राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या जमैकामध्ये गव्हर्नर जनरल, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका संपन्न


राष्ट्रपतींच्या हस्ते जमैकातील आंबेडकर भवनाचे उद्‌घाटन, किंग्सटनमधील भारतीय समुदायाला राष्ट्रपतींनी केले संबोधित

सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस आणि जमैकाचे परराष्ट्र व्यवहार आणि विदेशी व्यापार मंत्रालय यांच्यातील राजनैतिक प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्याच्या सामंजस्य करारावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

Posted On: 17 MAY 2022 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2022

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे 15 मे 2022 रोजी संध्याकाळी नॉर्मन मॅनले या जमैका मधील किंग्स्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले, त्यावेळी महामहीम, जमैकाचे गव्हर्नर जनरल यांनी त्यांचे स्वागत केले.  राष्ट्रपतींचे आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यात आली. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्ताने भारतीय राष्ट्रपतींनी जमैकाला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

काल (16 मे, 2022), राष्ट्रपतींनी किंग्स्टन येथील नॅशनल हीरोज पार्कला भेट देऊन मार्कस गार्वे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या  दौऱ्याचा आरंभ केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी गव्हर्नर जनरल सर पॅट्रिक ऍलन यांची भेट घेण्यासाठी किंग्ज हाऊस  येथील जमैकाच्या गव्हर्नर जनरल यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या भेटी दरम्यान गव्हर्नर जनरल यांचे त्यांनी केलेल्या स्वागताबद्दल  आणि आदरातिथ्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी माहिती- तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा, वैद्यकीय आणि औषध क्षेत्र, क्रीडा आणि शिक्षण, पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग आणि विकास या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली.

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीनंतरही भारत आणि जमैका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक आणि व्यावसायिक परस्परसंवादात सातत्याने वाढ होत असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.

गव्हर्नर जनरल यांच्या भेटीनंतर, राष्ट्रपतींनी जमैका हाऊसला प्रयाण केले; जेथे त्यांचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस यांनी स्वागत केले.  दोन्ही नेत्यांनी यावेळी भारत आणि जमैका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक, सेवा, आरोग्य, रेल्वे आणि वाहतूक सेवा आणि क्रीडा या क्षेत्रांत प्रादेशिक आणि बहुपक्षीय मंचांवरील सहकार्य वाढविण्याविषयी चर्चा केली.

दोन्ही देशांमधील सेवा क्षेत्रात आणि ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत सहकार्याने कार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. जमैकाची शैक्षणिक क्षेत्रासंबंधांत, विशेषत: शैक्षणिक संस्थांमधील सहकार्यासाठी असलेली आवड लक्षात घेऊन त्याबद्दल राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला.

बैठकीनंतर, राष्ट्रपती आणि जमैकाचे पंतप्रधान यांनी सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस (SSFSI) आणि जमैकाचे परराष्ट्र व्यवहार आणि परकीय व्यापार मंत्रालय यांच्यातील राजनैतिक प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर आणि सामंजस्य करारावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारानुसार सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस (SSFSI) संस्थेने जमैकाच्या परदेशी सेवेतील अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण देवाणघेवाणीची सुविधा सुनिश्चित केली आहे.

त्यानंतर, राष्ट्रपतींनी डाउनटाउन किंग्स्टनला भेट देऊन आंबेडकर अव्हेन्यूचे उदघाटन केले.  याप्रसंगी केलेल्या आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाले, की डॉ भीमराव आंबेडकरांनी संविधानात वंचित वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी पुरोगामी आदर्शांची मांडणी केली. तसेच त्यांनी विषमता दूर करण्याच्या ध्येयासाठी लोकांना शिक्षित आणि प्रेरित केले.

त्यानंतर संध्याकाळी, राष्ट्रपतींनी किंग्स्टन येथील होप बोटॅनिकल गार्डनला भेट दिली आणि भारत-जमैका मैत्री उद्यानाचे उदघाटन केले, या बगिच्याच्या आश्रयदाता जमैकाच्या फर्स्ट लेडी, लेडी ॲलन, आणि जमैकाचे कृषी मंत्री पर्नेल चार्ल्स जूनियर आणि नॅशनल प्रिझर्वेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आल्फ्रेड थॉमस यांच्या उपस्थितीत चंदनाचे रोप लावले.

दिवसअखेरीस, राष्ट्रपतींनी जमैकामधील भारताचे उच्चायुक्त मासाकुई रुंगसुंग, भारतीय समुदाय आणि भारतातील सुह्रुदा़ंनी आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाला उपस्थिती लावली.

यावेळी झालेल्या संमेलनाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की जमैकन-भारतीय संबंधांची सांस्कृतिक मुळे खोलवर रुजलेली आहेत आणि त्यामुळे आमची बहुआयामी भागीदारी समृद्ध झाली आहे. जमैकामधील भारतीय समुदायाच्या कामगिरीचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे आणि  भारतीय लोकांच्या, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ याद्वारे साजरा करत आहे. त्यांनी जमैकातील परदेशस्थ भारतीयांना सदस्यांना पुढे येऊन या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826006) Visitor Counter : 222