पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

आयव्हरी कोस्टमध्ये संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी संकेत कराराच्या पंधराव्या सदस्य परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांनी केले भाषण

Posted On: 10 MAY 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2022

 

“आपल्याला सांभाळणाऱ्या भूमीची काळजी घेण्याचा जागतिक तापमानवाढीविरुद्धच्या लढाईत उपयोग होईल”, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंदर यादव यांनी व्यक्त केले. ते आज आयव्हरी कोस्टमध्ये UNCCD म्हणजेच संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी संकेत कराराच्या पंधराव्या सदस्य परिषदेत उद्घाटनपर पूर्णसत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यावरणानुकूल जीवनशैली अंगीकारण्याचा पुरस्कार केला.

'भूमीची स्थिती खालावत चाललेली असतानाही जग उपभोगवादी आणि चंगळवादी जीवनशैली चालूच ठेवते आणि तरीही आपली भूमी आपल्याला सतत देत राहील अशी अपेक्षा बाळगते', या मुद्द्याकडे लक्ष वेधून त्यांनी त्यावर जोरदार मांडणी केली. "केवळ उपभोगच घेत राहण्याची दिशा आपण सामूहिकपणे बदलणे ही काळाची गरज आहे. 'वापर आणि फेकून द्या' ही मनोवृत्ती पृथ्वीसाठी हानिकारक आहे.", असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जागतिक तापमानवाढीचा भूमीवर होणारा परिणाम विशद करताना ते म्हणाले, "जागतिक तापमानवाढीबाबत विकसित राष्ट्रांची भूतकाळात आणि वर्तमानातही सर्वाधिक आहे. त्यामुळे उत्सर्जन कपातीत त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय, माणसे आणि पृथ्वी दोन्हींना वाचविणे शक्य होणार नाही."

पुढे त्यांनी भारताच्या अध्यक्षीय कारकीर्दीत केलेल्या महत्त्वपूर्ण कृतींची माहिती दिली. "पुनःस्थापना व पुनरुज्जीवनासाठी जागतिक पातळीवर चालणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये नामनिर्देशन देण्याची मागणी जगाकडून येताच भारत सरकारने असे सहा कार्यक्रम निश्चित केले. त्यांतून 125 लाख हेक्टर क्षरित जमिनीचे पुनरुज्जीवन करण्याचा उद्देश आहे." असे यादव यांनी सांगितले.

आपल्या भाषणाच्या शेवटी यादव यांनी 'सामूहिक वचनबद्धता सर्वच देशांकडून प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सार्वजनिक व खासगी संस्था तसेच सर्वसामान्य व्यक्ती यांनी भूमीचे क्षपण व क्षरण रोखण्याच्या जागतिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, त्या दिशेने संसाधनांची निर्मिती करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर, या परिषदेतून सकारात्मक परिणाम साधला जाण्यासाठी भारताकडून सातत्यपूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाहीदेखील भूपेंदर यादव यांनी दिली.

 

* * *

S.Kane/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1824237) Visitor Counter : 195