पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
आगामी इथेनॉल समर्पित प्रकल्पांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या तेल कपंन्यांनी एकत्र येत त्रिपक्षीय अधिक एस्क्रो करारावर केल्या स्वाक्षऱ्या
Posted On:
11 MAY 2022 4:40PM by PIB Mumbai
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) भारतातील आगामी इथेनॉल समर्पित प्रकल्पांसाठी दीर्घकालीन खरेदी करार (एलटीपीए) केला आहे.
बिहारच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव संदीप पौंडरिक (आयएएस), भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वनी भाटिया आणि बीपीसीएलचे कार्यकारी संचालक आय/सी, विपणन कॉर्पोरेट, सुखमल जैन यांच्या उपस्थितीत ओएमसी, प्रकल्प प्रवर्तक आणि संबंधित इथेनॉल प्रकल्पांच्या बँकांमध्ये त्रिपक्षीय-अधिक-एस्क्रो कराराच्या (टीपीए) पहिल्या संचावर स्वाक्षरी करण्यात आली.
भारतीय स्टेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन बँक या तीन बँका या त्रिपक्षीय करारामध्ये ओएमसी आणि प्रकल्प प्रवर्तकांसह सहभागी आहेत. इथेनॉल प्रकल्पांना मिळणारा निधी या बँकांनी दिलेल्या वित्तपुरवठ्यासाठी वापरला जाईल याची खातरजमा करण्यासाठी कराराची रचना करण्यात आली आहे.
या करारानुसार, केन्द्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमा अंतर्गत या इथेनॉल समर्पित प्रकल्पाद्वारे तयार केलेले इथेनॉल, पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी ओएमसींना विकले जाईल. इथेनॉलच्या पुरवठ्यासाठीचा निधी नियोजनानुसार कर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी वित्तपुरवठा बँकेकडे ठेवलेल्या एस्क्रो खात्यात जमा केला जाईल.
मायक्रोमॅक्स बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, इस्टर्न इंडीया बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, मुझफ्फरपूर बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, केपी बायोफ्युएल्स प्रा. लि., मध्य प्रदेश आणि विसाग बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड, मध्य प्रदेश यांच्याबरोबर त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.
भारताने इथेनॉल पुरवठ्यात वर्ष 2021-22 मध्ये, 186 कोटी लिटर इथेनॉलचा वापर केला. यात 9.90% इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला. यामुळे 9000 कोटींहून अधिक परकीय चलनाची बचत झाली.
तथापि, सरकारने 2025 पर्यंत 20% मिश्रित इथेनॉल साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते सामान्यतः E20 लक्ष्य म्हणून ओळखले जाते. हे लक्ष्य गाठण्यात इथेनॉलची तूट हे मोठे आव्हान आहे. E20 चा विचार करता, 2025-26 मध्ये लक्ष्य गाठण्यासाठी देशाला 1,016 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. पण, सध्याच्या उपलब्धतेनुसार इथेनॉलची तूट अंदाजे 650 कोटी लिटर इतकी आहे. या पाच प्रकल्पांमुळे दरवर्षी सुमारे 23 कोटी लिटर इथेनॉल तयार होण्याची शक्यता आहे.
***
S.Patil/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824437)
Visitor Counter : 234