827040) Visitor Counter : 3937