पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' ला संबोधित केले


या प्रदेशातील महिलांनी पंतप्रधानांना एक मोठी राखी भेट दिली आणि त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी तसेच त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल आभार मानले

पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला

"जेव्हा सरकार प्रामाणिकपणे दृढ संकल्पासह लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते , तेव्हा अर्थपूर्ण परिणाम साधले जातात "

सरकारची 8 वर्षे ‘सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’साठी समर्पित

“परिपूर्णता हे माझे स्वप्न आहे. आपण 100 टक्के व्याप्ती करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. सरकारी यंत्रणेला याची सवय होऊन, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा

100% लाभार्थ्यांना कक्षेत आणणे म्हणजे प्रत्येक पंथ आणि प्रत्येक वर्गापर्यंत सबका साथ, सबका विकास या भावनेने समान लाभ पोहोचवणे

Posted On: 12 MAY 2022 2:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भरुच येथे ‘उत्कर्ष समारोह’ या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या चार महत्त्वाच्या योजनांच्या 100% परिपूर्णतेचा उत्सव आहेयामुळे गरजूंना वेळेवर आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.

या प्रदेशातील महिलांनी पंतप्रधानांना एक मोठी राखी भेट म्हणून  दिली तसेच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी देशातील महिलांच्या सन्मानासाठी आणि जीवन सुलभ बनवण्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

एका दृष्टिहीन लाभार्थीशी संवाद साधत पंतप्रधानांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाबाबत चौकशी केली. वडिलांच्या समस्येबद्दल मुलगी भावूक झाली. यामुळे भावनाविवश झालेल्या पंतप्रधानांनी तिला सांगितले की तिची संवेदनशीलता हीच तिची ताकद आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने ईद कशी साजरी केली याबद्दलही पंतप्रधानांनी विचारले. लसीकरण करून घेतल्याबद्दल आणि मुलींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी लाभार्थीचे कौतुक केले. पंतप्रधानांनी एका महिला लाभार्थीशी संवाद साधला आणि तिच्या जीवनाबद्दल विचारले आणि सन्मानाने जीवन जगण्याच्या तिच्या निर्धाराची प्रशंसा केली. एका तरुण विधवेने आपल्या मुलांना चांगले जीवन देण्याच्या प्रवासाबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. यावर पंतप्रधानांनी तिला  छोट्या बचत उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला  आणि अधिकाऱ्यांना तिच्या या  प्रवासात तिला साथ देण्याचे निर्देश दिले.

या सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सरकार प्रामाणिकपणे दृढ संकल्पासह  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा यशस्वी परिणाम साधले जातात याचा  आजचा उत्कर्ष समारोह हा पुरावा  आहे. सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजनांच्या 100 टक्के परिपूर्णतेबद्दल  त्यांनी भरूच जिल्हा प्रशासन आणि गुजरात सरकारचे कौतुक केले. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचे समाधान आणि आत्मविश्वास याची दखल घेतली. आदिवासी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक समाजातील अनेक नागरिक माहितीच्या अभावामुळे योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे ते म्हणाले.  सबका साथ सबका विश्वास ही भावना आणि प्रामाणिक हेतू नेहमीच चांगले परिणाम देतात, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या आगामी 8 व्या वर्षपूर्ती संदर्भात  पंतप्रधान म्हणाले की, सरकारची 8 वर्षे ‘सेवा सुशासन और गरीब कल्याण’साठी समर्पित होती .  त्यांनी आपल्या प्रशासनाच्या यशाचे श्रेय वंचित, विकास आणि गरिबी याविषयी मिळालेल्या अनुभवाला दिले. गरीबी आणि सर्वसामान्यांच्या  गरजांच्या वैयक्तिक अनुभवाच्य आधारे मी  काम करतो, असे सांगून ते म्हणाले की, या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र  व्यक्तीला मिळायला हवा. पंतप्रधान म्हणाले की, गुजरातच्या मातीने त्यांना त्यांच्या मिळालेल्या यशावर समाधानी रहायचे नाही असे शिकवले आहे आणि नागरिकांच्या कल्याणाची व्याप्ती  सुधारणे आणि विस्तारित करणे हे आपले  नेहमीच ध्येय राहिले आहे असे ते म्हणाले.  परिपूर्णता हे माझे स्वप्न आहे. आपण 100 टक्के व्याप्तीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. सरकारी यंत्रणेला याची सवय व्हायला हवी आणि त्याचबरोबर  नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे.

पंतप्रधानांनी नमूद केले की 2014 मध्ये देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या शौचालय, लसीकरण, वीज जोडण्या आणि बँक खाती यासारख्या सुविधांपासून वंचित होती. त्यानंतरच्या काळात, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आम्ही अनेक योजनांना 100% पूर्णत्वाच्या जवळ आणू शकलो आहोत. 8 वर्षांनंतर, आपण नव्याने दृढसंकल्प आणि निर्धारासह स्वतःला समर्पित करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान म्हणाले की, लाभार्थींचे 100% कव्हरेज म्हणजे प्रत्येक पंथ आणि प्रत्येक वर्गापर्यंत सबका साथ, सबका विकास भावनेने समान लाभ पोहोचवणे आहे.  गरिबांच्या कल्याणाच्या प्रत्येक योजनेपासून कुणीही वंचित राहू नये. यामुळे तुष्टीकरणाचे राजकारणही संपुष्टात आले आहे. परिपूर्णता म्हणजे  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहचतात .

या प्रदेशातील विधवा भगिनींनी त्यांना राखीच्या रूपाने सामर्थ्य दिल्याबद्दल या  महिलांचे आभार मानले.  त्यांच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे आहेत आणि त्यांना कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा यातून मिळते असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आणि विश्वासामुळे ते लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून परिपूर्णतेचे  उद्दिष्ट जाहीर करू शकले. सामाजिक सुरक्षेचा हा मोठा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.  त्यांनी या मोहिमेचा संक्षिप्त उल्लेख ‘गरीबांचा सन्मान’ असा केला.

गुजराती भाषेत बोलताना पंतप्रधानांनी भरूचच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भरूचशी निगडित आठवणींचा त्यांनी उल्लेख केला. औद्योगिक विकास आणि स्थानिक तरुणांच्या आकांक्षांची पूर्तता आणि भरुच हे विकासाच्या ‘मुख्य मार्गावर’ असल्याचे त्यांनी नमूद केले.  अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या नवीन क्षेत्रांतील क्षमता आणि संधींचीही त्यांनी माहिती दिली.

 

 

 

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1824685) Visitor Counter : 300