संरक्षण मंत्रालय

नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उलटगणती कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती


आनंदी आणि संतुलित जीवनासाठी नागरिकांनी योगाभ्यास करण्याचे आवाहन

Posted On: 19 MAY 2022 10:00AM by PIB Mumbai

संरक्षण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या उलटगणती कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी यावेळी विविध योगासने केली. संरक्षण राज्यमंत्री   अजय भट्ट,  आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) संजीव मित्तल, संरक्षण संपदा महासंचालक अजय कुमार शर्मा, संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य जनताही या कार्यक्रमात सहभागी झाली.

 

युगानुयुगे सुरु असलेला योगाभ्यास भारताचा सर्वात मोठा वारसा आहे. लोकांच्या जीवनात ती नवीन ऊर्जा निर्माण करत त्यांना "स्व" आणि निसर्गाशी जोडते. योग मनाला शिस्त लावतो आणि निरोगी बनवतो. त्यामुळे नित्यकर्तव्ये सक्षमपणे पार पाडण्यास मदत होते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.  योग हा केवळ एका विशिष्ट वेळी केलेला सराव नाही, तर दैनंदिन कामे कार्यक्षमतेने आणि सतर्कतेने करण्याची शक्ती आणि प्रेरणा यामागे आहे. योगमुळे आपली विचारसरणी, ज्ञान, कार्यक्षमता आणि ध्येयासक्ती बळकट होते,” असे ते म्हणाले.

 

मधुमेह, रक्तदाब, उच्चरक्तदाब आणि नैराश्य यासह विविध आरोग्यविषयक आजारांचा सामना करण्याचा योग प्रभावी मार्ग आहे, कारण तो आंतरिक संघर्ष आणि तणाव दूर करतो असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता योगासन आणि प्राणायामाच्या अमूल्य योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.

 

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ यावेळी संरक्षण मंत्र्यांनी दिला. पंतप्रधानांनी त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते.  योग म्हणजे शून्य खर्चात उत्तम आरोग्याची हमी असे ते म्हणाले.  योगाभ्यासाला, आरोग्य आणि कल्याणाची सर्वांगीण दृष्टी प्रदान करणारा अभ्यास म्हणून मान्यता दिल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी युएनजीएचे कौतुक केले.

 

संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केल्यापासून या उत्सवात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल  राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दल,  भारतीय तटरक्षक दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व विभागांचे कौतुक केले. त्यांनी लोकांना सुखी आणि संतुलित जीवनाच्या शोधात योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

 ***

 S.Thakur/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826598) Visitor Counter : 199