सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलाच्या 107 कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांच्या विक्रीचा केला प्रारंभ

Posted On: 09 MAY 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2022

 

केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली आहे. गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते  आज  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 107 कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ झाला. देशातील निमलष्करी दलांची सर्व कॅन्टीन्स लवकरच खादी उत्पादनांची विक्री सुरू करतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. 

“गांधीजींसाठी खादी हे स्वदेशीचे प्रतीक होते आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचेही ते  एक साधन आहे. खादी शुद्धतेची हमी आहे. 107 निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांची विक्री सुरू झाल्याचा मला आनंद झाला आहे आणि लवकरच देशभरातील सर्व निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादने उपलब्ध करून दिली जातील,'' असे गृहमंत्र्यांनी आसाममधील तामुलपूर येथे बीएसएफच्या  केंद्रीय कर्मशाळा  आणि भांडाराच्या  पायाभरणी कार्यक्रमादरम्यान  सांगितले.  यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे  अध्यक्ष  विनय कुमार सक्सेना, गृह सचिव  अजय कुमार भल्ला आणि सीमा सुरक्षा दल  आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे  महासंचालक उपस्थित होते.

तत्पूर्वी, स्वदेशीला चालना देण्यासाठी, गृहमंत्र्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत सर्व CAPF कॅन्टीनसाठी   अधिकाधिक "स्वदेशी" उत्पादने विकणे अनिवार्य केले. सुरुवातीला राष्ट्रध्वज,  सुती  टॉवेल्स, मध, कच्चे घाण्यावरील  मोहरीचे तेल, अगरबत्ती, दलिया, पापड, लोणची, आवळा उत्पादने इत्यादींसह 32 उत्पादने दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा, गुजरात उत्तर प्रदेश, आसाम आणि इतर राज्यांमधल्या  कॅन्टीनमध्ये पुरवली जातील. 

मोहरीचे तेल, गोधड्या आणि लोकरीच्या ब्लँकेटच्या पुरवठ्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने   निमलष्करी दलांसोबत केलेल्या  ऐतिहासिक करारानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. 

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823973) Visitor Counter : 162