राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'ला दिली भेट, 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'च्या राजकीय नेत्यांशी घेतल्या भेटी


'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'च्या प्रतिनिधिमंडळाच्या विशेष बैठकीत मांडले विचार, किंग्सटाऊन येथे भारतीय समुदायाच्या स्वागतसमारंभात लावली उपस्थिती

करसंकलन सहकार्य आणि माहितीचे आदानप्रदान याविषयीच्या करारावर तसेच ओल्ड काल्डर समुदाय केंद्राच्या पुनर्बांधणीच्या सामंजस्य करारावर भारत आणि 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स' यांनी केल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 20 MAY 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

जमैका आणि 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स' या दोन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 मे 2022 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'ची राजधानी किंग्सटाऊन येथे पोहोचले. भारताच्या राष्ट्रपतींनी या देशाला दिलेली ही पहिली अधिकृत भेट आहे. 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'च्या गव्हर्नर जनरल डेम सूझन डाऊगन, पंतप्रधान डॉ.राल्फ गोन्साल्विस आणि अन्य मान्यवर व्यक्तींनी राष्ट्रपती कोविंद यांचे अर्गाइल आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. विमानतळावर दाखल झाल्यावर राष्ट्रपतींचे  गार्ड ऑफ ऑनर ने त्यांचे स्वागत  करण्यात आले.

काल (19 मे 2022 रोजी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शासकीय भवनात गव्हर्नर जनरल जनरल डेम सूझन डाऊगन आणि पंतप्रधान डॉ.राल्फ गोन्साल्विस यांची भेट घेतली. माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आदी क्षेत्रांत तसेच बहुपक्षीय विचारमंचांवर, भारत आणि 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स' यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गव्हर्नर जनरल डेम सूझन डाऊगन आणि पंतप्रधान डॉ.राल्फ गोन्साल्विस यांनी, करसंकलन सहकार्य आणि माहितीचे आदानप्रदान याविषयीच्या करारावर तसेच ओल्ड काल्डर समुदाय केंद्राच्या पुनर्बांधणीच्या सामंजस्य करारावरस्वाक्षऱ्या केल्या व संबंधित औपचारिकता पूर्ण केल्या.

त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'च्या प्रतिनिधीगृहाच्या विशेष बैठकीत आपले विचार मांडले. “भारत आणि 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'- जगाच्या सर्वसमावेशी रचनेच्या दिशेने वाटचाल” असा राष्ट्रपतींच्या भाषणाचा विषय होता.

‘जागतिकीकरणाचा चेहरा लाभलेल्या या जगाच्या रचनेमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हवामानबदल, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला आव्हान देणारे राजकीय संघर्ष, सीमापार दहशतवाद, पुरवठा साखळ्यांमधील अडथळे अशा काही प्रमुख जागतिक समस्या आपल्या सर्वांना भेडसावत असल्याचे’ राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रांनी आपापल्या संकुचित हितसंबंधांपलीकडे जाऊन या समस्यांचा विचार केला पाहिजे, कारण आपल्याच भावी पिढ्यांचे हित त्यातच सामावलेले आहे, असेही ते म्हणाले.

"आज सर्व जग जोडले गेले आहे आणि त्यातील सर्व घटक परस्परांवर अवलंबून आहेत. हे पाहता बहुपक्षीयता, आजवरच्या इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा आज अधिकच औचित्यपूर्ण आहे", असेही राष्ट्रपती म्हणाले.

"जगाची सर्वसामावेशी रचना उचलून धरण्यामागे- एक सार्वत्रिक, नियमाधारित, खुली, पारदर्शक, जिच्याबद्दल भाकीत वर्तवता येईल अशी, भेदरहित आणि समानशील बहुपक्षीय व्यवस्था निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे", असेही ते म्हणाले.

दुपारी राष्ट्रपतींनी किंग्सटाऊनमधील काल्डर मार्ग येथे भेट देऊन तेथे भारतीय समुदायाशी आणि 'फ्रेंड्स ऑफ इंडिया' समूहाशी संवाद साधला.

'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'मध्ये राहणारे भारतीय आणि तेथील भारतीय समुदाय यांच्याकरवी भारताची समृद्ध विविधता, संपन्न सांस्कृतिक वारसा आणि भारताच्या अभिमानास्पद परंपरा यांचे तसेच यांमुळे घडणाऱ्या चांगल्या परिणामांचे दर्शन घडते, असे राष्ट्रपती म्हणाले.

दिवसअखेर 'सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स'च्या गव्हर्नर जनरल डाऊगन यांनी शासकीय भवनात राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानी समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अगत्यपूर्वक उपस्थिती लावली.

 

* * *

Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826908) Visitor Counter : 170